>> मंत्री ढवळीकर; ग्राहकांना बिले वेळेत देणार
वीज खाते हे राज्य सरकारला मोठ्या प्रमाणात महसूल प्राप्त करून देणारे खाते असून, या खात्यातर्फे सरकारला मिळणार्या महसुलात कशी वाढ करता येईल, यावर आपण भर देणार असल्याचे काल वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
ढवळीकर यांनी काल पणजी येथील विद्युत भवनमध्ये वीज अभियंत्यांसोबत आढावा बैठक घेतली व मान्सून आगमनाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी वीजपुरवठ्यात सुधारणा घडवून आणण्याबाबत प्रदीर्घ चर्चा केली. तसेच त्यांनी अधिकार्यांना काही महत्त्वाच्या सूचना केल्या.
जुन्या झालेल्या वीजवाहिन्या व अन्य साहित्य बदलण्याबरोबरच मागच्या सरकारने सुरू केलेले प्रकल्प, तसेच अपूर्णावस्थेतील प्रकल्प पूर्ण करण्याबाबतही त्यांनी अभियंत्यांशी चर्चा केली. खात्याचे काम सीपीडब्ल्यूडी मॅन्युअलनुसार करण्यात येणार असून, कंत्राटदारांची जी ५ कोटी रुपयांची देणी आहेत, ती विनाविलंब फेडण्यात येणार असल्याची माहिती ढवळीकर यांनी दिली.
ग्राहकांना विजेचे बिल देण्यात विलंब न करता यापुढे दर महिन्याला बिले दिले जाईल. त्याची सुरुवात जून महिन्यापासून होणार असून, या पद्धतीचाही महसूल प्राप्तीसाठी फायदा होणार आहे, असेही ढवळीकरांनी सांगितले.
ज्या ग्राहकांना विजेचा भार (पावर लोड) वाढवून हवा असेल, त्यांना तो वाढवून देण्यात येईल. तसेच ज्या ग्राहकांना घरगुती वीजजोडणीच्या जागी औद्योगिक वीजजोडणी हवी असेल, त्यांना ती दिली जाईल, असेही त्यांनी नमूद केले. सर्व अभियंत्यांना त्यांच्या क्षेत्रातील कामाचा आढावा घेण्याची सूचना करण्यात आली असल्याची माहितीही त्यांनी दिली.
काल झालेल्या या बैठकीला अधीक्षक अभियंते, कार्यकारी अभियंते, वीज सचिव व मुख्य वीज अभियंते उपस्थित होते. पुढील दोन दिवसांत सर्व कनिष्ठ अभियंत्यांची बैठक घेतली जाणार आहे.
मुलाखती दिलेल्या कंत्राटी कामगारांना कायमस्वरूपी नोकरी
गेल्या १०-१५ वर्षांपासून कंत्राटी पद्धतीवर काम करणार्या ज्या वीज कामगारांनी कायमस्वरूपी नोकरीसाठी मुलाखती दिलेल्या आहेत, त्यांची निवड करून त्यांना कायमस्वरूपी नोकरीत सामावून घेण्यात येणार असल्याचे वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी स्पष्ट केले. केवळ ज्या कंत्राटी कामगारांनी मुलाखती दिलेल्या आहेत, त्यांचाच ही पदे भरताना विचार करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.