निकृष्ट दर्जाच्या रस्त्याप्रकरणी साबांखाचे २ अभियंते निलंबित

0
26

>> मुख्यमंत्र्यांची धडाकेबाज कारवाई; साखळी-चोर्ला घाट रस्त्याची पाहणी

मंत्रिमंडळ विस्तार, खातेवाटप आणि महामंडळांचे वाटप झाल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्याच्या कारभाराकडे अधिक लक्ष देण्यास सुरुवात केली असून, पहिलाच दणका त्यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंते आणि रस्ता कंत्राटदारांना दिला आहे. साखळी-चोर्ला घाट रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी काल त्याला जबाबदार असलेल्या साबांखाच्या सहाय्यक अभियंत्यासह कनिष्ठ अभियंत्याला निलंबित केले. तसेच संबंधित कंत्राटदारावर कारवाईचा आदेश दिला.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बुधवारी साखळी-चोर्ला या दरम्यानच्या घाट रस्त्याची पाहणी केली. या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याच्या तक्रारी होत्या. त्या पार्श्‍वभूमीवर काल त्यांनी ही पाहणी केली. त्यानंतर चौकशीअंती संबंधित कंत्राटदारावर कारवाई करण्याचे आदेश दिले. साखळी-चोर्ला घाट रस्ता कामाची तज्ज्ञांकडून तपासणी करून घ्यावी व त्याचा खर्च संबंधित कंत्राटदाराकडून वसूल करून घ्यावा, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली. या कामाच्या पाहणीची जबाबदारी असलेले सार्वजनिक बांधकाम खात्याचे सहाय्यक अभियंता आणि कनिष्ठ अभियंता यांना निलंबित करण्याबरोबरच त्यांची चौकशी करावी, असा आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. त्याचबरोबर गेल्या ३ वर्षांत राज्यातील ज्या प्रमुख रस्त्यांचे काम झालेले आहे, त्या कामाची चौकशी करण्याचा आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.

गेल्या ३ वर्षांतील प्रमुख रस्त्यांच्या कामाची होणार चौकशी

गेल्या ३ वर्षांत राज्यातील ज्या प्रमुख रस्त्यांचे काम करण्यास मंजुरी देण्यात आली होती, त्या सर्व रस्त्यांच्या कामांची चौकशी केली जावी व ४५ दिवसांच्या आत सरकारला अहवाल सादर करावा, असा आदेश मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. या आदेशानुसार, ज्या रस्त्यांचे काम हे निकृष्ट दर्जाचे झालेले आहे, त्या रस्त्यांच्या कामाची चौकशी केली जाणार आहे. त्यामुळे रस्ता कंत्राटदारांचे धाबे दणाणले आहेत.