विष्णू वाघांपासून फारकत घेण्याची पर्रीकरांची सूचना

0
99

फेसबूकवर वाघांनी दिली माहिती
भाजपच्या हल्लीच झालेल्या चिंतन बैठकीत संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी बैठकीला उपस्थित असलेले सर्वमंत्री व आमदारांना विष्णू वाघ यांच्यापासून फारकत घेण्याची सूचना केल्याची माहिती आपणाला मिळाली असल्याचे विष्णू वाघ यांनी काल फेसबूकवर पोस्ट केले आहे.यासंबंधी विष्णू वाघ यांना छेडले असता चिंतन बैठकीत सर्व मंत्री व आमदारांना पर्रीकर यांनी तशी सूचना केल्याची माहिती आपणाला मिळाली असल्याचे ते म्हणाले. पर्रीकर यांचे त्याबाबत आपण आभार मानीत असल्याचे ते म्हणाले.
पर्रीकर यांनीच आपणाला भाजपमध्ये आणले होते व त्यावेळी आपणाला बरीच आश्‍वासने दिली होती. आपणही पक्षात आल्यानंतर पक्षाच्या कार्याला स्वतःला झोकून दिले. विशेष करून निवडणुकीच्या काळात पक्षासाठी जोरदार प्रचार केला. प्रचारासाठी गाणी तसेच अन्य मजकूर लिहिला. कित्येक सभांतून भाषणे केली. मात्र, पक्ष सत्तेवर आल्यानंतर आपणाला काहीही दिले गेले नाही. ईएसजी व कला अकादमीची जबाबदारी दिली आणि नंतर त्यातूनही मुक्त करण्यात आले. नंतर तर पक्षाने एका प्रकारे आपणावर बहिष्कारच घातला. आपणांवर प्राणघातक हल्ला झाला तेव्हाही पक्षाकडून आवश्यक ते सहकार्य मिळाले नाही. आता तर सर्वांनाच माझ्यापासून फारकत घेण्याची सूचना करण्यात आली आहे. कोण कोण आता आपणापासून फारकत घेणार आहेत ते पहावे लागणार असल्याचे ते म्हणाले.