विषवल्ली

0
17

अमली पदार्थ तस्करीप्रकरणी परवा म्हापशामध्ये एका तेवीस वर्षीय नायजेरियन मुलीला अटक झाली. तिच्याजवळ लाखो रुपयांचे अमली पदार्थ सापडले. घटना छोटी असली, तरी हे वाटते तेवढे सोपे प्रकरण नाही. गेल्या काही महिन्यांत देशाच्या विविध भागांमध्ये जे अमली पदार्थ पकडले गेले, त्यामध्ये नायजेरियन नागरिकांचाच सक्रिय सहभाग प्रामुख्याने दिसून आला आहे. म्हणजेच एखादी फार मोठी आंतरराष्ट्रीय टोळी भारतासह आशियाई देशांमध्ये अमली पदार्थांचा सुळसुळाट करण्यासाठी सक्रिय असल्याचेच त्यावरून दिसून येते. नायजेरिया हा आफ्रिकन देश पूर्वीपासूनच अशा गैरगोष्टींसाठी कुख्यात आहे. मात्र, ह्या देशांतील गरीब मुलांना शिक्षणाची संधी प्राप्त व्हावी म्हणून भारत सरकार तेथील विद्यार्थ्यांना आपल्याकडील महाविद्यालयांत आणि विद्यापीठांमध्ये शिक्षणाची संधी देते. पण ह्याच संधीचा गैरफायदा घेऊन विद्यार्थी असल्याच्या बहाण्याने नायजेरियनांची टोळकी अमली पदार्थ व्यवहारांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतली आहेत आणि हे पुन्हा पुन्हा दिसून येते आहे. गेल्या एक दोन महिन्यांतील घटनाच पाहिल्या, तर हे जाळे केवढे मोठे आहे त्याची कल्पना येईल. म्हापशात पकडली गेलेली मुलगीही विद्यार्थी व्हिसावर भारतात आली होती, पण शिक्षण घेण्याऐवजी अमली पदार्थ तस्करीमध्ये गुंतली होती. तिने अमली पदार्थ बंगळुरूहून आणल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. काही दिवसांपूर्वीच बंगळुरूत स्थानिक पोलिसांनी अमली पदार्थ तस्करांवर टाकलेल्या छाप्यावेळी नायजेरियनांच्याच टोळक्याने पोलिसांवर लोखंडी सळ्यांनी जबर हल्ला चढवून अनेक पोलिसांना जखमी केले होते. बंगळुरूमध्येच अमली पदार्थ बनवण्याची एक प्रयोगशाळादेखील अलीकडच्याच काळात उजेडात आली आहे. बंगळुरूत यावर्षी आतापर्यंत पंधराजणांना अटक झाली, त्यात सर्वाधिक नायजेरियन आहेत. केवळ बंगळुरूच नव्हे, तर चेन्नई, कोची ह्या शेजारील राज्यांतील शहरांमध्ये देखील अमली पदार्थ प्रकरणात सापडलेली मंडळी नायजेरियनच आहेत. चेन्नईत एका स्थानिकासह दोघा नायजेरियनांना अमली पदार्थांसह अटक झाली. मुंबई विमानतळावर एका नायजेरियनाने आपल्या पोटात दडवून आणलेले अमली पदार्थ पकडले गेले, जे तो कोचीहून घेऊन आला होता. म्हणजे भारतामध्ये, त्यातही दक्षिण भारतामध्ये अमली पदार्थ तस्करीचे एक मोठे जाळे विणले गेलेले आहे आणि त्यामध्ये नायजेरियन नागरिकांचा मोठा सहभाग दिसतो आहे. सगळ्या छाप्यांमध्ये प्रामुख्याने नायजेेरियन नागरिकच सापडत आहेत हा निव्वळ योगायोग कसा म्हणता येईल? देशातील एक तृतीयांश अमली पदार्थांची तस्करी एक नायजेरियन आंतरराष्ट्रीय टोळी चालवते असे वृत्त मध्यंतरी एका राष्ट्रीय वृत्तपत्राने दिले होते. युरोपमध्ये गेल्या डिसेंबरमध्ये युरोपोलने सतरा देशांच्या मदतीने अमली पदार्थांविरुद्ध एक आंतरराष्ट्रीय मोहीम राबवली गेली, त्यामध्ये नायजेरियन माफिया त्या देशातून अमली पदार्थ युरोपमार्गे आशियाई देशांमध्ये नेत असल्याचे उघडकीस आलेले आहे. चार खंडांतील सोळा देशांमध्ये ह्या मोहिमेंतर्गत छापे पडले तेव्हा ही आंतरराष्ट्रीय टोळी अगदी संघटितपणे आणि नियोजनबद्ध रीतीने काम करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले होते. संपत्ती आणि संरक्षणाची हमी देऊन वावरणाऱ्या ह्या टोळीमध्ये लष्करात असतात तशी पदांची उतरंडही त्यांना आढळून आली होती. कोकेन, ॲम्फेटामाईन, मेथाम्फिटामाईन यांची कोट्यवधींची उलाढाल ह्या व्यवहारांत चालते. खुद्द नायजेरियाच्या सरकारने अमली पदार्थ तस्करीचा हा आवाका पाहून त्याविरुद्ध कायदे कडक करण्याचे प्रयत्न चालवले आहेत. अमली पदार्थ तस्करीच्या गुन्ह्यासाठी आजवर तेथे जन्मठेपेची तरतूद होती, ती फाशीच्या शिक्षेत बदलण्याचा प्रस्ताव तेथील संसदेत मांडला गेला आहे. त्यामुळे म्हापशात अटक झालेल्या ह्या मुलीचे धागेदोरे आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांशी कसे आहेत, तिला अमली पदार्थ कोणी पुरवले आणि तिचे ग्राहक कोण ह्या सर्व अंगांनी सखोल शोध घेण्याची जबाबदारी आता अमलीपदार्थविरोधी विभागाची आहे. त्यासाठी विशेषतः कर्नाटक, केरळ, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि तामीळनाडू पोलिसांचीही मदत घ्यावी लागेल, कारण ही विषवल्ली आतापर्यंत विशेषत्वाने दक्षिण भारतात खोलवर रुजलेली आहे आणि तिच्या फांद्या आता गोव्यामध्येही तरुणाईला विळखा घालू पाहात आहेत. राज्यात गेल्या पाच महिन्यांत अमली पदार्थ प्रकरणी नऊजणांना अटक झाली आहे आणि जवळजवळ चार कोटींचे अमलीपदार्थ पकडले गेले आहेत. त्यामुळे ही विषवल्ली अधिक फोफावण्याआधीच ती उपटून काढण्याची आणि त्यासाठी व्यापक आणि धडक कारवाईची गरज आहे. सरकारने हे प्रकरण फार गांभीर्याने घ्यावे आणि त्याच्या मुळाशी जावे.