विषवल्ली

0
252


केरी – पेडणे येथे एक कोटीचा अमली पदार्थ नुकताच जप्त करण्यात आला. घरामध्येच अमली वनस्पतींची लागवड करून मालामाल होण्याचे हे तंत्र आजवर विदेशी नागरिक राज्यात अवलंबित आले होते. शिवोली, मोरजी आदी ठिकाणी छाप्यांत असे प्रकार उजेडातही आले होते. गेल्या वर्षी तर कांदोळीमध्ये एका भाड्याच्या घरात तीन कोटींच्या अमलीपदार्थांचे घबाड सापडले होते. परंतु त्या सर्व प्रकरणांतील आरोपी हे विदेशी नागरिक होते. त्यामुळे स्थानिकांनी अशा प्रकारे अमली पदार्थ लागवड करण्याची ही बहुधा पहिलीच वेळ असावी. अमली पदार्थ व्यवहाराच्या प्रकरणांमध्ये सहसा बिगरगोमंतकीय किंवा विदेशी नागरिक मोठ्या प्रमाणावर आढळत असतात. वेळोवेळी पोलिसांकडून झालेल्या कारवायांमध्ये नायजेरियन, रशियन, नेपाळी, इस्रायली, पॅलिस्टिनी, जपानी अशा विविध नागरिकत्वाचे लोक आढळून आले आहेत. स्थानिकांचा सहभाग क्वचितच आढळून येतो. परंतु ताज्या प्रकरणामध्ये ज्या प्रकारे घरामध्येच गांजाची लागवड केली गेली होती, ते पाहाता असे प्रकार किनारपट्टी भागामध्ये फोफावलेले नाहीत ना याची खातरजमा पोलिसांनी आता करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
जेथे गिर्‍हाईक असते, तेथेच अशा गैरगोष्टी फोफावत असतात. प्रस्तुत प्रकरणातील अमली पदार्थ नेमके कोणासाठी लावले गेले होते, कोण त्याचा खरेदी व्यवहार करीत होते, त्याचे धागेदोरे कोणकोणाशी जुळलेले आहेत, या सर्वांचा आता तपास होण्याची आवश्यकता आहे. एखाद्या सुसंघटित आंतरराष्ट्रीय टोळीशी या प्रकरणाची तार जुळलेली असू शकते.
काही दिवसांपूर्वी चर्चेत आलेल्या सुशांतसिंह राजपूत मृत्युप्रकरणाचा संंबंध अमली पदार्थ सेवनाशी असल्याचे उघड झाल्यानंतर त्याचे धागेदोरे थेट गोव्याशी जुळले होते. नॅशनल क्राइम ब्यूरोनेही यापूर्वी आपल्या अहवालामध्ये गोवा हे एक अमली पदार्थ तस्करीचे केंद्र असल्याचे उघड केलेले आहे. अमली पदार्थांची पाळेमुळे खणून काढण्याची भाषा राज्यातील आजवरच्या अनेक सरकारांनी वेळोवेळी केली, परंतु ती कोणालाही उपटून फेकता आलेली नाहीत. पोलिसांनी छाप्यात जप्त करून मालखान्यात ठेवलेल्या अमलीपदार्थांची पोलिसांकडूनच पुन्हा विक्री होत असल्याचे धक्कादायक प्रकरण गोव्यामध्येच काही वर्षांपूर्वी उजेडात आलेले होते. त्या प्रकरणातील संशयितांना अद्यापही शिक्षा झाल्याचे ऐकिवात नाही. डूडू आणि अटालाच्या सुरस कहाण्या गोवेकरांनी सतत ऐकल्या, परंतु त्यांच्या गैरकृत्यांचा हिशेब झाल्याचेही दिसलेले नाही. उलट अशा गैरप्रकारांविरुद्ध छापे मारायला गेलेल्या पोलिसांवरच कारवाई झाल्याचीही उदाहरणे आहेत. हरमलमध्ये आकस्मिक छापा टाकला गेला तेव्हा छापा टाकणार्‍यांचीच खातेनिहाय चौकशी झाली हे गोमंतकीयांना ज्ञात आहेच. अशामुळे गैरकृत्यांमध्ये सामील असलेल्यांचे फावत असते. पकडले गेल्यानंतर अल्पावधीत जामिनावर सुटून पुन्हा तीच गैरकृत्ये करणार्‍यांचीही अनेक उदाहरणे आहेत. गेल्या वर्षी पकडला गेलेला एक नायजेरियन जामीनावर सुटला. खटल्याचा सोक्षमोक्ष लागेपर्यंत देश सोडून जाता येत नसल्याचा फायदा उठवून पुन्हा अमली पदार्थ व्यवहार करताना आढळून आला. राजधानी पणजीच्या मध्यवस्तीमध्ये कांपालच्या परेड मैदानावर अमली पदार्थांची बिनबोभाट विक्री होत असल्याचे एक प्रकरणही उजेडात आले होते. तिथे पडीक पाइपांमध्ये वास्तव्याला राहून अमली पदार्थ विक्री करणारी मंडळी त्या पैशातून चाळीस लाखांची सदनिका खरेदी करण्याच्या तयारीत होती. कायद्याचा जेव्हा धाक नसतो, तेव्हाच गैरगोष्टी फोफावत असतात.
अमली पदार्थ व्यवहार हे केवळ अवैध कृत्य नाही. ते समाजजीवनास घातक कृत्य आहे. नव्या पिढीला बरबादीकडे घेऊन जाणार्‍या या गोष्टी आहेत, त्यामुळे अमली पदार्थांना थारा देणार्‍या व्यक्तींची – मग त्या कोणीही का असेनात – अजिबात दयामाया होता कामा नये. ‘झीरो टॉलरन्स’ केवळ कागदावर दिसून चालणार नाही. तो प्रत्यक्षात दिसायला हवा. अशा गैरव्यवहाराच्या प्रकरणांमध्ये पोलीस यंत्रणा, लोकप्रतिनिधी यांच्यावरही संशयाची सुई येत असते. पेडण्यात नवे पोलीस निरीक्षक आल्यावरच एकाएकी अमली पदार्थ व्यवहारांवर छापे पडू लागले हे कसे काय?
कुर्टी – फोंडा येथे अमली पदार्थांवर छापा मारायला गेलेल्या पोलीस पथकावर प्राणघातक हल्ला झाल्याची एक ताजी घटना काल समोर आली आहे. हा तर अतिशय गंभीर प्रकार आहे. पोलीस यंत्रणेवर हात उगारण्याची गुन्हेगारांची हिंमतच कशी होऊ शकते? कोणाच्या पाठिंब्यावर ह्या उड्या मारल्या जात आहेत? अमली पदार्थांची कीड गोव्याला वेढत चालली आहे. अशा प्रकरणांची पाळेमुळे उखाडण्यासाठी सरकारने एखादा टास्क फोर्स निर्माण करावा आणि फोफावण्याआधीच ही विषारी वेल समूळ उपटून काढावी.