तीन हजारांहून अधिक लोकांचा सहभाग;
कलम 39 अ विरोधातील आंदोलन अधिक तीव्र
मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरुच ठेवण्याचा निर्धार; विरोधी पक्षांकडून भक्कम पाठिंबा
आमदार वीरेश बोरकर यांची प्रकृती खालावली;
नेते, आंदोलक रात्रीच आझाद मैदानावर परतले
भू-रुपांतराच्या मुद्द्यावरून पाळे-शिरदोनवासीयांनी आमदार वीरेश बोरकर यांच्या नेतृत्वात नगरनियोजन कायद्याच्या कलम 39 अ विरोधात सुरू केलेले आंदोलन काल चौथ्या दिवशी अधिक तीव्र झाले. पणजीतील आझाद मैदानावर काल सायंकाळी महाआंदोलनासाठी जमलेल्या हजारोंच्या संख्येतील आंदोलकांनी अचानक नगरनियोजनमंत्री विश्वजीत राणे यांच्या दोनापावल येथील बंगल्याकडे कूच केली. आंदोलकांनी मिळेल ती वाहने आणि मिळेल त्या मार्गाने विश्वजीत राणे यांच्या बंगल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी पोलिसांनी करंझाळे-दोनापावल सर्कल येथे बॅरिकेड्स लावून आंदोलकांची वाहने रोखली. तरी देखील अन्य मार्गांनी आंदोलक विश्वजीत राणेंच्या बंगल्यापर्यंत पोहोचलेच. यावेळी कलम 39 अ रद्द करावे, यासाठी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. तसेच यावेळी विविध पक्षांचे नेते, पाळे-शिरदोनचे ग्रामस्थ आणि राज्यभरातून आलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी भू-रुपांतराच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर जोरदार टीका केली. त्याचबरोबर, मागण्या मान्य होईपर्यंत हे आंदोलन सुरुच राहील, असे आंदोलकांनी स्पष्ट केले. आंदोलकांनी रात्री 11 वाजेपर्यंत नगरनियोजनमंत्र्यांच्या बंगल्याबाहेर ठिय्या मांडला. अन्य आंदोलकांनी दोनापावला येथे धडक दिली असली, तरी आमरण उपोषणामुळे प्रकृती खालावत चालल्याने आमदार वीरेश बोरकर हे आझाद मैदानावरच ठाण मांडून होते. त्यांची प्रकृती अधिकच खालावल्यामुळे आंदोलकांनी पुन्हा आझाद मैदानावर परतण्याचा निर्णय घेतला. रात्री 11.30 च्या सुमारास आंदोलक आझाद मैदानावर परतले. बोरकरांची प्रकृती खालावल्याने डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली. जिल्हाधिकारी अंकित यादव आणि विरोधी पक्षनेते युरी आलेमाव हे तेथील परिस्थितीचा आढावा घेत होते. दरम्यान, रात्री उशिरा बोरकर यांना खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले.
पाळे-शिरदोन गावातील जमिनींच्या रुपांतराला टीसीपीच्या कलम 39 अ द्वारे मान्यता देण्यात आली आहे. त्याविरोधात पहिल्यांदा शुक्रवारी आमदार वीरेश बोरकर यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक ग्रामस्थांनी नगरनियोजन खात्याच्या कार्यालयात रात्रभर आंदोलन केले होते. टीसीपी कार्यालयातून आंदोलक बाहेर जात नसल्याने अखेर पोलीस बळाचा वापर करून शनिवारी सकाळी आमदार वीरेश बोरकर व इतरांना कार्यालयातून बाहेर काढण्यात आले होते. त्यानंतर वीरेश बोरकर यांनी आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरू केले आहे. या एकूण आंदोलनाचा कालचा चौथा दिवस होता, तर बोरकर यांच्या आमरण उपोषणाचा तिसरा दिवस होता.
या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी रविवारी महाआंदोलनाची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार काल आझाद मैदानावर महाआंदोलनासाठी जवळपास 3 ते 4 हजार लोक जमले होते. संध्याकाळी 4.30 च्या सुमारास आझाद मैदानावर आंदोलक एकत्र झाल्यानंतर आयोजकांनी कुठल्याही प्रकारची भाषणबाजी न करता आपल्या टीसीपी कलम 39 अ रद्द करण्याच्या मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी थेट दोनापावल येथील मंत्री विश्वजीत राणे यांच्या बंगल्यावर मोर्चा नेण्याचा निर्णय जाहीर करून आंदोलकांना दोनापावल येथे कूच करण्याची सूचना केली. यावेळी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, कॉंग्रेसचे आमदार आल्टन डिकॉस्टा, ॲड. कार्लुस फेरेरा, आपचे आमदार क्रुझ सिल्वा, आमदार व्हेन्झी व्हिएगश, गोवा फॉरवडचे आमदार विजय सरदेसाई यांची उपस्थिती होती. तसेच, कॉँग्रेस, आरजीपी, आपचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांची उपस्थिती होती.
आझाद मैदानावर जमलेल्या आंदोलकांनी स्वतःच्या वाहनातून दोनापावलच्या दिशेने जाण्यास प्रारंभ केला. आंदोलकांनी आकस्मिकपणे जाहीर केलेल्या महाआंदोलनामुळे पोलीस यंत्रणेची चांगलीच धावपळ उडाली. मंत्री राणे यांच्या बंगल्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर पोलिसांनी बॅरिकेट्सचा वापर करून वाहतूक पूर्णपणे रोखून धरली, तरीही शेकडो आंदोलकांनी दोनापावल येथील मंत्री राणे यांच्या बंगल्याकडे पोहोचण्यात यश मिळविले. तसेच, मंत्री राणे यांच्या राजभवनाजवळील बंगल्याकडे पोहोचण्यातही आंदोलकांनी यश मिळविले. दोन्ही बंगल्याच्या बाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. दरम्यानच्या काळात आंदोलक आणि पोलीस यांच्यात बरीच झटापट झाली.
मंत्री राणे यांच्या दोनापावल येथील बंगल्याबाहेर आंदोलकांनी मोठी गर्दी केली होती. विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आमदार कार्लुस फेरेरा, आमदार व्हेन्झी व्हिएगस, आरजीपीचे मनोज परब व इतरांची उपस्थिती होती. आंदोलकांनी मंत्री राणे यांच्या बंगल्याबाहेर जोरदार घोषणाबाजी केली. टीसीपीचे कलम 39 अ रद्द करावे, ही एकच मागणी आंदोलकांनी लावून धरली होती.
जिल्हाधिकारी अंकित यादव, उपजिल्हाधिकारी, मामलेदार, पोलीस अधीक्षक हरिष मडकईकर यांनी दोनापावल येथे धाव घेऊन आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले.
टीसीपीचे कलम 39 अ रद्द केल्याशिवाय आणि पणजीचे पोलीस निरीक्षक विजयकुमार चोडणकर यांच्याविरोधात कारवाई केल्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असा इशारा अजय खोलकर यांनी दिला.
रात्रीचे 11 वाजत आले तरी आंदोलक राणेंच्या बंगल्यासमोर ठाण मांडून होते. यावेळी मनोज परब, युरी आलेमाव आणि अन्य काही आंदोलकांनी माध्यमांशी संवाद साधत मागण्या मान्य होईपर्यंत हे आंदोलन सुरुच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.
आमदार वीरेश बोरकर यांची प्रकृती अधिकच खालावल्यामुळे आंदोलकांनी पुन्हा आझाद मैदानावर परतण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे रात्री 11.30 च्या सुमारास आंदोलक आझाद मैदानावर परतले.
आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न; पण…
करंझाळे-दोनापावल येथे मुख्य रस्ता अडविण्यात आल्याने या मार्गावरून वाहतूक करणाऱ्या नागरिकांची बरीच गैरसोय झाली. तथापि, आंदोलकांनी मिळेल त्या मार्गाने दोनापावल येथील मंत्री विश्वजीत राणे यांचा बंगला गाठला.
लोक ठरवतील, तसे आंदोलन चालेल : आलेमाव
नगरनियोजन कायद्यातील कलम 39 अ विरोधात पुकारलेले आंदोलन लोक ठरवतील, त्याप्रमाणे चालेल. सरकारला हीच भाषा कळते, असे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव काल म्हणाले. वीरेश बोरकर यांच्याशी पोलिसांनी गैरवर्तन केले तेव्हा सभ्यता, शिष्टाचार कुठे गेला होता? असा सवालही आलेमाव यांनी विचारला.
… ही तर क्रांतीची सुरुवात : वीरेश बोरकर
नगरनियोजन कायद्यातील कलम 39 अ या विधेयकाला आम्ही विधानसभेतही विरोध केला होता. या प्रश्नी मुख्यमंत्री आणि नगरनियोजनमंत्र्यांचीही व्यक्तिश: भेट घेतली होती. सरकार आता हुकुमशाही मार्ग अवलंबत असून, सर्व व्यासपीठे संपल्याने मंत्र्यांच्या घरी धडक द्यावी लागली. ही तर क्रांतीची सुरुवात आहे, असे आमदार वीरेश बोरकर म्हणाले. दरम्यान, आमदार वीरेश बोरकर हे शनिवारपासून काल रात्रीपर्यंत आझाद मैदानावर ठाण मांडून बसले होते.