‘विश्वकर्मा’चा 40 हजार व्यावसायिकांना लाभ देणार

0
22

>> विश्वकर्मा योजनेचे प्रसार प्रमुख ॲड. नरेंद्र सावईकर यांची माहिती

केंद्र सरकारच्या बहुचर्चित व महत्वाकांक्षी विश्वकर्मा योजनेचा गोव्यातील तब्बल 40 हजार पारंपरिक व्यावसायिकांना लाभ मिळवून देण्यात येणार असल्याची माहिती काल दक्षिण गोव्याचे माजी खासदार व गोवा प्रदेश भाजपच्या वतीने नियुक्त पंतप्रधान विश्वकर्मा योजनेचे प्रसार प्रमुख ॲड. नरेंद्र सावईकर यांनी काल दै. ‘नवप्रभा’शी बोलताना सांगितले.

या योजनेसाठी आतापर्यंत राज्यातील 27 हजार पारंपरिक व्यावसायिकांनी यापूर्वीच नोंदणी केली असल्याचे सांगून राज्यातील चाळीसही मतदारसंघांत किमान 1 हजार पारंपरिक व्यावसायिकांची या योजनेसाठी नोंदणी करून लाभधारकांची संख्या तब्बल 40 हजारांवर पोचविण्याचा पक्षाचा मानस असल्याचे सावईकर यांनी स्पष्ट केले. हे काम सध्या मोठ्या प्रमाणात चालू असून, मागच्या दोन आठवड्यांतच ह्या योजनेसाठी सुमारे 15 हजार जणांनी नोंदणी केली असल्याचे सावईकर यांनी सांगितले.

विश्वकर्मा योजनेचा लाभ घेऊ पाहणाऱ्यांना नोंदणी करताना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी ही योजना सुलभ करण्यात आली आहे. राज्यातील पारंपरिक व्यावसाय करणारे सुतार, बोटी बनवणारे, शस्त्र बनवणारे, लोहार, कुलूप/चावी बनवणारे, हातोडा व टूल किट बनवणारे, सोनार, कुंभार, मूर्तीकार, चर्मकार, गवंडी, झाडू/चटई बनवणारे, खेळणी बनवणारे, नाभिक, फुलविक्रेते, धोबी, शिंपी, मासे पकडण्याचे जाळे तयार करणारे, रेंदेर आदींचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे.

या योजनेसाठी केंद्र सरकारने 13 हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. योजनेखाली कौशल्य विकास प्रशिक्षण व टूल किटसाठी लाभधारकांना 15 हजार रुपये देण्यात येतील त्याशिवाय प्रशिक्षण काळात भत्ता व मार्केटिंगसाठी सहाय्य करण्यात येणार आहे. तसेच लाभधारकांना पहिल्या टप्प्यात 1 लाख रुपये, दुसऱ्या टप्प्यात 2 लाख रुपये एवढे कर्ज 5 टक्के एवढ्या अल्प व्याजदरात उपलब्ध करून दिले जाणार आहे. मोबाईलशी जोडलेले आधार कार्ड, रेशनकार्ड, बँक पासबुक, पॅनकार्ड ही कागदपत्रे नोंदणीसाठी आवश्यक असल्याचे सावईकर यांनी स्पष्ट केले.