विशेष संपादकीय

0
4

नंदादीप

गोमंतकीय पत्रकारितेत आपल्या शांत निरामय व्यक्तिमत्वाचा आणि पत्रकारितेचा वारसा मागे ठेवून सुरेश वाळवे काल निजधामास गेले. अत्यंत शिस्तशीर जीवन, परखड स्पष्टवक्तेपणा आणि गोव्याविषयी आणि आपल्या गावाविषयीचे आत्यंतिक ममत्व ही त्यांच्या व्यक्तिमत्वाची ठळक वैशिष्ट्‌‍ये. त्यांनी आपल्य 22 वर्षांच्या संपादकीय कारकिर्दीत अगणित नवोदितांना लेखनासाठी उत्तेजन आणि प्रोत्साहन दिले. नवप्रभेच्या रविवार पुरवणीच्या माध्यमातून किती लिहित्या हातांना त्यांनी बळ दिले, किती नवोदितांना लेखक म्हणून ओळख दिली याची मोजदाद नाही. वाळवे यांना खरे तर चित्रपटसृष्टीत जायचे होते. चित्रपटाच्या नायकाला लागणारे उंचेपुरे गोरेपान व्यक्तिमत्व त्यांना लाभले होते. मात्र त्या क्षेत्रात त्यांना वाव मिळू शकला नाही. त्यामुळे राष्ट्रमतमधून त्यांनी आपल्या पत्रकारितेचे प्रारंभिक धडे गिरवले. पुढे नवप्रभा दैनिकात दीर्घकाळ सेवा बजावण्याची संधी त्यांना लाभली. तो काळ वेगळा होता. संपादक पदासारख्या जबाबदार पदावर काम करण्यास गोमंतकीय पत्रकार पात्र ठरू शकतात हा विश्वास सर्वप्रथम बा द सातोस्कर व नंतर लक्ष्मीदास बोरकर यांनी मिळवून दिला होता. त्यांच्या पावलावर पाऊल टाकून सुरेश वाळवे यांनी संपादक म्हणून आपली कारकीर्द घडवली. तो काळ गोमंतकाच्या सामाजिक जीवनातील वादळी कालखंड होता. कोकणी मराठी भाषावादाने वातावरण गढूळ झाले होते. अशा काळात नवप्रका सारख्या संतुलित वृत्तपत्रात दोन्ही भाषाभिमान्यांना स्थान देत वाळवे यांनी तटस्थ पत्रकारिते चवा आदर्श घालून दिला. माधव गडकरी, नारायण आठवले यांची झंझावाती पत्रकारिता आणि वाळवें यांची शांत संयत पत्रकारिता यात जमीन अस्मानाचे अंतर होते. आक्रमक शैलीच्या बाबतीत आपण त्यांची बरोबरी करू शकणार नाही माचे पुरेपूर भान वाळवेंना होते. म्हणूनच नर्मविनोदाचा आधार घेणारी खुसखुशीत चुरचुरीत अशी खास शैली त्यांनी विकसित केली. तिने सर्वसामान्य वाचकांवर आपले गारूड केले. साधे सोपे नित्य वापरातले शब्द, छोटी छोटी वाक्ये आणि विलक्षण लक्षवेधी शीर्षके यामुळे त्यांचे अग्रलेखही
एका विशिष्ट स्तरातील वाचकांत उदंड लोकप्रिय ठरले. संपादकपदावर असताना त्यांचे वागणे थोडे कडक दिसे. लोक त्यांना त्या काळात वचकून असत. पण निवृत्तीनंतर त्यांनी जाणीवपूर्वक आपल्या वागण्या बोलण्यात बदल केले. ते अधिकाधिक लोकाभिमुख होत गेले. विशेषतः आपल्या व्हाळशी गावाशी त्यांनी आपले अनुबंध अधिकाधिक दृढ केले. गावात असंख्य समाजोपयोगी कामे केली. बस निवारा बांधला, तळ्याचे सुशोभीकरण केले, रंगमंच उभारला. त्यांच्या घराशेजारी चौकात भले मोठे पेन उभारून गावकऱ्यांनी वाळवे यांच्या पत्रकारितेतील योगदानास गौरविले. वाळवे यांच्या निवृत्तीनंतर त्यांच्या पत्रकारितेतील प्रदीर्घ अनुभवांना शब्दबद्ध करण्याची विनंती आम्ही त्यांना केली होती. नवप्रभेतून त्यांचे ते लेखन सरळवाट या नावाने क्रमशः प्रसिद्ध झाले. पुढे ते पुस्तकरूपाने आले. त्यानंतर त्यांनी पत्रकारितेत असताना केलेल्या प्रवासांवर लिहिले. ते लेखन उडत उडत या शीर्षकाने प्रसिद्ध झाले. व्यक्तिचित्रपर लेखन स्मृतिविशेष या नावाने प्रकाशित झाले. ह्या प्रत्येक लेखनात वाळवे यांच्या लेखणीतील लालित्य आणि नर्मविनोद प्रत्ययास येतो. वाळवे यांचे व्यक्तिमत्व जसे सदाबहार होते तसेच त्यांचे लेखनही सदाबहार असे. कर्करोगासारख्या दुर्धर व्याधीशी त्यांनी ज्या निधड्या वृत्तीने झुंज दिली ती निव्वळ अतुलनीय होती. 100 पेक्षा अधिक किमो होऊनही आपला उत्साह त्यांनी कधी कमी होऊ दिला नाही. आपल्या मृत्युपश्चात आपल्याला शांततेत महायात्रेस निघता यावे याची तयारी त्यांनी आधीच करून ठेवली होती. तसे स्पष्ट निर्देश दिले होते. आपल्या मागून सांत्वनपर भेटींचा उपद्रव कुटुंबीयांस होऊ नये हाच त्यामागील हेतू होता. वाळवे यांच्यासारख्या स्वच्छ प्रामाणिक पत्रकाराचे जाणे ही गोमंतकीय पत्रकारितेची फार मोठी हानी आहे. हा शांत तेवता नंदादीप पत्रकारांच्या येणाऱ्या पिढ्यांना सुसंस्कृत निरामय पत्रकारितेची अखंड प्रेरणा देत राहील यात शंकाच नाही.