मी रिताच आलो होतो, जाणार रित्या हातांनी |
मज दान कसे हे पडले, भरलेले पानोपानी ॥
ही कृतज्ञता ह्रदयीची शब्दांत कोणत्या ओवू |
त्या अनंत अज्ञाताला नजराणा कसला देऊ? —-गोपाळ मयेकर
गोव्याच्या सांस्कृतिक जीवनात सदैव सळसळत राहिलेला आणि भोवतालच्या माणसांना सदैव अर्थपूर्ण जीवनाची प्रेरणा देणारा प्राचार्य गोपाळराव मयेकर नामक ‘सोन्याचा पिंपळ’ काल अचानक उन्मळून पडला. गोमंतकाच्या मराठी चळवळीचा आधारस्तंभ हरपला. ज्ञानेश्वरांच्या शब्दकळेत ज्याचे अवघे आयुष्य चिंब भिजून गेले होते, असा एक प्रगल्भ तत्त्वचिंतक, एक फर्डा ओजस्वी वक्ता, कुशल शिक्षणतज्ज्ञ, विद्यार्थिप्रिय अध्यापक, धुरंधर राजकीय नेता, कार्यक्षम प्रशासक, उत्तम संघटक कार्यकर्ता आणि एक हळवा भावकवी अशा गोमंतकातील एका अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाला आपण मुकलो आहोत. ज्ञानेश्वरीमध्ये तर मयेकर सरांचे जणू पंचप्राण गुंतलेले होते. मूळच्याच रसाळ अशा त्या दैवी ग्रंथाचा तितकाच रसपूर्ण अन्वयार्थ ऐकावा तर तो मयेकर सरांच्याच वाणीतून. साक्षात् सरस्वतीच जणू त्यांच्या जिव्हेवर विलसत असे. आपल्या अगणित व्याख्यानांतून त्यांनी ज्ञानेश्वरींची अंगोपांगे अपूर्व रीतीने उलगडली.
विद्यादानाचे आपले कार्य करीत असतानाच दैवयोगाने ते राजकारणाकडे ओढले गेले. भाऊसाहेब बांदोडकर मंत्रिमंडळामध्ये शिक्षणमंत्रीही झाले. पुढे बांदोडकरांशीच बेबनाव झाल्याने त्यांचा मार्ग वेगळा झाला आणि ते राजकीय पर्व संपले, परंतु मंत्रिपदाची झूल उतरल्यावर तत्क्षणी सरकारी डामडौल परत करून शासकीय बंगल्यावरून टॅक्सीने घरी जाणारे मयेकर सर राजकीय क्षेत्रामध्येही आपले वेगळेपण ठसवून गेले. पुढे नवव्या लोकसभेच्या खासदारकीची संधी त्यांच्याकडे चालून आली, तेथेही संसदेमधील आपल्या पहिल्याच भाषणामध्ये मयेकर सरांनी ज्ञानेश्वरांच्या पसायदानाचे वाचन करीत त्या विश्वबंधुत्वाच्या मूल्यांचा गजर केला होता.
राजकारणापेक्षा मयेकर सर खर्या अर्थाने रमले ते शिक्षणक्षेत्रातच. देवगडच्या महाविद्यालयाचे इवलेसे रोप लावून ते गगनावेर्ही नेणार्या सरांना तेथे उदंड प्रेम लाभले. गोव्यातील बांदेकर महाविद्यालयाचे प्राचार्यपदही त्यांनी भूषविले खरे, परंतु देवगडचे कॉलेज हा सरांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय होता. तेथील तत्कालीन विद्यार्थ्यांसाठी तर मयेकर सर हे दैवत होते व आजही आहे. ‘मुलांच्या रूपाने धगधगते चैतन्य शिक्षकाच्या समोर उभे असते. त्या निर्मितिक्षम मनांचे तरंग आणि विविध कार्यशक्तींची उचंबळ याचा जिवंत प्रत्यय शिक्षकाला घेता आला नाही तर त्याला त्याच्या व्यवसायाचा जीवनतंतूच गवसला नाही असे म्हणावे लागेल’, असे मयेकर सरांचे म्हणणे होते. आपल्या छायेत आलेल्या विद्यार्थ्यांना त्यांनी खर्या अर्थाने घडवले. त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी ते संस्कारांचे विद्यापीठच होते. ‘मार्गाधारे वर्तावे | विश्व हे मोहरे लावावे | अलौकिक नोहावे | लोकांप्रती’ ह्या ज्ञानेश्वर माऊलींच्या शब्दांना तंतोतंत जागणारे जीवन मयेकर सर जगले.
मराठी हा गोमंतकाचा आत्मस्वर आहे ही ठाम धारणा असल्याने शतकानुशतकांचा वारसा घेऊन आलेल्या ह्या भाषेच्या चळवळीमध्ये ते हिरीरीने उतरले. गोमंतक मराठी अकादमीचे पहिले अध्यक्षपद त्यांच्याकडे चालून आले. पुढे कै. शशिकांत नार्वेकरांनंतर पुन्हा दीर्घकाळ त्यांनी ते भूषविले. मराठीची ही ध्वजा अभिमानाने खांद्यावर अखंड मिरविली आणि गोमंतकासाठी मराठीची पंचसूत्रीही शब्दबद्ध केली. ‘मज दान कसे हे पडले’ ह्या भल्यामोठ्या आत्मचरित्रामध्ये मयेकरांनी आपल्या जीवनाचे सर्व पदर मोकळेपणाने उलगडले आहेत. त्यांच्यामध्ये ‘पूस आसवे डोळ्यांमधली नकोस पाहू वळून मागे, तुटण्यासाठी जुळले नव्हते दोघांमधले नाजूक धागे’ अशी हळवी प्रेमकविता लिहिणारा भावकवीही दडलेला होता. त्यांचा हा ‘स्वप्नमेघ’ अलीकडेच पुनःप्रकाशित झाला होता. मानवी जीवनातील आनंदप्रधानतेचे मूळ अधिष्ठान ‘संस्कृती’हे आहे असे सरांचे सांगणे असे. एका मनोरम उदात्त संस्कृतीच्या प्रकाशात अवघे जीवन न्हाऊन निघालेल्या मयेकर सरांच्या वैयक्तिक जीवनामध्ये दुःखाचे विलक्षण प्रसंगही आले, परंतु खचून न जाता ही ‘विस्तवाची पालखी’ कर्तव्यभावनेने त्यांनी वाहविली. आज आपल्यातून अनंताच्या यात्रेला जात असताना आपल्या प्रिय सख्या ज्ञानराजाला जणू ते सांगत असतील – ‘तुझ्या अमृताच्या खुणा भोवताली | तुझ्या मोगर्याच्या प्रफुल्लित वेली | तुझ्या आरतीचा मुका शब्द झालो | तुझ्या दर्शनाने प्रकाशात न्हालो ॥