>> शेतकर्यांचा केंद्र सरकारला इशारा
सरकारने विशेष अधिवेशन बोलावून कृषी कायदे रद्द करावेत अन्यथा दिल्ली बंद करू असा इशारा नवी दिल्लीत आंदोलन करणार्या शेतकर्यांना केंद्र सरकारला दिला आहे. सरकारने पंजाबच्या शेतकर्यांव्यतिरिक्त संपूर्ण देशातील शेतकर्यांना चर्चेसाठी बोलवावे, असेही आंदोलक शेतकर्यांचे म्हणणे आहे. आम्ही आमची बैठक समाप्त केली असून, सुरुवातीला सरकारने केवळ पंजाबच्या शेतकर्यांना बोलावले होते. चार प्रतिनिधींची समिती बनवण्याचा सरकारचा प्रस्ताव आम्ही नाकारला. देशातील इतरही शेतकर्यांना चर्चेला बोलवावे हाच त्यामागील उद्देश होता. हे केवळ पंजाबच्या शेतकर्यांचे आंदोलन नाही. मात्र सरकार आमच्यात फूट पाडत असल्याचा आरोप प्रा. दर्शनपाल यांनी केला.
आम्ही असा निर्णय घेतला आहे की, आमच्या पंजाबच्या शेतकर्यांव्यतिरिक्त संपूर्ण देशातील शेतकर्यांच्या नेत्यांना चर्चेसाठी बोलवावे असे त्यांनी म्हटले. आम्ही येत्या ५ तारखेला संपूर्ण देशात मोदी सरकारचा पुतळा जाळण्याचे आवाहन केले आहे. संपूर्ण देशात आम्ही ५ तारखेला धरणे देऊ. ज्या खेळाडू आणि कलाकारांना राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत, ते खेळाडू आणि कलाकार ७ तारखेला पुरस्कार परत देणार आहेत, अशी माहितीही प्रा. दर्शनपाल यांनी दिली.