विशालहृदयी मर्यादापुरुषोत्तम श्रीराम

0
6

योगसाधना ः 688, अंतरंगयोग ः 274

  • डॉ. सीताकांत घाणेकर

“तुला माहीत आहे भरता? एखाद्या कुळात जेव्हा चारित्र्यवान अन्‌‍ धर्मपरायण पुत्र जन्म घेतो, तेव्हा त्याचे जीवन त्याच्या असंख्य पिढ्यांतील पितरांच्या अपराधांचे क्षालन करते. ज्या आईने तुझ्यासारख्या पुण्यात्माला जन्म दिला असेल तिला दंड कसा बरे देता येईल?”

भगवंताने बनवलेल्या विश्वाचा विस्तार फार प्रचंड आहे. त्यात कितीतरी विविधता आहे- पाच तत्त्वे, पहाड-पर्वत, नाले-नद्या-सागर-महासागर, झाडेपेडे, फुले-फळे, जीवजंतू, कृमीकिटक, पशुपक्षी-प्राणी… थोडे जरी चिंतन केले तरी लक्षात येते की हा सृष्टिकर्ता परमेश्वर किती महान, बुद्धिमान असेल! कोणतीही गोष्ट नुसती बनवली म्हणून चालत नाही, तर तीन कार्ये नियमित व्हावीच लागतात- बनवणे, सांभाळणे आणि नष्ट करणे. करोडो वर्षांपासून हे सृष्टिचक्र असे चालूच आहे व पुढेदेखील चालू राहणार.

भारतीय तत्त्वज्ञानाप्रमाणे तीन प्रमुख देव ही कार्ये सांभाळतात. बनवणारा ब्रह्मदेव, सांभाळणारा व पालन करणारा विष्णुदेव व संहार करणारा शिवदेव. यांत प्रमुख देव मानला जातो तो शिवदेव म्हणून त्याला ‘महादेव’देखील म्हणतात.
ऋषीप्रणीत तत्त्वज्ञानाप्रमाणे देवाची दोन रूपं प्रमुख आहेत- सगुण साकार व निर्गुण निराकार.

  1. सगुण साकार ः आमच्यासारख्या सामान्य अल्पबुद्धीच्या व्यक्तींना समजण्यासाठी हे रूप आल्हाददायक आहे. देवदेखील आपल्यासारखाच मनुष्यरूपात आहे- पुरुष देवरूपात व स्त्री देवीरूपात. ही देव-देवीदेखील वेगवेगळ्या रूपांत आहेत. त्यांची कार्येही वेगवेगळी.
    उदा. देवी सरस्वती विद्यादायिनी, देवी महालक्ष्मी धनसंपत्तीदायिनी, दुर्गादेवी शक्तिदायिनी. त्याशिवाय इतर कार्ये सांभाळण्यासाठी विविध देवदेवता आहेत- गणपती, हनुमान, दत्तात्रेय, इंद्र, सूर्यदेव, अग्निदेव, वासुदेव वगैरे… विविध कथारूपाने त्यांची चरित्रे सांगून लहानमोठ्यांना त्यांची ओळख केली जाते. माझ्या बालपणी संध्याकाळच्या वेळी कुटुंबातील बहुतेक सदस्य- स्त्रिया व मुले- एकत्र बसून देवकुडीच्या बाहेर अनेक गोष्टी ऐकत असत. यामुळे भगवंताबद्दल विश्वास, प्रेम, श्रद्धा आपोआप वाढत असे. त्याशिवाय विविध क्षेत्रांतील महान व्यक्ती, संत-महापुरुष, राजे-रजवाडे यांच्या गोष्टीदेखील ऐकवत असत. सारांश, लहानवयापासूनच कोवळ्या मनावर चांगले परिणाम होत असत. मुले संस्कारी बनत असत.

आजच्या तथाकथित प्रगतीच्या काळात वर्तमानपत्रे, टीव्ही, व्हॉट्सॲप वगैरे प्रसारमाध्यमे या गोष्टी करत असतात.
रामायण-महाभारतातील असंख्य कथा यापूर्वी ऐकलेल्या- वाचलेल्या होत्या. त्यांच्यापासून काही बोध घेतला. पण हल्लीच आलेल्या एका व्हॉट्सॲपवरील संदेशाने माझे लक्ष वेधून घेतले. हा संदेश फार चिंतनशील व बोधदायक वाटला. म्हटले यावर थोडे भाष्य करून वाचकांशी संपर्क साधावा.
रामायणातील एक घटना

  • शरयू नदीच्या तटावर राम तिन्ही भावांसह एक दिवस एकत्र बसले होते. त्यावेळी भरताने श्रीरामास एक प्रश्न केला- “दादा, एक गोष्ट विचारू का?”
    रामानी परवानगी दिल्यावर भरत म्हणाला ः “माता कैकेयीने तुला वनवास मिळावा यासाठी मंथरेसोबत जे कारस्थान केले, ते कारस्थान म्हणजे राजद्रोहच नव्हता का?
  1. एकीकडे- राज्याचा भावी राजा व त्याच्या पत्नीला चौदा वर्षे वनवास भोगावा लागला.
  2. दुसरीकडे- महाराज दशरथ यांचा पुत्रवियोगाच्या केवळ कल्पनेनेच अपमृत्यू झाला.
    अशा कारस्थानासाठी (सामान्य नियमानुसार) तर मृत्युदंड दिला जातो. मग तू जी तुझीही आई आहे अशा कैकयीला दंड का नाही दिलास?”
    तरुणपणात जेव्हा रामायणातल्या घटनांवर विचार व चिंतन करायला लागलो तेव्हा मलादेखील हा प्रश्न पडायचा. पण माझ्या अल्पबुद्धीला उत्तर सापडत नव्हते. आज पुष्कळ दशकांनंतर श्रीरामाचे उत्तर मिळाले.

रामचंद्र हसले व म्हणाले, “तुला माहीत आहे भरता? एखाद्या कुळात जेव्हा चारित्र्यवान अन्‌‍ धर्मपरायण पुत्र जन्म घेतो, तेव्हा त्याचे जीवन त्याच्या असंख्य पिढ्यांतील पितरांच्या अपराधांचे क्षालन करते. ज्या आईने तुझ्यासारख्या पुण्यात्माला जन्म दिला असेल तिला दंड कसा बरे देता येईल?”
भरताचे समाधान झाले नाही. आणि ते बरोबरच आहे म्हणा. आमच्यासारख्या सामान्यांनादेखील ते विचार सर्वतोपरी पटत नसतील, पण काहीतरी तथ्य आहे हे खरे.
जीवनाचे तत्त्वज्ञान आम्हाला किती समजणार? त्यासाठी श्रीरामासारखाच मर्यादापुरुषोत्तम श्रीविष्णूचा अवतार हवा.
भरत पुढे म्हणाला,
“दादा, हा तर मोह आहे. आणि राजाचा कायदा मोहापासून मुक्त असायला हवा. तेव्हा दादा, तू कृपा करून मला एका राजाप्रमाणे उत्तर दे की तू माता कैकेयीला दंड का दिला नाहीस? असं समज- तुला हा प्रश्न तुझा लहान भाऊ नव्हे तर अयोध्येतील एक सामान्य नागरिक विचारतो आहे.”
खरंच, भरताचा हा प्रश्न अगदी सरळ व तर्कशास्त्राला धरून आहे. आपणातील बहुतेकजण असाच विचार करणार. पण श्रीराम आपल्यापेक्षा वेगळे. त्यांचे आचरण व कृती वेगळीच असणार. त्यांची प्रतिक्रिया बघूया. कारण प्रश्न थोडा वेगळाच होता. राज्याच्या कायद्याप्रमाणे रास्त होता.
श्रीराम थोडे गंभीर झाले. काही क्षण मौन राहिले. उत्तर देण्यासाठी कदाचित विचार करीत होते. कारण त्यांचे उत्तर म्हणजे मर्यादा सांभाळून- सर्व तऱ्हेच्या- अपेक्षित होते.

ते म्हणाले, “भरता, आपल्या नात्यातल्या किंवा जवळच्या कुणा व्यक्तीला त्याच्या अपराधाबद्दल शिक्षा न करणे हाच या सृष्टीचा सर्वात कठोर असा दंड आहे. माता कैकेयीने केवळ एका अपराधाचा खूप कठोर असा दंड भोगला आहे-

  1. वनवासाच्या चौदा वर्षांत आपण चारही भाऊ आपापल्या जागी राहून त्या काळच्या विपरित परिस्थितीशी झगडत होतो. पण माता कैकेयी प्रत्येक क्षणाला केवळ आणि केवळ फक्त मरणच अनुभवत होती.
  2. आपल्या एका अपराधासाठी तिने आपल्या पतीला गमावले. आपले चारही पुत्र ती गमावून बसली. स्वतःचे सर्व सुख-समाधान तिने गमावले. तरीही आपल्या हातून घडलेल्या अपराधाच्या सतत जाणिवेतून ती कधीच मुक्त झाली नाही. वनवास संपला तसा परिवारातील उर्वरित सगळेच सदस्य आनंदी व सुखी झाले, पण तिला कधीच समाधान लाभू शकले नाही.”
    खरेच, श्रीरामाचे हे अत्यंत क्रांतिकारी विचार आहेत. यातील प्रत्येक शब्द, प्रत्येक ओळ मन व हृदय सद्गतीत करते. विचार येतो की विष्णूचा हा अवतार किती विशाल हृदयाचा असेल!
    माझ्या मर्यादित ज्ञानात अशी कोणतीही सज्जन व प्रागतिक विचारांची व्यक्ती मला तरी दिसत नाही. विश्वात प्रत्येक क्षेत्रात अनेक महापुरुष होऊन गेले; पण रामासम दुसरी कुणीही व्यक्ती झाली असे मला वाटत नाही.
    मुख्य म्हणजे अजूनपर्यंत रामाचे सगळे समजावणे संपले नाही. ते पुढच्या वेळी बघू.
    सध्या माझे मन एवढे सद्गतीत झाले आहे व बुद्धी एवढी जड झाली आहे की दुसरा काही विचारच मनात येत नाही. फक्त श्रीरामाच्या पवित्र नामाचा जप करीत राहावा असेच वाटत आहे.

प्रत्येक योगसाधकाला नम्र विनंती आहे-

  1. असे संदेशावरून आलेले लेख स्वतः चिंतन करून लिहावे. अभ्यासूला माणसाला याचा फार उपयोग होईल. विचार करण्यासाठी चालना मिळेल. ज्ञानात भर पडेल.
  2. सद्विचाराप्रमाणे आचरण सुधारले तर ताणतणाव कमी होऊन संपूर्ण जीवनविकास होईल.