- अनुप प्रियोळकर
भाईंनी पहिले सूर्यदर्शन भर दुपारी मुंबईमध्ये गावदेवी या उपनगरात घेतले व शेवटचा श्वास पुण्यात जोशी हॉस्पिटलमध्ये घेतला. भाईंच्या एकंदरित कार्यकर्तृत्वाने पार्ल्याच्या ‘त्रिंबक सदन’ला विशेष वैभव प्राप्त झाले. या परिसरात आजही भाईंच्या नावाचा सुगंध दरवळतोय असा भास आमच्यासारख्या त्यांच्या अनेक चाहत्यांना होत असतो.
भूतलावरचा प्रत्येक प्रदेश अनेक वैशिष्ट्यपूर्ण कारणांमुळे मनुष्यजगाला परिचित असतो. निसर्गाचा वैविध्यपूर्ण आविष्कार वा एखाद्या व्यक्तीच्या अद्वितीय कामगिरीमुळे त्या प्रदेशाला वेगळी सामाजिक किंवा सांस्कृतिक ओळख प्राप्त झालेली असते. महाराष्ट्र भूमीसुद्धा अनेक संत-महंतांच्या अद्वितीय अशा कर्तृत्वाने विश्वाला परिचित आहे. बाराव्या शतकात संत ज्ञानेश्वरांपासून संतवाङ्मयाची निर्मिती झाली. एकोणिसाव्या शतकात प्रतिभावंत मराठी साहित्यिक-नाट्यकारांनी मराठी भाषेचे वैभव समृद्ध केले.
संत ज्ञानेश्वरांची आठवण होताच आळंदी गाव आपल्या डोळ्यासमोर येतो. शिवाजी महाराजांचा वैभवशाली प्रवास- किल्ले रायगड, सिंहगड, प्रतापगड, पन्हाळा लक्ष वेधून घेतात. पेशवेकाळ आठवताच ज्ञाननगरी म्हणून प्रसिद्ध अशा पुणे शहरात येऊन पोहोचतो. लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांमुळे निसर्गरम्य अशा रत्नागिरी शहराची झलक डोळ्यांसमोर येते. कविश्रेष्ठ पद्मश्री बा. भ. बोरकरांची ‘माझ्या गोव्याच्या भूमीत’ ही कविता आठवताच आपण निसर्गाने रसरशीत नटलेल्या व देवभूमी म्हणून प्रसिद्ध असलेल्या गोमंतकात पोहोचल्याचा प्रत्यय येतो. अशा अनेक मातब्बर व्यक्तींच्या कर्तृत्वामुळे प्रत्येक भूप्रदेशाची श्रीमंती आपल्या मनात कुतूहल निर्माण करते आणि नकळत आपले पाय त्या दिशेने वळत असतात.
मुंबई शहरातील पार्ले या उपनगरालासुद्धा अशाच एका वैभवशाली व्यक्तीच्या निवासस्थानामुळे एक अनोखी ओळख प्राप्त झालेली आहे. ती व्यक्ती म्हणजे, आपणा सर्वांचे लाडके व्यक्तिमत्त्व आदरणीय, श्रद्धेय महाराष्ट्रभूषण पु. ल. देशपांडे यांच्यामुळे. संपूर्ण मराठीविश्वात त्यांना ‘भाई’ या आदरणीय नावाने ओळखले जाते. पु.लं.नी मराठी साहित्य, नाट्य, संगीत, हार्मोनिअम, दिग्दर्शन अशी एकाहून एक क्षितिजे पादाक्रांत करून मराठीविश्वाला गर्भश्रीमंती मिळवून दिली. पार्ल्याचे पार्लेश्वर मंदिर जेवढे प्रसिद्ध आहे, तेवढेच ‘अजमल’ रस्त्यावर उभे असलेले ‘त्रिंबक सदन’ पु.लं.च्या निवासस्थानामुळे परिचित आहे. त्यामुळे आजही मराठी माणसाची पावले त्यांच्यावरील प्रेमामुळे नकळत त्या दिशेने वळतात.
भाईकाकांचा जन्म 8 नोव्हेंबर 1919 ला मुंबई शहरात गावदेवी येथे कृपाळ हेमराज चाळीत भर दुपारी झाला. तेथून त्यांचं कुटुंब 1927 साली पार्ले या उपनगरातील एका चाळीत स्थलांतरित झालं. त्यांचं बालपण व शालेय जीवन पार्ल्यातच गेलं. पुढे कालानुरूप कुटुंबातील सर्व मंडळी मावतील अशी चार मजली इमारत तिथे उभी राहिली. त्या वास्तूला त्यांच्या आजोबांचं नाव ‘त्रिंबक सदन’ असे देण्यात आले. या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर भाईंची सदनिका व त्यांचे तिसरे बंधू चित्रकार व नाट्यकलाकार श्री. रमाकांत देशपांडे यांच्या कुटुंबाचे वास्तव्य आहे. दुसऱ्या मजल्यावर त्यांचे दुसरे बंधू श्री. उमाकांत देशपांडे व त्यांचे कुटुंब राहते. भाईंच्या खोलीत त्यांची आई श्रीमती लक्ष्मीबाई देशपांडे राहत.
या इमारतीत भाईचं वास्तव्य अल्पकाळासाठी झालेले असेल. कारण आपल्या 81 वर्षांच्या आयुष्यात भाईंनी जवळ जवळ 20 ठिकाणी वास्तव्य केले व अनेक इमारती व शहरांना आपल्या परिसस्पर्शाने एक नवी ओळख निर्माण करून दिली. एम.ए.ची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर सन 1956 मध्ये भाई पहिल्यांदा बेळगावच्या राणी पार्वतीबाई महाविद्यालयात मराठी विषयाचे प्राध्यापक म्हणून रूजू झाले. जेमतेम एका वर्षाचा नोकरीचा काळ पूर्ण करून ते दुसऱ्या वर्षी मुंबईला परतले. भाईंनी पुढील शिक्षण, नोकरी व इतर अनेक सांस्कृतिक जबाबदाऱ्यांमुळे आपली अनेक निवासस्थाने बदलली. परंतु त्यांचं अधूनमधून पार्ल्याच्या निवासस्थानी येणं असायचंच. चतुर्थी उत्सवाला भाई आवर्जून पार्ल्याला यायचे. भाई पार्ल्याला येणार अशी कुणकुण लागताच त्यांचे साहित्य, संगीत, काव्य व गायन क्षेत्रांतील मातब्बर असे अनेक मित्र त्रिंबक सदनमध्ये हजर व्हायचे. सर्व गायक मंडळी जमल्यावर मैफलीला सुरुवात व्हायची. प्रत्येकाकडून एकाहून एक गाण्यांची मागणी व्हायची. या मैफलीला वेळेचे बंधन नव्हते. पूर्वाश्रमीच्या ‘त्रिंबक सदन’ने साहित्यिक गप्पा-गोष्टी व संगीताच्या मैफलींची फार मोठी श्रीमंती अनुभवली. जुन्या इमारतीत त्या काळी विशेष सुविधा उपलब्ध नव्हत्या. परंतु प्रत्येक भिंत संगीताच्या व हसण्याच्या आवाजाने आनंदून गेली असणार यात शंकाच नाही! या इमारतीला भाईंच्या कर्तृत्वामुळे प्राप्त झालेल्या वैभवाला स्मरून मराठी रसिकांची मान नकळत त्या दिशेने वळते.
पूर्वी ‘ज्ञाननगरी’ म्हणून महत्त्व प्राप्त झालेल्या पुणे शहरात कधी भाई स्थायिक झाले होते. भंडारकर इन्स्टिट्यूट रस्त्यानजीक ‘मालती माधव’ या इमारतीत पहिल्या मजल्यावर त्यांचे वास्तव्य होते. सन 1998 मध्ये भाई एका महिन्यासाठी बाबा आमटेंच्या ‘आनंदवना’त राहून, तिकडच्या वेगळ्या जगाची ओळख व त्या विश्वाचा आनंद अनुभवून परत पुण्यात आले.
कालपरत्वे सन 2021 मध्ये जुनी त्रिंबक सदन इमारत पाडून त्या जागेवर नवा साज व नवा दिमाख प्राप्त झालेली भव्य अशी सात मजली इमारत अवघ्या तीन वर्षांच्या कालखंडात उभी राहिली. 4 जानेवारी 2026 रोजी भाईंचे पुतणे श्री. जयंत व सौ. दिपा यांच्या वैवाहिक जीवनाचा अर्धशतकीय प्रवास पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित कौटुंबिक कार्यक्रमात सहभागी होण्याचा योग जुळून आला. त्यानिमित्ताने पार्ल्याला भेट देण्याची मला संधी मिळाली. नवीन इमारतीत दुसऱ्या मजल्यावर जयंतची सदनिका आहे. याच वास्तूचा सातवा मजला भाईंची नात (जयंतची मुलगी) सौ. नेहा कामत यांनी आरक्षित केला आहे. एकंदरित वास्तूची भव्यता भाईंच्या नावाला शोभेल अशीच आहे. जोपर्यंत मराठी माणूस मराठी भाषेचे वैभव अनुभवत राहील तोपर्यंत प्रत्येकजण त्या वास्तूकडे अभिमानाने बघेल. भाई जरी आज जरी हयात नसले तरी इमारतीत प्रवेश करताच भाई व काकीचे छायाचित्र हसतमुखाने आपले स्वागत करीत आहे असा भास होतो.
भाईंनी पहिले सूर्यदर्शन भर दुपारी मुंबईमध्ये गावदेवी या उपनगरात घेतले व शेवटचा श्वास पुण्यात जोशी हॉस्पिटलमध्ये घेतला. भाईंच्या एकंदरित कार्यकर्तृत्वाने पार्ल्याच्या ‘त्रिंबक सदन’ला विशेष वैभव प्राप्त झाले. या परिसरात आजही भाईंच्या नावाचा सुगंध दरवळतोय असा भास आमच्यासारख्या त्यांच्या अनेक चाहत्यांना होत असतो. दोन वर्षांपूर्वी जुनी ‘त्रिंबक सदन’ची इमारत पाडून त्या जागी ‘पार्ल्याचं त्रिंबक सदन’ या नावाने नवा साज व नव्या दिमाखात भाई काकांचं स्मारक उभं झालं आहे. तेथील लोकांची रेलचेल पाहून सहजपणे तोंडून शब्द उमटतात- ‘विले पार्ले त्रिंबक सदन- पुनःश्च हरी ॐ.’