- डॉ. अशोक कामत
शिक्षक, शिक्षण संस्थाचालक आणि संवर्धक यासाठी अवघे जीवन वेचणारे कार्यकर्ते पुष्कळ झाले; पण सुरेश गुंडू आमोणकर हे सारे करीत असताना ज्ञानोपासक म्हणूनही कायम व्रतस्थ राहिले. त्यांच्या ‘पद्मश्री’मुळे त्या सन्मानाची सार्थकता वाढली आणि अखेरच्या देहदानामुळे सुरेशभाऊही अमर झाले!
गोमंतकाचे शैक्षणिक शिल्पकार गुंडू सीताराम आमोणकर. उत्तम शिक्षक, शिक्षण संस्थाचालक आणि नवी राष्ट्रीय पिढी घडविणारे. त्यांचे कार्य स्वीकारून ते समर्थपणे पुढे नेणारे शिक्षणतज्ज्ञ, भाषाप्रभू आणि अनुवादक म्हणून गोमंतकात आंतरभारती रुजविण्याचे कार्य करणारे पद्मश्री सुरेश गुंडू आमोणकर हे माझे गेल्या चार दशकांचे एक जीवलग स्नेही. त्यांच्यामुळे मला माझ्या मायभूमीची महती अधिक उमजली. तिथे वारंवार जाऊन काही भरीव कार्ये पाहता आली. ती अधिक प्रभावी ठरावीत म्हणून काही सहभागही शक्य झाला.
कोंकणी आणि मराठी यांचा वाद राजकारण्यांनी सतत धुमसत ठेवला. आमोणकरांसारख्या प्रज्ञासंपन्न ज्ञानोपासकांनी या दोन्ही बोलीभाषांमध्ये संवाद कसा असावा, याचा वस्तुपाठ कायम सादर केला. ‘आधी केले, मग सांगितले’ असे त्यांचे होते. त्यांचे माझ्या आधी जाणे मला अखेरपर्यंत जाणवत राहील, असेच आहे!
भारतीयांनी इंग्रजांचे पारतंत्र्य परतविल्यानंतर गुंडू सीताराम आमोणकरांसमोर गोमंतकाचे स्वातंत्र्य होते. त्यांनी आपल्या मुलाला उत्तम शिक्षण मिळावे यासाठी मुंबईच्या विल्सन महाविद्यालयात पाठविले. तिथे ह. दा. वेलणकर, अ. बा. गजेंद्रगडकर यांच्यासारखे व्यासंगी विद्वान प्राध्यापक होते. सुरेशभाऊंनी संस्कृतचा मनापासून अभ्यास केला. बी.ए. झाले. पुढे पुण्याला येऊन टिळक शिक्षणशास्त्र महाविद्यालयातून बी.एड्. झाले. शाळा-संस्था चालवू शकतील असा परवाना त्यांना प्राप्त झाला. त्यानंतर ते परत मुंबई विद्यापीठात आले. इंग्रजी सौंदर्यशास्त्र असे विषय घेऊन ते एम.ए. झाले.
पुण्या-मुंबईतील विद्याव्रतींचा जवळून अनुभव, बहुभाषिकता, संस्थाप्रपंचाची ओळख अशा कितीतरी बाबी सुरेशभाऊंना लाभल्या. मुख्य म्हणजे भारतीयता आणि निकोप सहिष्णुवृत्ती अंगी बाणवता आली.
१९५६ ते १९६० या काळात त्यांनी केनियातील मोंबासा येथे राहून अध्यापन-कार्य केले. परदेशातील एकूण शिक्षणाची ओळख झाली. गोव्याला परतलेले सुरेशराव एक कर्तबगार प्रज्ञाव्रती म्हणूनच लोकांसमोर प्रकट झाले.
उत्कट मैत्री
असा एक आठवडा नाही गेला की मी आणि सुरेशभाऊ एकमेकांशी बोललो नाही. दरमहा पत्राचार होता. ग्रंथांची देवाणघेवाण सुरू असायची. एकमेकांसह ‘अवघे धरू सुपंथ’ असा आनंदसमाधानाचा सारा मामला होता.
ते मला अनेक बाबतीत जागवीत, पण कधी कुणाची निंदानालस्ती करीत नसत. ती त्यांच्या-आमच्या वाट्याला आली तरी स्वतःला फार विचलित होऊ द्यायचे नाही, असा त्यांचा कटाक्ष असे.
कवी बोरकरांप्रमाणे त्यांनाही ‘कोंकणीवादी’ म्हटले गेले. त्यांच्यावर अन्यायच केला गेला. पण आमोणकरांनी त्याचा मुलाहिजा मानला नाही. महाराष्ट्रातही त्यांच्या एकूण कार्याची दखल घेतली गेली नाही, पण त्यामुळे त्यांचे काम थांबले नाही. उलट त्यांची मराठी साहित्य-संस्कृतीविषयीची आस्था अखंड राहिली.
ज्ञानेश्वरीचे पसायदान ‘आता’ या शब्दाने सुरू होते. या ‘आता’मध्ये काय काय अर्थ दडलेला आहे, याचा शोध ते घेत राहायचे आणि त्याबद्दल फोन यायचा. त्यांचे ते सारे हृद्य बोलणे कानामनामध्ये साठवून ठेवावे असेच असायचे.
असाच ‘किंबहुना’ शब्द. त्याबद्दलचे त्यांचे मननही विचक्षण. ज्ञानेश्वरीच नव्हे तर इतरही संतांच्या वाणीतील शब्दांची शस्त्रे आणि शास्त्रे त्यांच्या शोध-बोधाचे विषय असत. सुरेशभाऊंना एखादे प्राचीन साहित्याचे मराठी-हिंदी-संस्कृत-इंग्रजी पुस्तक मिळाले की ते वाचून मला फोन करीत. माझ्यासाठी, गुरुकुल ग्रंथालयासाठी ते उपयोगी वाटले तर पाठवून देत. त्या पुस्तकांच्या निमित्ताने आमचा निरंतर दूरभाष आणि पत्राचाराने संवाद सुरू राहायचा.
कधी तुकाराम-शिवाजी-रामदासांविषयी कुणी काही एकांगी लेखन केलेले वाचले की फोन करून आपली खंत व्यक्त करीत. त्यांना जातीयवादी वृत्ती जोपासणार्या आणि राजकारण्यांचा अवाजवी गौरव-पुरस्कार करणार्यांबद्दल मनस्वी चीड होती. अशा मतलबी मंडळींनी महाराष्ट्राचा वेळोवेळी घात कसा केला, याबद्दल आमचे मोकळेपणाने बोलणे व्हायचे.
सुधाताई गेल्यानंतर आपला शेवट कसा करणार हे त्यांचे आधीच ठरले होते. मी त्यांना वीस वर्षांपूर्वी माझ्या देहदानाबद्दल सांगितले होते. आमचे बर्याचवेळा त्यावर बोलणे झाले. मी म्हटले होते, देहाची राख करून ती पुन्हा इथल्या मातीशी एकरूप करण्याची हिंदू पद्धती वैज्ञानिक आहे, पण देहदान, अवयवदान ही त्याहून अधिक वैज्ञानिक कृती आहे. शिवाय, आपण अखेरपर्यंत जर इतरांना प्राधान्य देऊन कर्तव्यकर्म केले तर ते जीवनाअखेरीसही करणे औचित्याचे नव्हे काय? त्यांना ते मनोमन पटले आणि तसे त्यांनी केले.
निकोप दृष्टी
त्यांची प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याची दृष्टी शोधक पण तितकीच निर्मळ-निकोप होती. त्यांना संत ज्ञानदेवांची महती समजली. त्याचबरोबर ज्ञानदेवादी भावंडांना उत्कट सोबत करणार्या नामदेवांची मैत्रीही जाणवली. त्यांनी पुढे केलेले आंतरभारतीचे कार्य ध्यानी घेता आले.
संत एकनाथांनी महाराष्ट्राचा महोदय घडविण्याच्या दृष्टीने किती थोर कार्य केले, प्रतिकूलता कशी पचविली हे ते निकोप वृत्तीने अभ्यासू शकले. पुढे झालेले संत तुकाराम आणि समर्थ रामदास यांच्यापैकी एकाचीच निवड करणारे पुष्कळ. सुरेशभाऊंनी त्यांच्याप्रमाणे केले नाही. दोन्ही महापुरुषांचे कार्य त्यांनी निःपक्षपाती दृष्टी ठेवून अभ्यासले आणि त्यांच्याविषयीचे विचारणीय लेखन-संपादन केले.
सुरेशभाऊंना कॅन्सर असल्याचे कळले आणि मी हादरलो. मला आठवला त्यांचा एक संवाद- ‘मरे एक त्याचा दुजा शोक वाहे| अकस्मात तोहि पुढे जात आहे|’ ही रामदासांची उक्ती फार सार्थ आहे. पण त्यात योजिलेला ‘अकस्मात’ हा शब्द अधिक अर्थपूर्ण आहे. ती धक्का देणारी वार्ता कळली, तेव्हा त्यांचा ‘त्या’ संवादाचा मला अर्थ कळला.
बोरकरांचे भाकित
मराठीतील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कवी बा. भ. बोरकर हे सुरेशभाऊंचे मामा. त्यांच्याविषयी श्रद्धाभाव बाळगताना त्यांना मनोमन अभिमान वाटत असे. ‘आमचा सुर्या आयुष्यात काहीतरी वेगळे करून दाखवील’ असे बोरकरांनी भाकित वर्तविले होते ते खरे ठरले.
न्यू गोवा हायस्कूल
म्हापशातील या शाळेचे मुख्याध्यापक म्हणून सुरेशरावांनी १९६० ते ८० अशी वीस वर्षे काम केले. याच अवधीत १९७५ साली त्यांनी म्हापशाचे नगराध्यक्षपद भूषविले. १९७८ साली त्यांना उत्कृष्ट शिक्षक म्हणून राज्यपुरस्कार मिळाला. गोवा राज्य मुख्याध्यापक संघटनेचे ते पहिला सरचिटणीस.
शिक्षणाधिकारी
मुख्याध्यापक पदावरून निवृत्त झाल्यानंतर गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष/शिक्षणाधिकारी म्हणून त्यांनी आठ वर्षे उत्तम कामगिरी केली. पोर्तुगीज गेल्यानंतर गोव्यात भारतीय शिक्षणव्यवस्था नव्याने उभी करणे, भाषिक ताणतणावांतून योग्य ते मार्ग काढणे, परकीय भाषांचा वरचष्मा कमी करणे हे काम सहजसुलभ नव्हते. सारी प्रतिकूल परिस्थिती अंगभूत सौजन्य आणि समंजस वृत्तीने हाताळीत राहून त्यांनी प्रसंगी कणखरपणाने आणि स्वतंत्र दृष्टीने निर्णय घेतले. अधिकारी असतानाही त्यांच्यातील अभ्यासक-अध्यापक-ज्ञानोपासक कायम क्रियाशील ठेवला.
सार्वजनिक सेवा-कार्य
म्हापसा शहरातील अनेक सार्वजनिक संस्थांच्या कार्यात आमोणकर सहभागी होते. म्हापसा नगरपालिकेत सदस्य म्हणून त्यांनी अकरा वर्षे सेवा केली. पालिकेत त्यांनी साक्षरता मोहीम मोठी केली. प्रौढशिक्षण मंडळाचे संचालक म्हणूनही काम केले.
ते जगन्मित्र होते. गोव्यातील विविध कार्यक्रमांना, मान्यवरांच्या व्याख्यानांना ते आवर्जून उपस्थित असत.
शिक्षणक्षेत्राला प्राधान्य
अनेक सार्वजनिक सेवा-संस्थांचे व्याप सांभाळूनही आमोणकरांनी आपले मुख्य कार्यक्षेत्र शिक्षण हेच ठेवले. त्यांनी आपली प्रशाळा आणि शिक्षणसंस्था मोठी केलीच, पण इतरही शिक्षणकार्याला चालना दिली. शक्य ते सहकार्यही दिले.
त्यांची आवडनिवड सांस्कृतिक महत्त्वाच्या जुन्या ग्रंथांची असली तरी ते नव्या ताज्या दमाच्या लेखकांनाही समजून घेत असत. नवे वैचारिक प्रवाह आस्थेने समजावून घेत राहत.
म्हापशातील मठ
सुरेशभाऊंचे घर मला एखाद्या डोंगरकपारीतील मठ-मंदिरासारखे वाटायचे. निसर्गाने सहज साकारलेली डोंगरउतराई त्यांना होतीच, पण त्यात पुन्हा जी हिरवाई आणि फुलराई त्यांनी जोपासलेली होती ती मन हरखून सोडणारी आणि त्या ज्ञानोपासकाच्या निर्मळ जीवन-प्रवाहाशी सर्वांना जोडणारी अशी होती. आजही आहे.
त्यांचे स्मृतिस्थान म्हणून ही हवेली त्यांच्या वंशजांनी, शिक्षणसंस्थेने आणि शासनानेही हातभार लावून जपावी. त्यांचे दुर्मीळ ग्रंथमंदिरही जतन केले जावे असे मला वाटते.
अखंड ज्ञानोपासना
सुरेशरावांनी विश्वसाहित्याचा धांडोळा घेत राहून आपली भारतीय जीवनमूल्यांवरील श्रद्धा पक्की केली होती. त्यांनी मराठीबरोबरच इंग्रजी, संस्कृत, पाली आणि पोर्तुगीज अशा भाषांवर प्रभुत्व प्राप्त करून कोंकणी लेखन-अनुवाद कार्याकडे आपला मोर्चा वळविला होता. त्यात भाषिक राजकारण नव्हते. भाषिक सौहार्द निर्माण व्हावे, अशी त्यांची मनीषा होती.
सुधाताईंची सोबत
सुरेशभाऊ आणि सुधाताईंची जोडी एकमेकांना अगदी अनुरूप अशी होती. ताई त्यांच्यासारख्याच अत्यंत हसतमुख, आनंदी, प्रसन्न. नित्य वाचन आणि काव्यशास्त्रविनोद चर्चेमध्ये सहभागी. शिवाय सुगरण. आतिथ्यशील. मुलांचे सारे काही नीट वेळेवर करण्यातही पूर्ण लक्ष.
त्या उत्तम शिक्षिका होत्या. विद्यार्थी त्यांना फार मानीत असत. त्यांना उत्कृष्टतेसाठी राष्ट्रपती पुरस्कार मिळाला होता. त्यांना मराठी-कोंकणीबरोबर इंग्रजीचेही चांगले ज्ञान होते. त्यांचे वक्तृत्वही प्रभावी होते. त्यांना गायनकलाही अवगत होती. आकाशवाणीवरून त्यांच्या गाण्याचे अनेक कार्यक्रम झाले.
सुरेशभाऊंना आपल्या ज्ञानोपासनेला सर्वप्रकारे सवडही मिळाली आणि आवश्यक तशी साथसोबत. ते आपले लेखन आधी सुधाताईंना वाचून दाखवीत. त्यांच्या सूचनांचा स्वीकार करीत.
सुधाताईही काव्य, कथा, कादंबरी असे ललित लेखन करीत. त्यांना यजमानांनी जसे प्रोत्साहन दिले तसे फार कमी पाहायला मिळते.
सुधाताईंना अचानक काही आजारांनी ग्रासले. आणि देवाघरचे बोलावणे आले. सुरेशभाऊंवर दुहेरी संकट कोसळले… असाध्य आजाराबरोबर जिवाशिवाचा सहवास संपला. एकाकीपणा आला.
खडतर आजार
आधी हृदयविकार. पुढे कॅन्सर अशा भयंकर खडतर आजारांशी सुरेशभाऊंना टक्कर द्यावी लागली. त्यांनी ती मोठ्या निर्धाराने आणि प्रसन्न मन ठेवून दिली.
उपचारासाठी त्यांना मुंबईला जावे लागे. प्रवासाबरोबर इतरही अनेक त्रास. एक केमो घेतली तरी जीव हैराण होऊन जातो. आमोणकरांनी पन्नासावर केमो पचविल्या. हा एक विक्रमच म्हणावा लागेल.
हे त्यांना कसे शक्य झाले? एक तर स्वभाव समाधानी, आनंदी. शिवाय चित्तवृत्ती प्रसन्न आणि ज्ञानोपासनेचा ध्यास. तोच त्यांचा आधार ठरला. ईश्वर आपल्याकडून हे काम करवून घेतो, घेणारच आहे असा उदंड आत्मविश्वास!
धम्मपद, गीता आणि तिरुक्कुरळ
१९९३ मध्ये मुंबईच्या फोर्ट भागात जुन्या पुस्तकांच्या बाजारात सुरेशरावांना ‘धम्मपद’ची पाली-इंग्रजी पुस्तिका मिळाली. ही आपल्या कोंकणी बांधवांसाठी अनुवादित करावी असे त्यांच्या मनाने घेतले.
बौद्ध दर्शनाचे थोर अभ्यासक पं. धर्मानंद कोसंबी हे सुरेशभाऊंचे एक श्रद्धास्थान होते. त्यांची प्रेरणा आणि मार्गदर्शन त्यांना मिळाले. १९९७ मध्ये प्रस्तुत ग्रंथ प्रकाशित झाला. या ग्रंथासाठी त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार १९९९ मध्ये मिळाला.
भगवंतान् गायिले गीत!
हा भगवद्गीतेचा समश्लोकी आणि गद्य अनुवाद. हा २००३ मध्ये प्रकाशित झाला. आमोणकरांच्या प्रकाशन संस्थेचे नावही ‘गीत-प्रसार’ असे राहिले.
तमिळ वेद म्हणून मान्यता पावलेल्या तिरुवळ्ळुवर यांच्या ‘तिरुक्कुरळ’ अथवा ‘कुरळ’ या अभिजात ग्रंथाचा हा अनुवाद.
एक संस्कृत, दुसरा तमिळ अशा दोन महान ग्रंथानुवादांची पुण्याई बरोबर घेऊन सुरेशभाऊ ज्ञानेश्वरीकडे वळले. त्यांना हृदयविकाराने धक्के दिले. पण आपण आपला हा अनुवाद पूर्ण करेपर्यंत ईश्वर आपल्याला नेणार नाही अशी त्यांना खात्री होती. ते जिद्दीने पण शांतपणाने काम करीत राहिले.
कोंकणी ज्ञानेश्वरी
श्रीज्ञानेश्वरी या प्रकल्पाकरिता त्यांनी ज्ञानेश्वरीविषयक प्रत्येक प्रकाशित ग्रंथ मिळवून त्यांचा कसून अभ्यास केला. यासाठी मला ते सतत काही विचारीत. संदर्भ सांगत. मी ते ग्रंथ त्यांना मिळवून देत राहिलो.
हे काम करताना ते ओव्यांचा एकदा अनुवाद करून थांबत नसत, आशय नीट यायला हवा, तात्त्विक मथितार्थ नेमकेपणाने प्रकट व्हायला हवा, योग्य शब्दकळा आणि अभिव्यक्ती असायला हवी यासाठी ते पुनः पुन्हा परिष्करण करीत. हे अनुवाद-कार्य आपण केले नाही, तर ते कुण्या अदृश्य शक्तीने आपल्या हातून करवून घेतले, अशी त्यांची श्रद्धा होती.
अनुवाद करणे ही एक कला आहे. ती केवळ प्रतिभासाध्य नाही. परिश्रमाधारित आहे. आमोणकरांनी प्रथम गीतानुवाद केल्यामुळे गीतेत नेमके काय आहे हे त्यांनी जाणले होते. ज्ञानेश्वरी ग्रंथावरील सर्व साहित्य अभ्यासल्यामुळे त्यांना ज्ञानेश्वरीत गीतेचा कसा आणि कोणता विस्तार चौदा पटीने केलेला आहे, हे समजले होते.
ज्ञानेश्वरीच्या मूळ गाभ्याशी जाऊन प्रामाणिकपणे अनुसर्जन केले; म्हणून तो मात्र अर्थानुवाद राहिला नाही. ते सृजनात्मक वाटावे असे परिष्कृत काव्य आहे.
जुन्या मराठीतील उकारबहुलता आजही कर्नाटकातील कोंकणीत दिसते. सातशे वर्षांपूर्वी मराठीत वापरात होते असे अनेक कर्णमधुर, गोड शब्द आजही गोमंतकीय कोंकणीत टिकून आहेत. आमोणकरांनी ही सारी वैशिष्ट्यपूर्ण रूपे, ध्वनिशास्त्राचे आवश्यक ते भान ठेवून योजिली आहेत. त्यामुळे हा अनुवाद समाजविरहित नितळ, शैलीदार आणि नादमधुर असा उतरला आहे. या अनुदित ग्रंथामुळे कोंकणीला एक समृद्धी प्राप्त झालेली आहे.
अकारण वादंग
सुरेशभाऊंच्या कोंकणी ज्ञानेश्वरीच्या निमित्ताने काहींनी अकारण वादंग माजविले. हा उद्योग करणारे कुणी लेखक-साहित्यिक वा अभ्यासक नव्हते. मराठीचा फाजील अभिमान आणि कोंकणीविषयी अजाणतेपणे असलेला आकस हे त्यांचे भांडवल होते. कोंकणी ही बोली आहे; भाषा नव्हे आणि मराठी भाषा कोंकणी भाषिकांना सहज समजते, म्हणून ज्ञानेश्वरीचा अनुवाद अनावश्यक असे त्यांचे तर्कट होते.
सुरेशभाऊंना या विपरीत वृत्तीचा त्रास झाला. त्यांची पाठराखण करणार्यांनाही भरपूर तसदी दिली गेली. पण अनुवादक आणि त्यांचे महत्त्व समजणारे अभ्यासक यांनी या विघ्नसंतोषी मंडळींकडे दुर्लक्ष केले. समाजानेही त्यांना फारशी किंमत दिली नाही म्हणून महाग्रंथाचे प्रकाशन थाटात होऊ शकले.
नानकदेवांचा जपुजी, येशूचरित्र आणि क्रिस्तपुराण
कोंकणी अनुवादाची वरील तिन्ही पुस्तके आमोणकरांनी सहज केली. आमोणकरांनी शेक्सपीयरच्या काही नाटकांचाही कोंकणीत अनुवाद केला. शेक्सपियरच्या नाटकांतील निवडक संवाद आणि म्हणी यांच्या कोंकणी अनुवादाचेही एक पुस्तक प्रकाशित केले होते.
तुकाराम-रामदास
संत तुकारामांची गाथा महाराष्ट्रातील वारकरी बांधवांना विशेष प्रिय आहे. या गाथेच्या सर्व प्रती मिळवून त्यांचा पद्धतशीर अभ्यास आमोणकरांनी केला. अखेरच्या दिवसांत सुरेशभाऊंनी संत तुकाराम यांच्या निवडक अभंगांचा कोंकणी अनुवाद केला. नंतर ते समर्थ रामदासांच्या मनाच्या श्लोकांकडे वळले. त्यांनी कोंकणीत ‘मनोबोध’ तयार केला. याच्या प्रकाशनाच्या निमित्ताने रामदासांच्या साहित्यावर आधारित एखादे संमेलन व्हावे, असा त्यांचा मनोदय होता. त्यासंबंधी ते माझ्याशी सतत संवाद करीत राहिले.
पद्मश्री
सुरेश आमोणकरांची बहुविध प्रकारची ज्ञानोपासना ध्यानात घेऊन त्यांना भारत सरकारने ‘पद्मश्री’ देऊन सन्मानित केले. असा सन्मान फारच थोड्या मराठी सारस्वतांना लाभलेला आहे.
उपसंहार
सुरेशभाऊ जीवनात अखंडपणे भगवद्गीतेचे मनन-चिंतन करीत राहिले. त्यांनी अखेरचा श्वास गीताजयंतीच्या दिवशी घ्यावा हा एक अजब योगायोग.
गोमंतकात विद्वानांना ‘दोतोर’ अशा आदरसूचक संबोधनाने हाक दिली जाते. हे भाग्य आमोणकरांना लाभले.
शिक्षक, शिक्षण संस्थाचालक आणि संवर्धक यासाठी अवघे जीवन वेचणारे कार्यकर्ते पुष्कळ झाले, पण हे सारे करीत असताना ज्ञानोपासक म्हणूनही कायम व्रतस्थ राहिले, असे सुरेश गुंडू आमोणकर. त्यांच्या ‘पद्मश्री’मुळे त्या सन्मानाची सार्थकता वाढली आणि अखेरच्या देहदानामुळे सुरेशभाऊही अमर झाले!