आफ्रिकेचा इंग्लंडला शॉक!

0
121

महिलांच्या टी-ट्वेंटी विश्‍वचषक स्पर्धेतील धक्कादायक निकालांची मालिका रविवारीदेखील सुरूच राहिली. संभाव्य विजेत्यांच्या यादीत असलेल्या इंग्लंडला दक्षिण आफ्रिकेकडून ६ गडी व २ चेंडू राखून पराभव पत्करावा लागला. इंग्लंडचा डाव ८ बाद १२३ धावांत रोखल्यानंतर द. आफ्रिकेने विजयी लक्ष्य १९.४ षटकांत ४ गडी गमावून गाठले.

नाणेफेक हरल्यामुळे प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळालेल्या इंग्लंडला सूर गवसला नाही. नॅट सिवरने ४१ चेंडूंत ५ चौकार व १ षटकारासह ५१ तर सलामीवीर एमी जोन्सने २० चेंडूंत २३ धावांचे योगदान दिले. याव्यतिरिक्त त्यांच्या एकाही फलंदाजाचा द. आफ्रिकेच्या नियंत्रित मार्‍यासमोर निभाव लागला नाही. द. आफ्रिकेकडून अयाबोंगा खाकाने २५ धावांत ३, डॅन व्हॅन निएकर्कने २० धावांत २, मरिझान कापने १९ धावांत २ व शमनम ईस्माइलने २६ धावांत १ गडी बाद केला.

माफक लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची सुरुवातही चांगली झाली नाही. लिझेल ली (४) परतली तेव्हा फलकावर केवळ ६ धावा लागल्या होत्या. कर्णधार डॅन व्हॅन निएकर्क (४६) व मरिझान काप (३८) यांनी दुसर्‍या गड्यासाठी ८४ धावांची विशाल भागीदारी करत संघाला ९० धावांपर्यंत पोहोचविले. सोळाव्या षटकात काप व १७व्या षटकात निएकर्क परतल्यामुळे इंग्लंडचा संघ सामन्यात परतण्याची शक्यता निर्माण झाली होती. यातच क्लो ट्रायोन (१२) १९व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर बाद झाली. द. आफ्रिकेला शेवटच्या षटकांत ९ धावांची आवश्यकता होती. पहिल्या दोन चेंडूंत केवळ दोन धावा आल्यानंतर मिगनॉन डू प्रीझने तिसर्‍या चेंडूवर षटकार व चौथ्यावर चौकार लगावत संघाचा विजय साकार केला.