विर्डी धरणाची जलसंसाधन खात्याच्या पथकाकडून पाहणी

0
122

म्हादई जललवादाच्या आदेशाचे उल्लंघन करीत महाराष्ट्राने विर्डी धरणाचे कामकाज छुप्या पध्दतीने चालू ठेवल्याच्या वृत्ताची गोवा सरकारने गंभीर दखल घेतली असून जलसंसाधन खात्याने धरणाच्या ठिकाणी पथक पाठवून काल पाहणी केली. या ठिकाणी काही प्रमाणात खडी क्रशरचे काम चालू असल्याचे निदर्शनास आले. मात्र, तेथील यंत्रसामुग्री व कामगार हलवण्यात आल्याचे पथकाला दिसून आले आहे.जलसंसाधन खात्याचे वरिष्ठ अभियंता श्रीकांत पाटील, श्री. कामत यांनी काल सायंकाळी विर्डी धरणाच्या ठिकाणी भेट दिली. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात काम चालू असल्याचे फारसे काही आढळलेले नाही, अशी माहिती मुख्य अभियंता संदीप नाडकर्णी यांनी दिली. या ठिकाणी थोड्याफार प्रमाणात खडी क्रशरचे काम व इतर छोटेसे काम चालू असले तरी सध्या तरी चिंतेचे कारण नाही. तरीदेखील आमचे या ठिकाणी वारंवार लक्ष असेल व वेळोवेळी आमचे पथक भेट देऊन लक्ष ठेवणार असल्याचे मुख्य अभियंता नाडकर्णी यांनी या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
मुख्यमंत्र्यांकडून दखल
दरम्यान, मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून महाराष्ट्राच्या हालचालीकडे लक्ष ठेवण्याचे आदेश जलसंसाधन अधिकार्‍यांना दिले आहेत. महाराष्ट्राने काम चालू ठेवणे लवादाच्या आदेशाचे उल्लंघन असून त्याबाबत आम्ही लक्ष ठेवून आहोत असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. दरम्यान, जलसंसाधन मंत्री दयानंद मांद्रेकर यांनी विर्डीप्रश्‍नी गोव्याला सावध व प्रसंगी आक्रमक भूमिका घेण्याशिवाय पर्याय नसल्याचे स्पष्ट केले आहे. काम चालूच
काल जलसिंचन खात्याचे पथक विर्डी धरणाच्या ठिकाणी गेले त्यावेळी कामकाज ठप्प होते. मात्र, विवेकानंद पर्यावरण फौजेचे कार्यकर्ते त्या ठिकाणी गेले असता काही ट्रक फेर्‍या मारताना दिसले. त्यामुळे काही प्रमाणात काम चालू असल्याचा दावा पर्यावरण कार्यकर्ते राजेंद्र केरकर यांनी केला आहे. धरण परिसरातील कंत्राटदाराचे अधिकारी उल्हास नाईक यांनी महाराष्ट्र सरकारकडून काम बंद करण्याबाबत कसलाच आदेश आलेला नाही. मात्र, निधी अभावी काम ठप्प झाले असल्याचे सांगून सध्या काम चालू नसल्याची माहिती दिली.