गोव्यात १२ जणांना ‘स्वाइन फ्लू’ची लागण

0
120

गोवा वैद्यकीय महाविद्यालयाने तपासणीसाठी पाठविलेल्या रक्ताच्या नमुन्यांपैकी १२ जणांना स्वाईन फ्लू या रोगाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. एका रुग्णावर सध्या इस्पितळात उपचार चालू आहे. गोव्यातही या रोगाचे रुग्ण सापडू लागल्याने जनतेच्या मनात भीती निर्माण झाली आहे. अशा रुग्णांवर उपचार करण्यासाठी यंत्रणा सज्ज असल्याचे परवा बुधवारी आरोग्यमंत्री फ्रान्सिस डिसौझा यांनी सांगितले होते.दरम्यान, गेल्या महिन्यात स्वाइन फ्लूने गोव्यात पहिला बळी घेतला होता. सदर मयत विदेशात बोटीवर कामाला होता. मडगाव येथील खासगी इस्पितळात उपचार सुरू असताना त्याची प्रकृती खालावल्याने त्याला गोमेकॉत दाखल केले होते. तेथे त्याचे निधन झाले होते. या घटनेनंतर राज्य सरकार सतर्क झाले होते. ‘स्वाइन फ्लू’ची लक्षणे आढळल्यास तातडीने उपचार करण्याचे आवाहन आरोग्य खात्याने केले होते. त्यानंतर संशयित रुग्णांच्या रक्ताचे नमुनेही तपासणीसाठी दिल्लीला पाठविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.