>> राज्यसभेत गोंधळ घातल्या प्रकरणी कारवाई
लोकसभेनंतर आता राज्यसभेत गोंधळ घातल्याप्रकरणी विरोधकांवर कारवाई करण्यात आली असून, १९ खासदारांचे काल निलंबन करण्यात आले. यामध्ये तृणमूल कॉंग्रेस, डावे पक्ष, द्रमुक आणि तेलंगाणा राष्ट्र समितीच्या खासदारांचा समावेश आहे.
संसदेचे पावसाळी अधिवेशन १८ जुलैपासून सुरू झाले आहे. या अधिवेशनात विरोधी पक्षांचे खासदार आक्रमक झाल्याचे दिसून आले आहे. विरोधी खासदारांनी दोन्ही सभागृहात आक्रमक भूमिका कायम ठेवली आहे. जीएसटी आणि महागाई यासारख्या अनेक मुद्यांवर विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत आंदोलन केले. राज्यसभेत हौद्यात उतरून घोषणा दिल्या. राज्यसभा अध्यक्षांनी वारंवार सूचना केल्यानंतरही विरोधकांनी न ऐकल्यामुळे निलंबनाची कारवाई करण्यात आली. तृणमूलच्या ७ खासदारांसह १९ खासदारांना एका आठवड्यासाठी निलंबित करण्यात आले आहे.