>> पाटण्यातील पहिल्याच बैठकीला 15 पक्षांच्या नेत्यांची हजेरी; लोकसभा निवडणूक एकत्र लढवण्यावर सर्वपक्षीय सहमती
पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला जोरदार टक्कर देण्यासाठी विरोधी पक्षांची मोट बांधण्याच्या दृष्टीने आवश्यक असणारी महत्त्वपूर्ण बैठक काल पार पडली. भाजपविरोधात काँग्रेससह देशातील 15 विरोधी पक्षांनी एकत्र येत बिहारची राजधानी पाटणा येथून रणशिंग फुंकले. बैठकीनंतर उपस्थित सर्व विरोधी पक्षाच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली. पुढील बैठक शिमला येथे जुलै महिन्यात होणार असून, त्यात लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी किमान समान कार्यक्रम ठरवला जाणार आहे. काल झालेल्या बैठकीत लोकसभा निवडणूक एकत्र लढवण्यावर सहमती झाली, असे नितीश कुमार यांनी सांगितले.
पाटण्यात काल नितीश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली देशातील प्रमुख विरोधी पक्षनेत्यांची बैठक झाली. त्यामध्ये विरोधी पक्षांनी किमान समान कार्यक्रमाची तयारी करण्याचा निर्णय घेतला.
‘आप’चे प्रमुख अरविंद केजरीवाल वगळता सर्व विरोधी पक्षनेत्यांनी एकमेकांना सहकार्य करण्याचा निर्धार केला. पाटण्यातील बैठक ही महाआघाडीची सुरुवात असून शिमल्यातील चर्चेमध्ये किमान समान कार्यक्रम, एकास एक उमेदवार देण्याचे सूत्र, जागावाटप आदी कळीच्या मुद्द्यांवर अंतिम निर्णय घेतला जाईल.
बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत अरविंद केजरीवाल व द्रमुकचे प्रमुख एम. के. स्टॅलिन हे दोघे वगळता सर्व पक्षांचे नेते उपस्थित होते. तिथे ममता बॅनर्जी यांच्यासह ‘माकप’चे महासचिव सीताराम येचुरी व ‘भाकप’चे महासचिव डी. राजा यांनीही विरोधकांच्या ऐक्यावर ठाम असल्याचे सांगितले. जे इथे उपस्थित नाहीत त्यांची चिंता करण्यापेक्षा जे नेते हजर आहेत, त्यांनी केलेला एकजुटीचा निर्धार महत्त्वाचा असल्याचे नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी स्पष्ट करत अप्रत्यक्षपणे केजरीवाल यांना चपराक दिली. वटुहुकमाच्या मुद्द्यापेक्षा विरोधकांच्या ऐक्याला सर्व नेत्यांनी प्राधान्य दिल्यामुळे या बैठकीनंतर केजरीवाल एकटे पडल्याचे दिसले.
पुढील बैठकीत अंतिम रुपरेषा
सर्वांनी एकत्र चालण्याची सहमती दर्शवली. एकत्र निवडणूक लढवण्याची सहमती या बैठकीत झाली. पुढच्या बैठकीत अंतिम रुपरेषा ठरवली जाईल. कोण कुठून लढवणार हे या बैठकीत ठरवले जाईल, असे नितीश कुमार म्हणाले.
प्रत्येक राज्याचा विचार होईल : खर्गे
या बैठकीत कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंतचे सर्व नेते सहभागी झाले. सर्व नेत्यांनी एक होऊन पुढे निवडणूक लढण्यासाठी एक समान किमान कार्यक्रम तयार करण्यावर सहमती दर्शवली. 10 किंवा 12 जुलै रोजी शिमल्यामध्ये पुढची बैठक होईल. त्यात अजेंडा तयार केला जाईल. प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या पद्धतीने काम करावे लागणार आहे. कारण एकच रणनीती प्रत्येक राज्यात लागू होणार नाही, असे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
हुकुमशाहीविरुद्ध एकत्र : बॅनर्जी
भाजपच्या हुकूमशाहीविरोधात आम्ही एकत्र येत आहोत. कुणी सरकारच्या विरोधात बोलले तर त्याच्याविरोधात ईडी, सीबीआय लावली जाते; पण वाढती महागाई, बेरोजगारी आणि इतर अनेक समस्यांवर काहीही बोलले जात नाही. 2024 मध्ये पुन्हा भाजप सत्तेत आले, तर त्यानंतर देशात निवडणुका होणार नाहीत हे नक्की, असे बॅनर्जी म्हणाल्या.
वाद बाजूला ठेवून एकत्र : पवार
आता आपल्याला भाजपचा सामना करायचा असेल, तर एकत्र येऊन सामना करायला हवा. जे वाद होते, ते बाजूला सामोरे ठेऊन आम्ही एकत्र आलो आहोत, असे शरद पवार म्हणाले.
हुकुमशाहीला विरोधच करू : ठाकरे
आमची मत-मतांतरे असतील, परंतु देश एक आहे. स्वातंत्र्यावर जो आघात करेल, त्याला आम्ही विरोध करू. जे देशात हुकुमशाही आणायचा प्रयत्न करतील, त्यांना आम्ही विरोध करत राहू, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
मतभेद आहेत; पण सर्वांना सोबत घेणार : राहुल गांधी
नरेंद्र मोदी हे हुकूमशहाप्रमाणे देशाचे नेतृत्व करत आहेत. त्यामुळे भाजपला सत्तेतून पायउतार करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. भारताच्या मूलभूत विचारांवर आक्रमण केले जात आहे, भारताच्या स्वायत्त संस्थांवर हल्ले केले जात आहेत. ही विचारांची लढाई आहे. आमच्यातही काही मतभेद असतील; पण सर्वांना सोबत घेऊन आणि सर्वांचे विचार ऐकून आम्ही पुढे जाणार आहोत, असे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सांगितले.
बैठकीत सहभागी होणारे नेते
तामिळनाडूचे मुख्यमंत्री नेते एम. के. स्टॅलिन, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, सीपीआयचे नेते डी. राजा, सीपीआय (एमएल) दीपांकर भट्टाचार्य, मेहबूबा मुफ्ती, काँग्रेस नेते राहुल गांधी आणि पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, नॅशनल कॉन्फरन्सचे उमर अब्दुल्ला, सपाचे अखिलेश यादव, शिवसेनेचे उद्धव ठाकरे, जेएमएमचे हेमंत सोरेन, जेडीयूचे नीतीश कुमार आणि आरजेडीचे तेजस्वी यादव यांच्यासह अन्य काही नेत्यांनी बैठकीत सहभागी घेतला.
‘या’ पक्षांचा सहभाग
या बैठकीत काँग्रेस, जेडीयू, आरजेडी, आम आदमी पक्ष, डीएमके, टीएमसी, सीपीआय, सीपीएम, सीपीआय (एमएल), पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्स, शिवसेना (ठाकरे गट), सपा, जेएमएम आणि राष्ट्रवादी काँग्रेसने सहभाग घेतला.
अध्यादेशाविरोधात समर्थन न दिल्यास
पुढील बैठकांमध्ये सहभाग नाही : आप
पाटण्यातील बैठकीत ‘आप’ने अध्यादेशाच्या मुद्द्यावर काँग्रेसला धारेवर धरल्याने चर्चेमध्ये मीठाचा खडा पडला. काँग्रेसने या बैठकीतच भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी ‘आप’चे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी केल्यामुळे केजरीवाल आणि राहुल गांधी व मल्लिकार्जुन खर्गे यांच्यामध्ये तीव्र संघर्ष झाल्याचे समजते. आप व काँग्रेसमध्ये तडजोड न झाल्याने कदाचित ‘आप’ महाआघाडीतून बाहेर पडण्याची शक्यता आहे. बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेला अरविंद केजरीवाल अनुपस्थित होते.
या बैठकीनंतर लगेचच आदमी पक्षाने वेगळी भूमिका घेतली आहे. जोपर्यंत दिल्लीतील प्रशासकीय सेवांवर नियंत्रण ठेवणाऱ्या केंद्र सरकारच्या अध्यादेशाला काँग्रेस जाहीरपणे विरोध करत नाही, तोपर्यंत विरोधी पक्षांच्या कोणत्याही आगामी बैठकीत सहभागी होणार नाही, असे आम आदमी पक्षाने जाहीर केले आहे.
काय आहे अध्यादेशाचा वाद?
काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय देताना कायदा आणि सुव्यवस्था, जमीन आणि पोलीस वगळता बाकीचे सर्व अधिकार दिल्ली सरकारकडेच राहतील, असे स्पष्ट केले होते; मात्र केंद्राने अध्यादेशाने हा निर्णय फिरवला होता.