विरोधकांना लोकसभेत मणिपूरवर चर्चा नको; केवळ राजकारण केले

0
3

>> राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांची टीका

लोकसभेत विरोधी पक्षांना मणिपूर हिंसाचारावर चर्चा नको होती, त्यांना केवळ मणिपूरच्या विषयाचे राजकारण करायचे होते, अशी टीका भाजपचे राज्यसभा खासदार आणि गोवा प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी काल भाजप मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.

राज्यसभा खासदार म्हणून शपथ घेतल्यानंतर सदानंद तानावडे यांनी भाजप मुख्यालयात पहिली पत्रकार परिषद काल घेतली. यावेळी तानावडे यांनी लोकसभा आणि राज्यसभेत पावसाळी अधिवेशनात झालेल्या कामकाजाचा आढावा घेतला.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मणिपूर विषयावर चर्चा करण्याची तयारी दर्शविली होती; मात्र विरोधक चर्चा करण्यास तयार नव्हते. त्यांना केवळ कामकाजाच्या वेळी गोंधळ करायचा होता, असेही तानावडे म्हणाले.
पावसाळी अधिवेशनात 23 सरकारी विधेयकांवर चर्चा करून संमत करण्यात आली, तर 9 सरकारी विधेयके दाखल करण्यात आली. पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षांच्या खासदारांनी अडथळे आणल्याने प्रश्नोत्तराच्या तासाचे जास्त कामकाज होऊ शकले नाही. लोकसभेत प्रश्नोत्तराचे केवळ 3 तास आणि राज्यसभेत 5 तासांचे कामकाज झाले, असेही तानावडे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे राज्यातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विटंबनेचे प्रकरण योग्य प्रकारे हाताळत आहेत. अशा वेळी मंत्री, आमदारांनी पुतळ्याची विटंबना करण्यात येणाऱ्या स्थळी जाऊन घोषणाबाजी करणे योग्य नाही, असे मत तानावडे यांनी व्यक्त केले.