>> राज्य सरकारकडून 2019-20, 2020-21 सालासाठीचे पुरस्कार जाहीर
गोवा सरकारने ‘गोमंतविभूषण’ या राज्याच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराची काल घोषणा करताना 2019-20 या वर्षासाठीचा पुरस्कार लोकसाहित्यातील योगदानाबद्दल पद्मश्री विनायक खेडेकर यांना, तर 2020-21 या वर्षासाठीचा पुरस्कार हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताील ज्येष्ठ गायक पं. प्रभाकर कारेकर यांना जाहीर केला. दोन्ही पुरस्कार विजेत्यांची नावे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल पत्रकार परिषदेत जाहीर केली. गेल्या काही वर्षांत कोरोना महामारीमुळे गोमंतविभूषण पुरस्कार देता आला नव्हता. आता गोवा घटकराज्य दिन सोहळ्यात हे पुरस्कार प्रदान केले जातील.
यापूर्वी डॉ. अनिल काकोडकर, डॉ. रघुनाथ माशेलकर या वैज्ञानिक द्वयींना, तसेच चित्रकार लक्ष्मण पै, स्वातंत्र्यसैनिक व पत्रकार लँबर्ट मास्कारेन्हस, डॉ. प्रेमानंद रामाणी यांना हा पुरस्कार मिळाला आहे.
पद्मश्री विनायक खेडेकर हे गोमंतकीय लोकसाहित्य व लोकवेद यांचे एक गाढे अभ्यासक व संशोधक आहेत. त्यांनी गोवा कला अकादमीचे सदस्य सचिव म्हणूनही पद भूषवले आहे. त्यांनी लोककला व लोकवाद्य प्रकारांचे दस्ताऐवजीकरण केलेले आहे. तसेच त्यांनी ‘लोकसरिता’, ‘गोवा कुळमी’ आदी गोमंतकीय लोकवेदावरील काही पुस्तके लिहिलेली आहेत. ‘गोवा संस्कृतीबंध’, ‘कथा रुपड्यांची’, ‘गोवा देवमंडळ उन्नयन’ आणि ‘स्थलांतर’ अशी अनेक संशोधनपर ग्रंथसंपदा विनायक खेडेकर यांच्या नावावर आहेत.
प्रभाकर कारेकर हे शास्त्रीय संगीत क्षेत्रातील एक दिग्गज असून, संगीत नाट्य रंगभूमीला तसेच शास्त्रीय संगीत क्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान हे फार मोठे आहे. त्यांनी गायलेली ‘प्रिये पहा…’, ‘नभ मेघांनी आक्रमिले’ आदी कित्येक नाट्यगीते अजरामर झालेली आहेत. पं. जितेंद्र अभिषेकी, पं. सुरेश हळदणकर, पं. सी. आर. व्यास अशा गुरुंकडून त्यांनी गायनाचे धडे घेतले आहेत. त्यांनी गायनाच्या अनेक मैफिली केल्या आहेत.