विधानसभा संकुलात नवीन पुतळ्यास भाजपचा विरोध

0
74

>> शालेय अभ्यासक्रमात गोवा मुक्तीलढा, जनमत कौलास समर्थन

पर्वरी येथील विधानसभा संकुलात नवीन पुतळा उभारण्यास विरोध करणारा ठराव भारतीय जनता पक्षाच्या मंत्री, आमदार आणि पदाधिकार्‍यांच्या संयुक्त बैठकीत एकमताने काल संमत करण्यात आला. गोवा मुक्तीलढा आणि जनमत कौलाचा इतिहास शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याच्या निर्णयाचे समर्थन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यातील आघाडी सरकारमधील मंत्री तथा गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी पर्वरी येथील विधानसभा संकुलात डॉ. जॅक सिक्केरा यांचा पुतळा उभारण्याची मागणी केली होती. भाजपचे आमदार तथा उपसभापती मायकल लोबो यांनी सिक्केरा यांचा पुतळा उभारण्याच्या मागणीचे समर्थन केले होते. तर आघाडी सरकारमधील मगोपचे नेते तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर यांनी डॉ. सिक्केरा यांचा पुतळा उभारण्यास विरोध केला होता.

या पार्श्‍वभूमीवर नवीन पुतळा उभारण्याच्या विषयावर चर्चा करण्यासाठी भाजपच्या मंत्री, आमदार आणि प्रमुख पदाधिकार्‍यांची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, प्रदेशाध्यक्ष तथा राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर, कायदा मंत्री फ्रान्सिस डिसोझा, मंत्री विश्‍वजित राणे, मंत्री पांडुरंग मडकईकर, मंत्री मावीन गुदिन्हो, खासदार नरेंद्र सावईकर, सभापती डॉ. प्रमोद सावंत, उपसभापती मायकल लोबो, आमदार नीलेश काब्राल, प्रवीण झांट्ये, ग्लेन टिकलो, आमदार एलिना साल्ढाणा, माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, सरचिटणीस सदानंद शेट तानावडे, महिला मोर्चाच्या अध्यक्ष सुलक्षणा सावंत व इतरांची उपस्थिती होती.

समस्त गोमंतकीयांच्या मागणीनुसार पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांचा पुतळा विधानसभा संकुलात उभारण्यात आला आहे. जनमत कौलानंतर सुध्दा गोमंतकीयांनी भाऊसाहेब बांदोडकर यांच्यावर विश्‍वास दाखविला होता. भाजप जनमत कौलामध्ये सहभागी नेत्याचा आदर करीत आहे. त्याचबरोबर भाजप जनतेच्या भावनांचा आदर करीत आहे. जनतेच्या भावनांच्या विरोधात कुठलाही निर्णय घेणार नाही, असे ठरावात म्हटले आहे.

गोवा मुक्तीलढा, जनमत कौल आणि गोव्याच्या विकासात अनेकांनी योगदान दिलेले आहे. भविष्यकाळात त्यांचेही पुतळे विधानसभा संकुलात उभारण्याची मागणी केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवीन पुतळे उभारण्यास समर्थन न देणे उचित ठरेल, असे ठरावात म्हटले आहे. गोवा मुक्तीलढा, जनमत कौल शालेय अभ्यासक्रम समाविष्ट करण्याचा निर्णय योग्य दिशेने उभारलेले पाऊल आहे. गोवा मुक्ती लढ्याच्या इतिहासापासून आजची युवा पिढी अनभिज्ञ आहे. युवा पिढीला गोव्याच्या इतिहासाची माहिती देण्याची नितांत गरज आहे. सर्वांनी सरकारच्या विकास कामाच्या अजेंड्याला पाठिंबा द्यावा, असे आवाहन या बैठकीत करण्यात आले.

भाजपने निराश केले : विजय

भाजपने पर्वरी येथे जॅक सिक्केरा यांचा पुतळा न उभारण्याच्या निर्णय घेऊन आम्हांला निराश केले आहे. तरीही, पुतळ्याबाबत पक्षाच्या भूमिकेत कोणताही बदल केला जाणार नाही. आगामी काळात भाजप नेत्यांची मने वळविण्याचे प्रयत्न केले जातील. आमच्या मागणीची पूर्तता करून घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही, अशी प्रतिक्रिया गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष तथा मंत्री विजय सरदेसाई यांनी व्यक्त केली.