विधानसभा वृत्त

0
98

संपूर्ण किनारपट्टी स्वच्छतेची मोहीम लवकरच : परुळेकर
राज्यातील संपूर्ण किनारपट्टीच्या स्वच्छतेसाठीची व्यापक अशी मोहीम लवकरच हाती घेण्यात येणार असून खात्याने त्यासाठीची निविदा यापूर्वीच काढली असल्याची माहिती पर्यटनमंत्री दिलीप परूळेकर यांनी काल विधानसभेत दिली. प्रश्‍नोत्तराच्या तासाला आमदार ग्लेन टिकलो यांनी यासंबंधीचा प्रश्‍न उपस्थित केला होता.
किनारे कचरामुक्त करून स्वच्छ करण्यासाठी पर्यटन खात्याने कोणती पावले उचलली आहेत असा प्रश्‍न टिकलो यांनी उपस्थित केला होता. त्यावर बोलताना परूळेकर म्हणाले की सध्या कोणतीही यंत्रे न वापरता किनारे स्वच्छ करण्यासाठी खात्याने कंत्राटदारांची नियुकनती केलेली आहे. मात्र, नव्याने काढण्यात आलेल्या निविदेनुसार कंत्राटदारांना कचरा गोळा करण्याबरोबरच प्लॉस्टिक कचर्‍यासह सर्व प्रकारच्या कचर्‍याची विल्हेवाटही लावावी लागेल. त्याशिवाय शॅक्समध्ये होणारा कचरा उचलणे, तसेच किनारपट्टीपासून ५० मिटरपर्यंतच्या भागातील कचरा गोळा करण्याची जबाबदारी कंत्राटदारावर असेल, असे परुळेकर यांनी स्पष्ट केले. सध्या जे खासगी कंत्राटदार किनार्‍यावरील कचरा उचलत आहेत त्यांच्यावर तो उचलताना काही मर्यादा येत असल्याचे दिसत आल्याने आता नवी व्यवस्था करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी ग्लेन टिकलो म्हणाले की बागा बिचसह काही किनार्‍यांवर प्रचंड प्रमाणात काचा असून किनारपट्टीवरुन फिरणारे या फुटलेल्या बाटल्यांच्या कांचामुळे जखमी होण्याचा धोका आहे. यावर उत्तर देताना परूळेकर म्हणाले की यापुढे या काचांचा धोका राहणार नाही. नव्या कंत्राटदाराला या काचाही काढाव्या लागतील. शिवाय संपूर्ण किनारपट्टीवर १२५ आयआरबी जवानांना तैनात करण्यात आलेले असून किनार्‍यांवर बाटल्या फोडून कांचा करणार्‍यांवर कारवाई करण्याचे आदेश त्यांना दिले आहेत.
फर्मागुढीतील खाण अभियांत्रिकी अभ्यासक्रम सेझाच्या सहकार्याने
अभ्यासक्रम पाच वर्षांनंतरही चालू राहील : शिक्षणमंत्री
फर्मागुढी येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात चार वर्षांचा खाण अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रम सेझा गोवा लिमिटेडच्या (आताची सेझा स्टारलाईट लिमिटेड) सहयोगाने सुरू करण्यात आला असल्याची माहिती शिक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल विधानसभेत दिली.
आमदार नीलेश काब्राल यांनी यासंबंधी प्रश्‍न विचारला होता. एखाद्या खाण कंपनीच्या सहकार्याने राज्यात खाण अभियांत्रिकी अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे काय, असा सवाल त्यानी उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना पर्रीकर यांनी वरील माहिती दिली.
किती विद्यार्थी सध्या हा अभ्यासक्रम घेऊन शिकत आहेत असा प्रश्‍न काब्राल यांनी विचारला होता. त्यावर उत्तर देताना पहिल्या वर्षात १८ विद्यार्थी, दुसर्‍या वर्गात ३६ विद्यार्थी, तिसर्‍या २९ विद्यार्थी व अंतिम वर्षात ३२ विद्यार्थी शिक्षण घेत असल्याची माहिती पर्रीकर यांनी दिली. या अभ्यासक्रमासाठी लागणारी इमारत, प्रयोगशाळा, अवजारे, मनुष्यबळ हे सेझा गोवाने दिलेले आहे. त्याशिवाय हा अभ्यासक्रम शिकवणार्‍या शिक्षकांचे वेतन तसेच अन्य खर्च याची पाच वर्षापर्यंत ते जबाबदारी घेणार असल्याचे पर्रीकर यांनी यावेळी सांगितले. पाच वर्षांनंतर हा अभ्यासक्रम बंद करण्यात येईल काय, असे काब्राल यांनी विचारले असता घाबरण्याचे कारण नाही. सरकार हा अभ्यासक्रम बंद करणार नसल्याचे पर्रीकर यांनी यावेळी स्पष्ट केले.
युद्धाने काही साध्य होत नाही हे उमगले : वाघ
अभिनंदनपर ठरावावरील चर्चेस उत्तर
गेले चार महिने आपण आजारी होतो. या काळात राजकारण, साहित्य, जीवन या विषयी चिंतन करण्याचे काम केले. त्यामुळे युद्ध करून काहीही साध्य होत नाही, प्रेमानेच माणसे जोडता येतात अशी आपली भावना तयार झाल्याचे आमदार, कवी, लेखक, नाटककार विष्णू सूर्या वाघ यांनी काल विधानसभेत आपल्यावरील अभिनंदनाच्या ठरावास उत्तर देताना सांगितले. विजय सरदेसाई व आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यानीही हेच धोरण अंगिकारले असेही वाघ यांनी सांगितले.
आचार्य अत्रे साहित्य पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल वाघ यांचे अभिनंदन करणारा ठराव साखळीचे आमदार डॉ. प्रमोद सावंत यांनी मांडला होता.
या ठरावावर मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, वनमंत्री एलिना साल्ढाना, वीजमंत्री मिलिंद नाईक, उद्योगमंत्री महादेव नाईक, मंत्री दयानंद मांद्रेकर, किरण कांदोळकर, लवू मामलेदार, विरोधी नेते प्रतापसिंह राणे, विजय सरदेसाई, पांडुरंग मडकईकर, राजन नाईक, मायकल लोबो, कार्लुस आल्मेदा, उपसभापती अनंत शेट, निलेश काब्राल यादी सदस्यांनी वाघ यांचा गौरव करणारी भाषणे केली.
वीज खात्याच्या निष्काळजीपणामुळे लाईनमनचे अपघाती मृत्यू
मायकल लोबो यांचा आरोप
गेल्या १५ दिवसांत वीज खात्यातील ४ लाईनमेनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याचे काल आमदार मायकल लोबो यांनी शून्य तासाला विधानसभेत सांगितले. वीज खात्याच्या हलगर्जीपणामुळे लाईनमेनचे अपघाती मृत्यू होत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला व वीज खात्याने यात लक्ष घालण्याची मागणी केली.
त्यावेळी उत्तर देताना वीजमंत्री मिलिंद नाईक म्हणाले की या लाईनमेनच्या सुरक्षेसाठीचे किट घेण्यासाठी भत्ते देण्यात येतात. मात्र, त्या पैशांतून ते सुरक्षेसाठीचे बुट, हेल्मेट, हातमोजे घेत नसावेत असा आम्हाला संशय असून त्यामुळे यापुढे त्यांना त्यासाठी भत्ते न देता वरील वस्तूच देण्यात येणार असल्याचे नाईक यांनी स्पष्ट केले.
वृक्ष कायद्यात दुरुस्ती करणार
मुख्यमंत्री पर्रीकरांचे आश्‍वासन
धोकादायक झाडे न तोडल्यास आपत्ती कोसळू शकेल असे सांगून कोणत्याही झाडाची फांदी तोडली तरी वन खात्याकडून नोटिसा येतात. त्यामुळे अधिकारी झाडे तोडण्यास घाबरतात, असे उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांनी काल विधानसभेत विजय सरदेसाई व नरेश सावळ यांनी आणलेल्या लक्षवेधी सूचनेवर उत्तर देताना सांगितले.
राज्यात एखादा रासायनिक अपघात झाल्यास सरकारला जुवारी किंवा सिंजेंटावर अवलंबून राहावे लागते. आपल्या भागात अनेक वृक्ष कोसळल्याची माहिती देऊन आपत्कालीन व्यवस्थापनाने या कामासाठी सुसज्ज असा वेगळा कक्ष स्थापन करण्याची मागणी सरदेसाई यांनी केली. या विषयावरील चर्चेच्यावेळी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी हस्तक्षेप करून वृक्ष कायद्यात दुरुस्ती करण्याचे आश्‍वासन दिले. सत्तरी वादळग्रस्ताना येत्या शुक्रवारपर्यंत ७३० धनादेश वितरित करण्याचे आश्‍वासनही उपमुख्यमंत्र्यांनी दिले.