विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान

0
46

>> १२ पक्ष आणि ६९ अपक्षांसह ३०१ उमेदवार निवडणूक रिंगणात

>> निवडणूक यंत्रणा सज्ज, १७२२ मतदान केंद्रे

गोवा विधानसभेच्या चाळीस मतदारसंघांसाठी आज सोमवारी राज्यात मतदान होणार आहे. काल रविवारी या निवडणुकीसाठीची तयारी जोरात सुरू होती. मतदान यंत्रांसह मतदानासाठीचे साहित्य कालच मतदान केंद्रांवर पाठवण्यात आले होते. तसेच निवडणुकीचे कामकाज पाहणार्‍या कर्मचार्‍यांनीही काल रविवारी संध्याकाळीच आपापल्या मतदान केंद्रांकडे कूच केली होती.

निवडणूक आयोगाने ‘ईव्हीएम’ तसेच ‘व्हीव्हीपीएटी’ मशिन्स तसेच काल रविवारी सकाळी सर्व १७२२ मतदान केंद्रांवर नेमलेल्या कर्मचार्‍यांकडे सुपूर्द केल्यानंतर ह्या कमर्तचार्‍यांनी रविवारी संध्याकाळी आपापल्या मतदान केंद्रांकडे कूच केली. आज सकाळी ७ वाजल्यापासून राज्यभरातील १७२२ मतदान केंद्रांवरून मतदानाला सुरवात होणार असून ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत चालू राहणार आहे.

३०१ उमेदवार रिंगणात
राज्यातील ४० विधानसभा मतदारसंघांतून ३०१ उमेदवार रिंगणात आहेत. ह्या सर्व उमेदवारांचे राजकीय भवितव्य आज ‘ईव्हीएम’मध्ये सीलबंद होणार आहे. सत्ताधारी भाजप, प्रमुख विरोधी पक्ष असलेला कॉंग्रेस, गोव्यातील सर्वांत जुना असलेला प्रादेशिक पक्ष मगो, गोव्यातील नवे प्रादेशिक पक्ष गोवा फॉरवर्ड व रेव्हुलेशनरी गोवन्स, राष्ट्रवादी कॉंग्रेस, आम आदमी पक्ष, तृणमूल कॉंग्रेस, शिवसेना ह्या पक्षांबरोबरच गोव्यासाठी नवखे असलेले संभाजी ब्रिगेड, जय महाभारत व गोयचो स्वाभिमान असे एकूण १२ पक्ष यंदाच्या निवडणूक रिंगणात आहेत. पैकी सत्ताधारी भाजप हा सर्व चाळीसही मतदारसंघातून निवडणूक लढवीत आहे. तर कॉंग्रेस पक्षाने गोवा फॉरवर्ड पक्षाबरोबर युती केलेली असून दोन जागा फॉरवर्डला सोडलेल्या असून स्वत: ३८ जागांवरून निवडणूक लढवीत आहे. तर आम आदमी पक्ष ३९ जागांवरून निवडणूक लढवीत आहे. आपने फक्त उत्तर गोव्यातील डिचोली मतदारसंघातून निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. तृणमूल कॉंग्रेस पक्षाबरोबर युती केलेला मगो पक्ष १३ मतदारसंघांतून निवडणूक लढवीत असून तृणमूल कॉंग्रेस २६ मतदारसंघातून निवडणूक लढवीत आहे, तर आरजी ३८ मतदारसंघांतून निवडणूक लढवीत आहे. शिवसेना ११, राष्ट्रवादी ९ मतदारसंघातून निवडणूक लढवीत आहे. तसेच जय महाभारत हा पक्ष ६ मतदारसंघांतून, संभाजी ब्रिगेड ३ तर गोयचो स्वाभिमान पक्ष ४ मतदारसंघातून निवडणूक लढवीत आहे.

२५ हजार निवडणूक कर्मचारी
निवडणुकीचे कामकाज हाताळण्यासाठी एकूण २५ हजार कर्मचार्‍यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्याशिवाय सुरक्षा व्यवस्था सांभाळण्यासाठी स्थानिक पोलीस व निमलष्करी दलाच्या ५५ तुकड्या मिळून ८५०० पोलीस राज्यात बंदोबस्तासाठी तैनात करण्यात येणार आहेत.

तीन दिग्गज नेते यंदा रिंगणात नाहीत
पर्ये मतदारसंघातून गेल्या ५० वर्षांपासून अखंडितपणे गोवा विधानसभेत प्रतिनिधित्व करणारे कॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रतापसिंह राणे हे यंदा निवडणूक रिंगणात नाहीत. त्याचबरोबर एकेकाळचे कॉंग्रेसचे व हल्लीच तृणमूल कॉंग्रेस पक्षात प्रवेश केलेले लुईझिन फालेरो हेही यावेळी निवडणूक रिंगणात नाही. एकेकाळचे कॉंग्रेसचे व आता भाजपचे नेते बनलेले कुंभारजुवे मतदारसंघातील आमदार पांडुरंग मडकईकर यांना अनारोग्याच्या कारणास्तव भाजपने उमेदवारी नाही. त्यांच्याऐवजी त्यांच्या पत्नी जेनिता मडकईकर यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे.

शिवोलीतून सर्वांधिक उमेदवार

उत्तर गोव्यातील शिवोली मतदारसंघातून सर्वाधिक १३ उमेदवार रिंगणात आहेत. त्या पाठोपाठ मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा मतदारसंघ असलेल्या साखळी मतदारसंघातून १२ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत.

दक्षिणेत १४, उत्तरेत १६ असुरक्षित केंद्रे

दक्षिण गोवा जिल्हाधिकारी रूचिका कटियाल यांनी दिलेल्या माहितीनुसार दक्षिण गोव्यात ४६ मतदान केंद्रे ही गंभीर आणि १४ असुरक्षित आहेत. उत्तर गोवा जिल्हाधिकारी अजित रॉय यांनी दिलेल्या माहितीनुसार उत्तर गोव्यात ११ गंभीर व १६ मतदान केंद्र ही असुरक्षित आहेत.
ह्या मतदान केंद्रावर कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

६९ अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात

राज्यातील ४० मतदारसंघांत तब्बल ६९ अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. त्यात मनोहर पर्रीकर यांचे सुपुत्र उत्पल पर्रीकर हे पणजी मतदारसंघातून निवडणूक लढवीत आहेत. पणजीतून भाजपने बाबूश मोन्सर्रात यांना उमेदवारी दिल्याने बंडखोरी करीत उत्पल हे अपक्ष म्हणून पणीतून रिंगणात उतरले आहेत.

माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर हेही यंदा अपक्ष उमेदवार म्हणून मांद्रे मतदारसंघातून निवडणूक लढवीत आहेत. भाजपने उमेदवारी न दिल्यामुळे बंड करीत पार्सेकर हे मांद्रेतून अपक्ष म्हणून लढत आहेत. बांधकाम मंत्री असलेले दीपक पाऊस्कर हेही पक्षाने उमेदवारी नाकारल्यामुळे सावर्डे मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवीत आहेत.

कुडतरी मतदारसंघातून गेल्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसच्या उमेदवारीवर विजयी झालेले आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स हेही यंदा अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवीत आहेत. कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देत तृणमूलमध्ये प्रवेश केला होता. मात्र नंतर त्यांनी तृणमूलही सोडला. अखेर त्यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरा आहे.

उपसभापती असलेले भाजपचे काणकोणचे आमदार इजिदोर फर्नांडिस यांना भाजपने उमेदवारी नाकारत माजी आमदार रमेश तवडकर यांना उमेदवारी दिली. त्यामुळे इजिदोर हेही यंदा अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवित आहेत. काणकोणचेच आणखी एक माजी आमदार विजय पै खोत हेही यंदा काणकोणमधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवीत आहेत.