येत्या गोवा विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्ष राज्यातील चाळीसही मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे काल पक्षाचे राज्य संयोजक राहुल म्हांबरे यांनी दै. नवप्रभाशी बोलताना सांगितले. सर्व चाळीसही मतदारसंघांत पक्षाच्या कार्यकर्त्यांची फळी तयार असून निवडणूक लढवण्यास योग्य असे उमेदवारही पक्षाकडे असल्याचे ते म्हणाले.
कॉंग्रेस, मगो, गोवा फॉरवर्ड आदी सर्व विरोधी पक्ष हे भाजपशी हातमिळवणी करणारे पक्ष असल्याचे आम आदमी पक्ष र् कधीही या पक्षांबरोबर युती करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
गेल्या दोन वर्षांपासून आम आदमी पक्षाने राज्यात जनसेवेचे काम हाती घेतलेले आहे व त्यामुळे आता आम्हाला अन्य पक्षांप्रमाणे विधानसभा निवडणुका जवळ आल्याच्या पार्श्वभूमीवर प्रचाराचे काम हाती घेण्याची गरज नसल्याचे राहूल म्हांबरे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले. कोविड महामारीच्या काळात पक्षाने हजारो कोविड रुग्णांना प्राणवायू पुरवण्याचे काम केले. तसेच राज्यातील कोविड रुग्ण, त्यांचे नातेवाईक, परिचारिका, सुरक्षा रक्षक आदी मिळून सुमारे १७ हजार जणांना पक्षाने रोज मोफत अन्न पुरवल्याचे ते म्हणाले. त्याशिवाय पक्षाने आणीबाणिच्या प्रसंगी कित्येक कोविड रुग्णांना प्राणवायू पुरवल्याने त्यांचे प्राण वाचू शकले याचे आम्हाला समाधान आहे, असे ते म्हणाले. कोविड रुग्णांची संख्या आता कमी झाल्याने आता आम्ही कोविड रुग्णांना अन्नपुरवठा करण्याचे काम थांबवले असल्याचीे माहितीही त्यांनी दिली. येत्या विधानसभा निवडणुकीतील मुद्द्याविषयी बोलताना ते म्हणाले की, महागाई हा सर्वांत मोठा मुद्दा आहे. पेट्रोल, डिझेल, खाद्य तेल तसेच अन्य सर्व जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती प्रचंड वाढलेल्या असून त्यामुळे सामान्य लोकांचे हाल होऊ लागले आहेत. बेरोजगारी हा दुसरा महत्त्वाचा मुद्दा असल्याचे ते म्हणाले.
आम आदमी पक्षाला निवडणुकीत किती जागा मिळतील असे विचारले असता आम्ही गोव्यातील जनतेसाठी गेल्या एक-दोन वर्षांत जे काही केलेले आहे ते सर्वश्रुत आहे. त्यामुळे या निवडणुकीत लोक आमच्या बाजूने राहतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पक्षाचे नेते दिल्लीतून प्रचारासाठी कधी गोव्यात येतील, असे विचारले असता त्यांनी, खरे म्हणजे आमचे पक्षप्रमुख व नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे मागच्या मे महिन्यातच त्यासाठी गोव्यात येणार होते. मात्र कोरोनाच्या दुसर्या लाटेमुळे त्यांना येता आले नाही. केजरीवाल हे राज्यातील पक्ष नेत्यांच्या संपर्कात असल्याचे सांगितले.
गोवा विधानसभा निवडणूक प्रचाराच्या दरम्यान आम आदमी पक्ष आपला अत्यंत यशस्वी ठरलेला ‘दिल्ली मॉडेल, गोव्यातील जनतेसमोर ठेवणार असल्याचे त्यांनी सरतेशेवटी सांगितले.