>> सायंकाळनंतर जमावबंदी आदेश लागू; सभा, कोपरा बैठका, घरोघरी प्रचारास मनाई
गोवा विधानसभा निवडणुकीसाठी गेल्या काही दिवसांत विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी प्रचाराचा धुरळा उडवून दिला होता. सर्वच पक्षांच्या नेत्यांनी विविध आश्वासने व जाहीरनामे जाहीर करत मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. आता या निवडणुकीसाठीचा जाहीर प्रचार शनिवारी संपत असून, या पार्श्वभूमीवर संध्याकाळी ६ वाजल्यापासून राज्यभरात १४४ कलम लागू होणार आहे. परिणामी कुणालाही राज्यभरात सभा घेता येणार नसून, पाचपेक्षा जास्त जणांना एका ठिकाणी जमाव करण्यावर बंदी असेल. उत्तर आणि दक्षिण गोवा जिल्हाधिकार्यांनी त्यासंबंधीचा आदेश काढला आहे.
या आदेशानुसार १२ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ६ वाजल्यापासून १४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत १४४ कलम राज्यभरात लागू राहणार आहे. निवडणूक लढवणारे उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनाही या आदेशाचे पालन करावे लागणार आहे. त्यांनी जमाव करून सभा घेण्याचा प्रयत्न केला तर ती सभा बेकायदेशीर ठरवण्यात येणार आहे. तसेच उमेदवारांना घरोघरी प्रचार, मिरवणूक किंवा रॅली आयोजित करण्यास किंवा कोपरा बैठका आयोजित करण्यास देखील बंदी लागू केली आहे.
निवडणूक लढवणार्या उमेदवारांना निर्वाचन अधिकार्यांनी प्रचारासाठी जी वाहने वापरण्यास परवानगी दिली आहे, ती वाहने या काळात बंद ठेवावी लागतील. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या वाहनांचा मतदारांना पैसे अथवा भेटवस्तू वितरित करण्यासाठी वापर केला जाऊ नये, यासाठी तसेच या वाहनांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी ही बंदी घालण्यात आली आहे. निर्वाचन अधिकारी, डीईओ व सीईओ हे जी वाहने वापरण्यास परवानगी देतील, तेवढीच वाहने वापरता येणार असल्याचे आदेशातून नमूद करण्यात आले आहे.
खासगी वाहनांचा उमेदवारांकडून पैसे, मद्य अथवा भेटवस्तू वाटण्यासाठी वापर केला जाऊ नये यासाठी त्यांची देखील योग्य प्रकारे तपासणी केली जाणार आहे. मात्र, वरील आदेश हा निवडणुकीचे कामकाज सांभाळणार्या अधिकृत अधिकार्यांना लागू होणार नाही. तसेच दंडाधिकारी, पोलीस, सरकारी कर्मचारी यांनाही हा आदेश लागू राहणार नाही. तसेच विवाह सोहळे, धार्मिक उत्सव व अंत्ययात्रा यात सामील होणार्या लोकांना हा आदेश लागू होणार नाही. तसेच जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी यांना एखाद्या विशेष कारणांसाठी जर जमावाला एकत्र जमू दिले जाऊ शकते असे वाटत असेल तर पूर्वपरवानगी घेऊन अशा जमावाचे या कार्यक्रम करू दिले जातील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.