विधानसभा अधिवेशन आजपासून

0
119

गोवा विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाला आज प्रारंभ होत असून ते ३ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. या अधिवेशनासाठी सदस्यांनी एकूण १ हजार ८६८ प्रश्‍न सादर केले आहेत. त्यात तारांकित ७३४ आणि अतारांकित ११३४ प्रश्‍नांचा समावेश आहे. सरकारतर्फे सात विधेयके सादर केली जाणार आहेत. तसेच दोन सदस्यांनी खासगी विधेयके सादर केली आहेत.

कॉंग्रेस पक्षाने या अधिवेशनात खाण बंदी, सीआरझेड वाद, अमलीपदार्थ, ङ्गॉर्मेलीन युक्त मासळी, वीज पुरवठा आदी विषयांवरून सरकारला कोंडीत पकडण्यासाठी मोर्चेबांधणी केली आहे. तसेच मुख्यमंत्री पर्रीकर यांनी सत्ताधारी गटाची बैठक घेऊन अधिवेशनासाठी रणनीती तयार केली आहे.

गेल्या फेब्रुवारी महिन्यात मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या आजारपणामुळे एका महिन्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन केवळ चार दिवसांवर आणले होते. आता पावसाळी अधिवेशन १२ दिवसांचे होणार आहे. उन्हाळी अधिवेशनामध्ये प्रश्‍न मांडण्यासाठी कमी वेळ मिळाला. त्यामुळे कॉंग्रेस पक्षाने पावसाळी अधिवेशन १८ दिवसांचे करण्याची मागणी केली होती. परंतु, ही मागणी मान्य करण्यात आली नाही.

सरकारकडून नगरनियोजन, लोकायुक्त, आरोग्य, मोपा, महसूल, सहकार, उच्च शिक्षण ही विधेयके सादर केली जाणार आहे. आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांचे खासगी विधेयक सादर केले जाणार आहे. तर, आमदार लुईझीन फालेरो यांचे खासगी विधेयक सरकारकडे पाठविण्यात आले आहे, असे सभापती डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

अधिवेशनात सकाळच्या सत्रात प्रश्‍नोत्तराचा तास आणि लक्षवेधी सूचना घेतल्या जाणार आहेत. दुपारच्या सत्रात अनुदानित पुरवणी मागण्यांवर चर्चा व उत्तर दिले जाणार आहे. शुक्रवार या खासगी कामकाजाच्या दिवशीसुद्धा अनुदानित पुरवणी मागण्यावर चर्चा केली जाणार आहे, असेही डॉ. सावंत यांनी सांगितले.