योगसाधना- ५५२, अंतरंगयोग- १३७
- – डॉ. सीताकांत घाणेकर
आजचा मानव ही बुद्धी अवश्य वापरतो. प्रत्येक क्षेत्रात त्याने नेत्रदीपक प्रगती केलेली आहे. खरेच ही अभिमानास्पद बाब आहे. परंतु त्याचबरोबर बहुतेकजण स्वार्थी, आत्मकेंद्री, अहंकारी झालेले आहेत. त्यामुळे ते स्वतःला विश्वाचा राजा समजायला लागले आहेत.
विधात्याने संपूर्ण सृष्टी, विश्व व त्यातील प्रत्येक घटक अत्यंत कल्पकतेने बनवला आहे. सामान्य मानवाची मर्यादित बुद्धी हे समजण्यासाठी कमी पडते. काही हरकत नाही. पण प्रत्येकाला ही जाणीव असायलाच हवी. भगवंताला भक्तांकडून कौतुकाची अपेक्षा नाही; पण संस्कारी, सुज्ञ, सज्जन व्यक्तींनी कृतज्ञता तरी ठेवावी. तसेच हे सर्व ज्ञान तथाकथित अशिक्षित लोकांना द्यावे. त्यामुळे सर्वांचा जीवनविकास होईलच पण विश्वाचा सांभाळ केला जाईल.
आजचा मानव हे करीत नाही. खरे म्हणजे देवाने मानवाला अप्रतिम बुद्धीचे वरदान दिलेले आहे. आपले भारतीय तत्त्ववेत्ते, ऋषी आपली उच्च बुद्धी भगवंताच्या कर्तृत्वाला समजण्यासाठी वापरत असत. या सृष्टीतील अत्यंत गहन व गूढ गोष्टींचे ज्ञान मिळविण्यासाठी तिचा उपयोग करत असत. निसर्गाची गहन रहस्ये ते शोधत असत. तसेच निसर्गावर प्रेम करत असत, त्याचा सांभाळ करत असत.
निसर्गातील प्रत्येक घटकाबरोबर समन्वय साधत असत. पृथ्वी, जल, वायू, अग्नी, आकाश ही पंचमहाभूते, तसेच वृक्ष-वनस्पती, पशू, पक्षी, जीवजंतू व मानवदेखील… यांतील अनेक घटकांना त्यांनी देवरूप मानले. त्यांची मनोभावे पूजा केली. त्यामुळे आद्य भारत विकासाकडे घोडदौड करत असे. ‘सोन्याचा धूर जिथून निघतो तो भारत देश’ अशी आपल्या देशाची उज्ज्वल प्रतिमा विश्वासमोर होती.
अनेक क्षेत्रांत विविध तर्हेचे उच्च ज्ञान एकत्रित करून या सर्वांनी अमूल्य असे साहित्य विश्वाला दिले. वेद, उपनिषदे, योगशास्त्र, आयुर्वेदशास्त्र, रामायण, महाभारत यांसारखी काही काव्ये, पुराणे, योगवसिष्ठ… भारतीय भाषा संस्कृतदेखील सर्व भाषांची जननी आहे असे मानले जाते. म्हणून तिला ‘देवभाषा’ म्हणून संबोधत असत.
आजचा मानव ही बुद्धी अवश्य वापरतो. प्रत्येक क्षेत्रात त्याने नेत्रदीपक प्रगती केलेली आहे. खरेच ही अभिमानास्पद बाब आहे. परंतु त्याचबरोबर बहुतेकजण स्वार्थी, आत्मकेंद्री, अहंकारी झालेले आहेत. त्यामुळे ते स्वतःला विश्वाचा राजा समजायला लागले आहेत. निसर्गाचा जणू काय तो स्वामी आहे असाच वागतो आहे. सर्व षड्रिपू- काम, क्रोध, मद, मत्सर, लोभ, मोह सतत वाढतच आहे. भौतिक प्रगती हाच त्याचा केंद्रबिंदू बनलेला आहे. आध्यात्मिक पैलूकडे त्याचे तेवढे लक्षच नाही. त्यामुळे वेळोवेळी लढाया, युद्धे, महायुद्धे चालूच आहेत. यासाठी तो महाभयंकर विनाशकारी शस्त्रे बनवतो आहे. एकमेकांवर त्याचा विश्वासच नाही, त्यामुळे विश्वाची आज घोर विनाशाकडे वाटचाल चालू आहे…
अशा या परस्परविरोधी घटनांचा विचार केला तर लक्षात येते की हे सर्व मानवाच्या हातात आहे…
- विकास की विनाश?
- भौतिक प्रगती की आध्यात्मिक प्रगती? काय दोन्हींचा समन्वय?
हे सर्व ज्ञान आपण ‘करदर्शन’ यासंदर्भात बघतो आहोत. आतापर्यंत आपण बघितले की हात हे पुरुषार्थाचे प्रतीक आहे, म्हणून प्रातःकाली प्रार्थना म्हणता-म्हणता त्यांची जाणीव करून घ्यायची असते.
हा मुद्दा सोप्या रीतीने समजावण्यासाठी प. पू. पांडुरंगशास्त्री यासंदर्भात एक छान सोपी गोष्ट सांगतात-
महात्मा कन्फ्युसियश एक आश्रम चालवीत असत. त्यात अनेक विद्यार्थी येत असत. आश्रमात एक प्रथा होती- विद्यार्थ्याचे शिक्षण संपल्यावर तो आश्रम सोडून स्वगृही जात असे, त्यावेळी तो आपल्या गुरूला एक शेवटचा प्रश्न विचारीत असे. गुरूकडून समाधानकारक उत्तर मिळेल अशी त्या विद्यार्थ्यांची अपेक्षा असे.
एकदा एका तथाकथित हुशार विद्यार्थ्याने गुरुजींना गोत्यात आणायचे ठरवले. त्याने एका लहानशा पक्ष्याला आपल्या दोन्ही हातांमध्ये पकडले आणि गुरुजींना प्रश्न केला- ‘‘गुरुदेव, माझ्या हातातील पक्षी जिवंत आहे की मेलेला आहे, ओळखा पाहू…?’’
कन्फ्युसियश फार हुशार होते. शेवटी गुरू ते गुरूच! त्यांच्या लगेच लक्षात आले की हा शिष्य हुशार आहे आणि आपल्याला खोटा सिद्ध करायला निघाला आहे. त्यामुळे जर आपण म्हटले की पक्षी मेलेला आहे तर तो हात उघडून दाखवेल आणि म्हणेल, पक्षी जिवंत आहे व त्याला सोडून देईल. जर आपण म्हटले की पक्षी जिवंत आहे तर तो त्या पक्ष्याला हातामध्ये दाबून मारून टाकील व मेलेला पक्षी दाखवेल.
गुरूंनी या मुद्यावर विचार करून लगेच अत्यंत मार्मिक उत्तर थोडक्यात दिले. ते म्हणाले-
‘‘पक्षी जिवंत आहे की मेलेला आहे ते तुझ्या हातात आहे. तुझ्या इच्छेवर अवलंबून आहे. तुला पाहिजे तर तो जिवंत राहील, तुला नको असेल तर तो मरेल.’’
शास्त्रीजी म्हणतात ः ‘‘कन्फ्युशियसचे हे उत्तर मानवासाठी चिरंतन प्रेरणामंत्रासमान आहे. आपल्या मनात उठत असलेले अनंत विकल्प संकल्पात फिरवून टाकण्याची अमोघ शक्ती या मंत्रात साठलेली आहे. आपल्या जीवनात येणार्या सर्वच प्रश्नांची उत्तरे आपल्या हातात आहेत.’’
सारांश रूपात शास्त्रीजी छान समजावतात ः
- जीवनाचे ध्येय साकार करणारे.
- मानवाला पुरुषार्थासाठी प्रोत्साहित करणारे.
- भौतिक जीवनाला दिव्य वळण देणारे.
- वित्त व विद्या प्राप्तीसाठी उद्यमी बनवणारे.
- प्रभुस्पर्शासहित विद्या व वित्त यांची उच्चता समजावणारे प्रतीक म्हणजे करदर्शन.
प्रभुस्पर्श किती महत्त्वाचा आहे हे या श्लोकात कळते ः - पाण्याचे तीर्थ होते.
- वस्तूंचा प्रसाद होतो.
- क्षेत्राचे तीर्थक्षेत्र होते.
- डाकूचा महर्षी होतो.
करदर्शनाचा विचार करताना माझ्या मनात अशा व्यक्ती येतात की दुर्भाग्याने त्यांना हातच नाहीत! पण परमेश्वराने त्यांना दुसर्या शक्ती दिलेल्या आहेत. उदा. त्यांतील काहीजण उत्कृष्ट चित्रकार आहेत. मुख व पाय यांचा उपयोग करून ते छान चित्रे काढतात. खरेच, त्यांची दृढता व कर्तृत्वशक्ती वाखाणण्याजोगी आहे. हात नाहीत म्हणून ते रडत बसत नाहीत, तर प्रयत्न करून आपली कला विश्वासमोर आणतात. विधात्याची अगाध लीला! अशा व्यक्तींना शतशः प्रणाम!!
सौभाग्याने देवाने आपल्याला हात दिले आहे. त्यांचा जेवढा होईल तेवढा सदुपयोग करूया. त्यासाठीच प्रातःकालचा करदर्शनाचा श्लोक अत्यंत महत्त्वाचा आहे. तो म्हणताना शब्दार्थ, भावार्थ, गर्भितार्थ, आध्यात्मिक अर्थ समजून घ्यावा.
(संदर्भ ः प. पू. पांडुरंगशास्त्री आठवले- ‘संस्कृती पूजन’)