- – रमेश सावईकर
साधक परिणामांच्या तुलनेत बाधक परिणामांचे प्रमाण अधिक आहे, ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन आपल्या मुलांवर चांगले संस्कार करून त्यांना घडविणे आणि सुसंस्कृत व सुजाण नागरिक बनविणे हे आजच्या पालकवर्गासमोर एक आव्हान बनून उभे ठाकले आहे.
नवीन पिढीवर संस्कार करून तिला घडविणे हे काम आजची एकूण परिस्थिती पाहता तसे सोपे नाही. त्यास अनेक कारणे आहेत. बदलती कौटुंबिक परिस्थिती किंवा कुटुंबव्यवस्था हे एक प्रमुख कारण म्हणता येईल. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे, झपाट्याने बदलत चाललेली सामाजिक स्थिती. या दोन्ही घटकांचा परिणाम मुलांवर होत असतो. साधक परिणामांच्या तुलनेत बाधक परिणामांचे प्रमाण अधिक आहे, ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन आपल्या मुलांवर चांगले संस्कार करून त्यांना घडविणे आणि सुसंस्कृत व सुजाण नागरिक बनविणे हे आजच्या पालकवर्गासमोर एक आव्हान बनून उभे ठाकले आहे.
मुलांवर संस्कार करण्याची सर्वात मोठी जबाबदारी त्यांच्या पालकांवर असते. शाळेत विद्यादान करणारे अध्यापक तथा गुरुजी आणि सामाजिक क्षेत्रात वावरणारी मंडळी यांच्यावरती मुलांवर व युवा पिढीवर संस्कार करण्याची जबाबदारी नंतरची. तीही तेवढीच महत्त्वाची आहे. संस्कार घरापासून सुरू होतात. कारण शालेय शिक्षण घेत असताना मुले अधिक वेळ घरात असतात.
मूल जन्माला आल्यानंतर त्याचे व्यवस्थित संगोपन व्हायला हवे. यात वडिलांपेक्षा मातेची जबाबदारी अधिक असते. आजच्या नव्या आधुनिक काळात महिलांचा नोकरी करण्याकडे अधिक कल असतो. कुटुंबाची आर्थिक स्थिती पाहता जुन्या-नव्या पिढीच्या जीवनविषयक संकल्पना, विचारसरणी व जीवनशैली बदलल्याने, वाढत्या मागण्यांमुळे वाढलेला आर्थिक खर्च व मिळकत यांचा ताळमेळ घालताना नोकरी-व्यवसाय करणारे पुरुष आणि महिला यांचा जीव मेटाकुटीला येतो. त्यामुळे जीवन जगण्यातील सहजसुंदरता, जीवनानंद व सुख आपण हरवून बसलो आहोत.
पूर्वीच्या काळी घर सांभाळणे ही जबाबदारी पूर्णपणे सक्षमतेने महिला निभावत असत. आज घरी मुलांना पाहण्यासाठी, संगोपनविषयक दैनंदिन कामं करण्यासाठी घरात बाई ठेवली जाते. ती मुलांना प्यायला-खायला वेळच्या वेळी देण्याचे काम करते. तथापि, मातृत्वाची माया ती देऊ शकत नाही. मातृवात्सल्यास मुले पोरकी होतात. मानसिक दृष्टिकोनातून विचार केल्यास मुलांच्या कोमल मनावर ज्या मायेच्या, प्रेमाच्या भावनेने संस्कार व्हायला पाहिजेत ते होत नाहीत.
मुलांच्या देखरेखीसाठी सुशिक्षित, सुजाण बाईमाणूस मिळत नाही. आपली व आपल्या कुटुंबातील माणसांच्या पोटाची वीतभर खळगी भरण्यासाठी व आर्थिक चणचणीमुळे या बायांना मुलांना सांभाळण्याचे काम करावे लागते. तिच्या आव्हानात्मक परिस्थितीचे पडसाद व परिणाम कळत-नकळत नाजूक मानसिक अवस्थेतून वाढ होणार्या बालकांच्या मनावर होत असतात. बालवयात मुलांची मने नव्याकोर्या पाटीसारखी असतात. त्या पाट्यांवर धड्यांची अक्षरे कोरण्याऐवजी ओरखाडे अधिक प्रमाणात काढले जातात, ही वस्तुस्थिती आहे. त्याचे भान आजच्या पालकांना जेवढे असायला हवे तेवढे दिसत नाही. कदाचित जीवनात त्यासाठी तडजोडही त्यांना करावी लागते.
लहान वयात मुलांना चांगलं काय, वाईट काय या गोष्टीचं ज्ञान देणारं कुटुंबात असतंच कोण? विभक्त कुटुंबपद्धतीमुळे आई-वडील व त्यांचे मूल (आता दोनाऐवजी एकच) असे त्रिकोणी जीवन! कामावरून दमून घरी येणारे वडील, चूल-मूल-नोकरी या तिन्हीची जबाबदारी घेऊन दमछाक होणारी घरची महिला मुलांसाठी कोठून वेळ देणार? संध्याकाळी मुलांना हातपाय धुतले का? देवाला नमस्कार करून ‘शुभम्करोती…’ म्हटलं का? शाळेचा अभ्यास केला का? आदी प्रश्न विचारण्याइतपतसुद्धा पालकांकडे उसंत नसते. दिवसभराचा थकवा घालविण्यासाठी, मन हलकं करण्याकरिता दूरदर्शनसमोर सर्रासपणे नोकरी करणारे मुलांचे बाप बैठक मारतात. चूल नि मूल यांच्याकडे पूर्वी लक्ष देणार्या आताच्या महिला चूल नि दूरदर्शन याकडे लक्ष देणे पसंत करतात. याचा परिणाम असा होतो की, शाळेत जाणारं मुलं एकाकी पडतं. हा वेळ स्वतंत्रपणे व्यतीत व्हावा म्हणून मोबाईल फोनमध्ये मुले एवढी गुंतून जातात की घरात काय चाललंय हे त्यांना ठाऊकदेखील नसतं.
वडिलांनी मुलाला मोबाईलसह पाहिलं की त्याच्यावर खेकसण्याचं काम तेवढं करतात. मोबाईल घेऊन काय बसलास? अभ्यास कर! असं त्याला सांगायचं नि आपली दृष्टी दूरदर्शनवर केंद्रित करायची. अशी परिस्थिती असेल तर मुलांना मोबाईल-टीव्हीपासून परावृत्त करण्याचा कोणता नैतिक अधिकार पालकांना आहे? ‘आधी केलेचि पाहिजे नि मग सांगितले पाहिजे’ असं पालकांबाबत घडत नाही. एकदा मुलांचे संस्कारक्षम, संवेदनशील मन बिघडलं गेलं की त्याचा गैर मानसिक परिणाम मुलांवर होतो.
दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, पालक मुलांना गावातील जवळच्या प्राथमिक शाळेत शिकण्यासाठी दाखल न करता शहरातील शाळांत (इंग्रजी माध्यम) दाखल करतात. त्यांना ने-आण करण्यासाठी वडील किंवा आईला वेळ काढावाच लागतो. समाजजीवनामध्ये आपला दर्जा वाढावा, स्पर्धेत कुठेही आपण कमी पडू नये असा त्यांचा अट्टहास असतो. त्याविषयी साधक-बाधक विचार करता ही बाब फजूल वाटते. गावातल्या मराठी किंवा कोकणी माध्यमाच्या शाळांतून प्राथमिक शिक्षण घेतले म्हणून मुले भविष्यात मागे पडतात, ही चुकीची समजूत आहे. खरेतर यामुळे मुलांवर जादा दबाव पडतो व त्यांचे शारीरिकदृष्ट्या खच्चीकरण होते. मुलांचा मानसिक दृष्टिकोनातून पालकांनी विचार करायला हवा. पण दुर्दैवाने तसे घडत नाही. एक पळतो म्हणून दुसरा पळतो… पळापळीच्या या स्पर्धेत गुणात्मक शिक्षण मुलांना उपलब्ध होतंच असं नाही. आपली कौटुंबिक, आर्थिक परिस्थिती काय आहे ती ओळखून, जाणून त्यानुसार मुलांना शिक्षण देणे गरजेचे, फायद्याचे व अधिक श्रेयस्कर ठरते या बाबीची जाणीव पालकांना असायला हवी. शहरांतील नामांकित शाळांत श्रीमंताची मुले अधिक असतात. मध्यमवर्गीय स्पर्धेसाठी त्या शाळांत मुलांना पाठवितात. काही गरीब पालकसुद्धा पोटाला चिमटा काढावा लागला तरी मुलांना चांगले शिक्षण मिळावे म्हणून स्पर्धेत उतरतात. त्यामुळे सर्वच बाबतीत श्रीमंत व गरीब यांमधला फरकाचा परिणाम मध्यम व गरीब मुलांवर होतो. हे समजण्यासाठी पालक तेवढे सुजाण हवे.
मुलांना घडविण्याबाबतचा दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पालक सर्रासपणे मुलांना पूर्ण दिवसभर गुंतून ठेवणे पसंत करतात. घरी राहिली तर ती फक्त मस्ती करणार, असा मनात हेतू धरून बसतात. सकाळी शाळा व संध्याकाळी शिकवणीचे वर्ग तसेच कलागुणांचा विकास व्हावा म्हणून पेटी, तबला, गायन, नृत्य आदी विषयांची शिकवणी… मुलांचे वय, त्यांची शारीरिक व मानसिक क्षमता यांचा विचार पालक करीत नाहीत. मुलांवर एकप्रकारे हा मानसिक दबावच म्हणावा! त्याचा विपरीत परिणाम बर्याच वेळा होतो. म्हणतात ना, ‘एक ना धड, भाराभर चिंध्या’ असा प्रकार प्रत्ययास येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पालकांनी नेहमीच सकारात्मक वैचारिक दृष्टिकोन ठेवायला हवा. आपलं मूल चांगलं आहे, त्याची प्रगती होत आहे हे ध्यानात घेऊन मुलांना कौतुकाची थाप वेळोवेळी द्यावी. फजूल स्तुतिसुमने उधळू नका, पण वेळ येते तेव्हा त्यांचे गोड कौतुक करण्यासही विसरू नका. मुलांमध्ये आईवडिलांच्या नात्याचे अतूट अनुबंध कसे बारकाईने विणले जातील याकडे पाहिले जावे. आणि तसे घडले नाही तर मुळातच कमी असलेले हे अनुबंध आणखीन विस्कळीत होऊन जातील याची जाणीव पालकांनी ठेवायला हवी.
आजची नवीन पिढी बिघडत चालली आहे. विविध आकर्षणांमुळे त्यांचे जीवन सैरभैर होत आहे. त्यांना कोण सावरणार? सामाजिक परिस्थितीच वाईट आहे असे म्हणण्याचा, ते लोकांना ऐकविण्याचा ठेका पालकांनी स्वतःकडे घेऊ नये. समाजाला, परिस्थितीला दोष देण्याऐवजी स्वतःकडे अंगुलिनिर्देश करून आत्मपरीक्षण करावे. मुलांना घडविण्यात आपण कुठे कमी पडलो, किती व कसे कमी पडलो याचा विचार व्हायला हवा. त्याकरिता संस्कार म्हणजे नेमकं काय? मुलांवर संस्कार होण्याची- घडवण्याची प्रक्रिया कशी होत असते याचे ज्ञान पालकांना हवे. त्यांनी ते ज्ञान संपादन करून स्वतः सुजाण व्हावे, तेव्हाच मुलांना समजून घेणे, त्यांच्यावर चांगले संस्कार करणे आणि त्यांना उत्तमरीत्या जबाबदार भावी नागरिक घडविणे पालकांना शक्य आहे. ‘मुलं ही देवाघरची फुलं’ असं आपण मानतो. ज्या पवित्र, भक्तिप्रद, आपलेपणाच्या भावनेने आपण देवाच्या चरणी कोमल हस्ते, निर्विकार मनाने फुले वाहतो, तीच भावना मनात ठेवून मुलांचे संगोपन व्हायला हवे. त्यांची नाजूक-कोमल मने सांभाळून, जाणून घेऊन माय-भावनेच्या पुष्पवृष्टीत मुले लहानाची मोठी व्हायला हवीत.
शालेय व महाविद्यालयीन शिक्षण घेताना मुलं ‘टीन एज्’ (तेरा ते एकोणीस वयोगट) अवस्थेतून जात असतात. या अवस्थेत साधारणतः चौदा वर्षे वयाची मुले आपले स्वतंत्र विचार व्यक्त करतात. पण केव्हा केव्हा पालक त्यांना ‘तत्त्वज्ञानी’ म्हणून हिणवतात आणि साधेसुधे विचार व्यक्त केले तर ‘बालिश’ म्हणून निरुत्साही करतात. यामुळे मुलांच्या मनावर मोठा परिणाम होतो. आपण अजूनही लहान मूल आहोत की मोठे झालो असा त्यांना प्रश्न पडतो.
पंधरा ते एकोणीस वयोगटातील मुले महाविद्यालयात शिक्षण घेत असतात. कौटुंबिक, शालेय जीवनाच्या सीमित क्षेत्रातून बाहेर पडणारी ही मुले जीवनात आपले स्वतःचे अस्तित्व शोधत असतात. मला माझी ‘स्पेस’ हवी असं मुलं पालकांना सांगतात. या वयोगटातील मुले ताण-तणावांच्या परिस्थितीतून जात असतात. त्यावेळी त्यांची मानसिक अवस्था साचेबद्ध तर मुळीच नसते. ते वय फुलपाखरासारखे असते. फुलपाखरू कसे हव्या त्या फुलावर, हवे तेव्हा जाऊन बसतं- बागडतं, अनेकदा सैरभैर होऊन इकडून-तिकडून नाचत राहातं, अशीच ‘फुलपाखरे’ बनून ही मुले आपले जीवन व्यतित करतात. त्यावेळी त्यांना पालकांनी हुकूमशाहीने लगाम घालण्याचा प्रयत्न केला तर सुकाणू नसलेल्या होडीसारखी ही मुले जीवनसागरात भरकटत जातात.
अशा नाजूक परिस्थितीतून, ताण-तणावाच्या वाढत्या दबावाचे आव्हान स्वीकारून जीवनाचा भावी मार्ग शोधत पुढे जाऊ पाहणार्या मुलांना समजून-उमजून, जाणून घेणे आवश्यक असते. त्यांच्याशी पालकाच्या नात्याने नव्हे तर आईवडिलांनी मैत्रीच्या भावनात्मक दृष्टिकोनातून पाहायला हवे. एवढे की ती मुले दिलखुलासपणे पालकांशी व्यक्त होतील. त्यांना वात्सल्य, माया, प्रेम, आपुलकी हवी असते. ती त्यांच्या अपेक्षेनुसार मिळाली नाही तर त्यांच्यामध्ये परकेपणाची विरक्त भावना निर्माण होते. जे अपेक्षित व्यक्त असतं ते अखेरपर्यंत ‘अव्यक्त’ बनून राहातं अन् पालक-मुलं यांच्यामधल्या नात्यातील अंतर कमी होण्याऐवजी अधिक वाढत जातं.
या वयात अशा मुलांना योग्य पद्धतीनं, आपलंसं करून सुजाण-सज्ञानी भावनेने जाणून घेऊन मायेच्या स्पर्शानं हाताळणं, सांभाळणं गरजेचं असतं. त्याकरिता पालकांनी ‘मुलांचे मानसशास्त्र’ शिकून-जाणून घेणे गरजेचे! साधारणतः मुलांना कळायला लागल्यापासून आठ ते दहा वय होईपर्यंत ‘पनीशमेंट ऍण्ड रिवॉर्ड थिअरी’ पालक उपयोगात आणू शकतात. कारण आपण चुकीचं वागलो म्हणून शिक्षा झाली एवढं मुलांना कळतं. त्याचबरोबर त्या वयातील मुलांनी वर्गात, परीक्षेत पहिला क्रमांक पटकावला; वक्तृत्व, कथाकथन वा खेळांच्या स्पर्धेत बक्षीस मिळवलं तर त्यांचे मनसोक्त कौतुक केल्यानं मुलांना एकप्रकारे पुढे येण्याची प्रेरणा मिळते. पालकांप्रमाणेच शिक्षकांनीही याची जाणीव ठेवून विद्यार्थ्यांना घडवायला हवं.
मुलं मोठी झाल्यावर त्यांना शिक्षा देणे, धाक दाखवत राहाणे, फटकळपणे बोलणे किंवा ओरडणे अशा कृती पालकांनी टाळायला हव्यात; नव्हे त्या वर्ज्यच केल्या पाहिजेत. या सर्व साधक-बाधक बाबींचा विचार करता एवढा निष्कर्ष निघतो की मुलांची सुसंस्कारित पिढी घडविण्यासाठी पालकांनी स्वतः आधी सुसंस्कारित व्हायला हवे. संस्कारांचे महत्त्व, मुलांना कोणत्या वयात कसे हाताळावे, त्यांच्याशी कसे वागावे याची जाणीव स्वतः आधी करून घ्यायला हवी. सुशिक्षित, सुसंस्कारित पालकांनी सुजाण असायला हवे. सारांश, सुसंस्कृत मुलं घडविण्याकरिता सुजाण पालकत्वाची गरज आहे.