विद्याधीराज पुरस्काराचे वितरण

0
89

आतंरराष्ट्रीय कीर्तीचे गोमंतकीय चित्रकार पद्मभूषण लक्ष्मण पै यांची विद्याधीराज पुरस्कारासाठी झालेली निवड योग्य होती. त्यांच्या निधनानंतर बाराव्या दिवशी त्यांचे सुपुत्र आकाश यांना वडिलांचा हा प्रतिष्ठेचा विद्याधीराज पुरस्कार स्वीकारण्याचा योग आला, असे उद्गार विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी काढले.

मडगावच्या श्री दामोदर सालात आयोजित पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते. यावेळी श्री गोकर्ण पर्तगाळ जीवोत्तम मठ समितीचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपे उपस्थित होते. वटवृक्षाची प्रतिकृती, शाल व श्रीङ्गळ, स्वामीजींच्या मंत्राक्षता तसेच पंचवीस हजार रोख असलेला हा पुरस्कार दिगंबर कामत व श्रीनिवास धेंपे यांच्या हस्ते आकाश पै यांनी आपल्या दिवंगत वडिलांतर्फे स्वीकारला.
पद्मभूषण लक्ष्मण पै सारख्या महान कलाकाराला हा पुरस्कार भेटवणे हे मठ समितीचे भाग्य आहे. ते एक महान गोमंतकीय होते. त्यांनी चित्रकला व पेंटिंग या कला क्षेत्रांत आतंरराष्ट्रीय कीर्ती प्राप्त केली होती. गेल्या वर्षी जाहीर झालेला हा पुरस्कार कोविड महामारीमुळे लक्ष्मण पै यांना देण्याचा राहून गेला होता. आज तो देण्याची संधी मठ समितीच्या वतीने मिळाली. त्यांचे सुपुत्र आकाश यांनी सदर पुरस्कार स्वीकारल्याबद्दल त्यांचे आभार मानतो, असे श्रीनिवास धेंपे यांनी यावेळी सांगितले.
मठ समितीचे सचिव अनिल पै यांनी स्वागत केले. सोहळ्यास प्रदीप नायक, नारायण मावजो, सुभाष पै फोंडेकर, श्रीकांत पै फोंडेकर, कृष्णा मावजो, विशाल पै काकोडे, शेखर पै फोंडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.