उद्योगांना चालना देण्याची गरज ः राणे

0
162

राज्यात केवळ विकास योजनांची अंमलबजावणी करून उपयोग नाही. तर अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी नवीन उद्योगधंदे व इतर गोष्टींवर भर देण्याची गरज आहे, असे काल कॉँग्रेसचे ज्येष्ठ आमदार प्रतापसिंह राणे यांनी अर्थसंकल्पावरील चर्चेत बोलताना सांगितले. राज्यातील खाण व्यवसाय हा अर्थव्यवस्थेचा प्रमुख कणा आहे. तथापि, राज्यातील खाण व्यवसाय बंद पडला आहे. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी खाण व्यवसाय पुन्हा सुरू करण्याबाबत स्पष्टीकरण करण्याची गरज असल्याचे राणे यांनी सांगितले.

रोजगार निर्मिती करणार्‍या उद्योगांना चालना देण्याची गरज आहे. पारंपरिक व्यवसायांना प्राधान्यक्रम देण्याची गरज आहे. राज्यातील उद्योगाची अवस्था चांगली नाही, असेही आमदार राणे यांनी सांगितले.
अंमलबजावणी होणार का? ःफालेरो
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत मांडलेला अर्थसंकल्पाने प्रभावित झालो. पण, या अर्थसंकल्पाची अंमलबजावणी होणार आहे का? असा प्रश्‍न आमदार लुईझीन ङ्गालेरो यांनी अर्थसंकल्पावरील चर्चेत बोलताना केला. नावेली मतदारसंघात खराब झालेल्या रस्त्याची दोन महिन्यात दुरुस्ती करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी आमदार ङ्गालेरो यांनी केली.
नावेली मतदारसंघातील विविध भागातील रस्त्यावर गेली सात-आठ वर्षे जलवाहिनी, मलनिस्सारण वाहिनी घालण्यासाठी खोदकाम केले जात आहे. यात बांधकाममंत्री दीपक पाऊसकर यांनी लक्ष घालावे, अशी मागणी आमदार ङ्गालेरो यांनी केली.

गोवा माईल्स बंद करा ः चर्चिल
गोवा माईल्स ही ऍप आधारित टॅक्सी सेवा बंद करावी. स्थानिक पर्यटक टॅक्सींना प्राधान्य देण्याची गरज आहे. कोरोना महामारीच्या काळात आर्थिक संकटात सापडलेल्या टॅक्सी चालकांना आर्थिक सहकार्य करण्याची गरज आहे, असे आमदार चर्चिल आलेमाव यांनी सांगितले.
वाहतूक पोलिसांकडून नागरिकांना त्रास केला जातो. कोलवा येथील वाहतूक पोलीस कार्यालय बंद करावे, अशी मागणी चर्चिल यांनी केली. यावेळी चर्चिल यांनी, मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी खाण महामंडळ स्थापन करण्याची केलेली घोषणेची अंमलबजावणी झाली पाहिजे, अशीही मागणी केली.

हा निवडणूक
अर्थसंकल्प ः खंवटे
राज्याचा अर्थसंकल्प एक वर्षाचा असतो. मात्र, अर्थसंकल्पात सहा महिन्यांसाठी साधनसुविधा करात ३० टक्के कपातीचा निर्णय कशासाठी घेण्यात आला असा सवाल करत आमदार रोहन खंवटे यांनी, हा अर्थसंकल्प म्हणजे विधानसभा निवडणुकीचा जुमला असल्याचा आरोप केला आहे.
मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी खाण महामंडळ स्थापन करण्याची घोेषणा केली. तथापि, अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद करण्यात आलेली नाही. महागाईच्या प्रमाणात वाढ होत आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीमुळे महागाई वाढलेली आहे. या पार्श्‍वभूमीवर ज्येष्ठ नागरिक, गृहआधार योजनेच्या लाभार्थीच्या मानधनात वाढ करण्याची गरज होती, असेही आमदार खंवटे यांनी सांगितले.
स्वयंपूर्ण गोवा योजनेमध्ये शेतकर्‍यांना प्रोत्साहन दिले जात आहे. परंतु, शेतकर्‍यांना भेडसावणार्‍या मूळ समस्या सोडविण्याकडे लक्ष दिले जात नसल्याचे खंवटे यांनी नजरेस आणून दिले.