विदेशात जन्मलेले ‘ते’ गोमंतकीय भारतीय नागरिक

0
92

अनिवासी भारतीय व्यवहार विभागाचा खुलासा
गोवा मुक्तीपुर्वी किंवा मुक्तीनंतर विदेशात जन्मलेल्या मुलांना भारतीय पासपोर्ट मिळविण्यासाठी येणार्‍या अडचणी दूर करण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने गोमंतकीय वंशाच्या लोकांना गोवा, दमण व दीव १९६२ च्या नागरिकत्व कायद्यानुसार ते भारतीय नागरिक ठरत असल्याचा खुलासा केला आहे. त्यामुळे त्यांना यापुढे पासपोर्ट मिळविणे शक्य होईल.
त्यासाठी येत्या ३१ ऑक्टोबरपर्यंत १९५५ च्या नागरिकत्व कायदा कलम ५ मधील उपकलम १ (अ) खाली फॉर्म ३ भरून तो आवश्यक त्या दाखल्यांसह जिल्हाधिकार्‍यांना सादर करण्याचे आवाहन अनिवासी भारतीय व्यवहार विभागाचे संचालक यु. डी. कामत यांनी केले आहे. जिल्हाधिकार्‍यांच्या कार्यालयात या अर्जाची छाननी करून पुढील कार्यवाही करण्यासाठी अर्ज गृह खात्याच्या अवर सचिवांकडे पाठविले जाईल. वरील कायद्याखाली केंद्राने अशा लोकांना एक संधी देण्याचे ठरविले आहे.
मुक्तीपुर्वी गोव्यात आलेल्या वरील मुलांचे त्यांच्या पालकांनी आपल्या पासपोर्टमध्ये ते अल्पवयीन असल्याचे नमूद केले होते. परंतु वेगवेगळ्या कारणांमुळे ही मुले आपल्या प्रवासासंबंधीची माहिती देऊ शकली नाही. गोव्यात कशा पद्धतीने प्रवेश केला या संबंधीचा दाखला नसल्याने पासपोर्ट अधिकारी भारतीय पासपोर्ट देण्यास अडचण करीत होते. त्यामुळे अनेकांना पासपोर्ट मिळविणे कठीण झाले होते.
गोवा सरकारने हा विषय केंद्राकडे नेऊन त्याचा पाठपुरावा केला. हा विषय विधानसभेतही आला होता. केंद्राने हा विषय निकालात काढल्याने हजारो लोकांची गैरसोय दूर होईल. अशा लोकांकडे आधार कार्ड, निवडणूक कार्ड, तसेच शाळेच्या प्रमाणपत्रांसह सर्व दाखले आहेत.