नवी दिल्ली
इंडियन सुपर लीगमध्ये गतविजेत्या संघांना कधीही नशीबाची साथ मिळालेली नाही. २०१४ मध्ये प्रारंभ झाल्यापासून एकाही संघाला विजेतेपद राखता आलेले नाही. पहिल्या स्पर्धेत विजेते ठरलेला एटीके या कामगिरीच्या अगदी जवळ गेला होता. २०१५ मध्ये एटीकेने बाद फेरी गाठली होती, पण त्यांना चेन्नईन एफसीने हरविले. पुढे जाऊन चेन्नईनने जेतेपद जिंकले.
विशेष म्हणजे एटीके आणि चेन्नईन एफसी या दोनच संघांना आयएसएल विजेतेपद मिळविता आले आहे. यंदा मात्र आश्चर्याची बाब म्हणजे हे दोन्ही संघ स्थिरावण्यासाठी झगडत आहेत. यंदाच्या मोसमात आतापर्यंत नऊ सामने झाले आहेत. त्यात खाते उघडू न शकलेले दोन संघ हेच आहेत.
चेन्नईनला सुरवातीलाच दोन पराभव पत्करावे लागले आहेत. बेंगळुरू एफसी आणि एफसी गोवा या संघांकडून ते हरले. स्टीव कॉपेल यांच्या मार्गदर्शनाखाली एटीकेचीही सुरवात खराबच आहे. घरच्या मैदानावर ते केरळा ब्लास्टर्स आणि नॉर्थईस्ट युनायटेडकडून हरले आहेत. आणखी धक्कादायक बाब म्हणजे एटीकेला अद्याप एकही गोल करता आलेला नाही आणि त्यांना तीन गोल स्वीकारावे लागले आहेत.
कॉपेल यांनी अनेक स्टार खेळाडू आणून संघाची फेररचना केली आहे. यात मॅन्युएल लँझरॉटे (आधीचा संघ एफसी गोवा), कालू उचे (दिल्ली डायनामोज), जॉन जॉन्सन (बंगळुरू एफसी) आणि एव्हर्टन सांतोस (मुंबई सिटी एफसी) या खेळाडूंचा समावेश आहे, पण इंग्लंडचे कॉपेल अजून संघात योग्य समन्वय निर्माण करू शकलेले नाहीत. त्यामुळे आक्रमणात सातत्य राहू शकलेले नाही. कॉपेल यांचे संघ सुरवात संथ करतात अशी परंपरा आहे. पुढील सामन्यांत त्यांना संघाकडून बरीच अपेक्षा असेल. पुढील लढतीत दिल्ली डायनामोजवर विजय मिळविता आल्यास संघ अडखळत्या मार्गावरून रुळावर येईल. दुसरीकडे चेन्नईनच्या आघाडीवर जॉन ग्रेगरी यांच्यासमोरही समस्या आहेत. तेथे बचाव फळीतील उणीवा चिंताजनक ठरल्या आहेत. धनपाल गणेश याच्या अनुपस्थितीत त्यांनी जर्मनप्रीत व इसाक वनमाल्साव्मा यांना बंगळुरूविरुद्ध संधी दिली. त्यानंतर गोव्याविरुद्ध इसाक याच्या जागी अनिरुद्ध थापाला पाचारण करण्यात आले, मात्र थापा आणि जर्मनप्रीत यांना गोव्याच्या मध्यफळीने हतबल केले. चेन्नईनला १-३ असे पराभूत व्हावे लागले. जेजे याचा फॉर्म हासुद्धा ग्रेगरी यांच्या काळजीचा विषय आहे. पहिल्या दोन सामन्यांत आघाडी फळीत त्याचा खेळ नीरस ठरला. ग्रेगरी हे सुद्धा इंग्लंडचे आहेत. त्यांनी सांगितले की, सारे दडपण हे माझे आहे. निकाल साध्य करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. संघाची तयारी करून घेणे आणि कागगिरी चांगली होईल हे पाहणे याची मदारही माझ्यावर आहे.