तिखाजन-मये, डिचोली येथील एका स्मशानभूमीचे काम करताना उत्तर प्रदेशमधील एका मजुराचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना काल सकाळी घडली. सुनील माणिकचंद कुमार (२७) हा मयेतील स्मशानभूमीत हातात कटर घेऊन पत्रा कापण्याचे काम करीत होता. त्याचवेळी त्याला विजेचा जबरदस्त झटका आला. त्याला लगेच डिचोली सरकारी सामाजिक आरोग्य केंद्रात आणले असता, तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणाची माहिती आरोग्य केंद्रातून डिचोली पोलिसांना दिल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक प्रजित मांद्रेकर यांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला असून, मंगळवारी शवचिकित्सा केली जाणार आहे.