![CRICKET-PAK-AUS](https://navprabha.com/wp-content/uploads/2018/10/11khawaja.jpg)
दुबई
उस्मान ख्वाजा, ट्रेव्हिस हेड व कर्णधार टिम पेन यांनी खेळपट्टीवर नांगर टाकल्याने पाकिस्तानला हातातोंडाशी आलेल्या विजयापासून काल दूर रहावे लागले. कालच्या शेवटच्या दिवशी कांगारूंचे दुसर्या डावातील केवळ सात गडी बाद करण्याची आवश्यकता असताना त्यांच्या हाती केवळ पाच बळीच लागले त्यामुळे सामना अनिर्णीत राहिला.
आपल्या पदार्पणाच्या डावात भोपळाही फोडण्यात अपयशी ठरलेल्या ट्रेव्हिस हेड याने उस्मान ख्वाजा (१४१ धावा, ३०२ चेंडू, ११ चौकार, ५२४ मिनिटे) याच्यासह चौथ्या गड्यासाठी १३२ धावांची भागीदारी करताना ४८.३ षटके खेळून काढली. हेडने १७५ चेंडूंचा सामना करत ७२ धावांची उपयुक्त खेळी केली. पाकिस्तानने हेड व लाबुशेन (१३) यांना तीस धावांच्या अंतराने बाद करत कांगारूंची ५ बाद २५२ अशी स्थिती केली. सलामीवीर ख्वाजा याने या धक्क्यानंतर स्वतःचा संयम कायम राखत टेम पेनसह सहाव्या गड्यासाठी ७९ धावा जोडल्या. संघाची धावसंख्या ३३१ असताना ख्वाजा, ३३३ असताना स्टार्क व याच धावसंख्येवर सिडलही परतल्याने पाकिस्तानचा विजय दृष्टिपथात होता. परंतु, टिम पेनने कर्णधाराला साजेशी खेळी करत नाबाद ६१ धावा केल्या. त्याने १९४ चेंडूंचा सामना केला. नॅथन लायनने उर्वरित षटके खेळत पाकिस्तानचा विजय होऊ दिला नाही. मालिकेतील दुसरा व शेवटचा कसोटी सामना १६ ऑक्टोबरपासून अबुधाबी येथे खेळविला जाणार आहे.
धावफलक
पाकिस्तान पहिला डाव ः सर्वबाद ४८२
ऑस्ट्रेलिया पहिला डाव ः सर्वबाद २०२
पाकिस्तान दुसरा डाव ः ६ बाद १८१ घोषित
ऑस्ट्रेलिया दुसरा डाव (३ बाद ४५ वरून) ः उस्मान ख्वाजा पायचीत गो. यासिर १४१, ट्रेव्हिस हेड पायचीत गो. हफीझ ७२, मार्नस लाबुशेन पायचीत गो. यासिर १३, टिम पेन नाबाद ६१, मिचेल स्टार्क झे. बाबर गो. यासिर १, पीटर सिडल पायचीत गो. यासिर ०, नॅथन लायन नाबाद ५, अवांतर २०, एकूण १३९.५ षटकांत ८ बाद ३६२
गोलंदाजी ः मोहम्मद अब्बास २७-७-५६-३, मोहम्मद हफीझ ६-०-२९-१, यासिर शाह ४३.५-९-११४-४, वहाब रियाझ १६-३-४२-०, बिलाल आसिफ ३७-८-८७-०, हारिस सोहेल ९-१-१६-०, असद शफिक १-०-१-०