विक्षिप्त

0
972

–  दत्ताराम प्रभू-साळगावकर

असले लोक ‘हेकेखोर’ या प्रकारचे कदाचित नसतात, मनाला येईल ते करणारे किंवा मनमौजीही कदाचित नसतात; पण एक मात्र खरं की ते एक प्रकारचं विचित्र ‘रसायन’ असतं! विक्षिप्तपणा हा त्यांच्या अंगचाच गुण असतो.

काही लोक अगदी तर्‍हेवाईकपणे वागतात. बर्‍याच जणांना अशा माणसांचा अनुभव असेल, अशी माणसे परिचयाची असतील, अशांशी संपर्क पण झालेला असेल. तर्‍हेवाईक म्हणजे नेमकं काय हे स्पष्ट शब्दांत व्यक्त करता येत नाही. असले लोक अशिक्षित असे नसतात, वेडपट नसतात, शहाणे व शिकलेले पण असतात. ते केव्हा काय बोलतील, काय करतील याचा पत्ता लागत नाही. यालाच तर्‍हेवाईकपणा म्हणावं. तो स्वभावाचाच गुण असतो, त्याला विक्षिप्तपणा पण म्हणतात.

कुणी त्यांची कुठलीही गोष्ट गांभीर्याने घेत नाहीत. ‘विक्षिप्तच आहे तो’ किंवा ‘तो ना? चक्रमच!’ असं म्हणून सोडून देतात. त्यांच्या डोक्यात कसलं तरी चक्र फिरत असतं म्हणून ते असे वागतात का? एक कोडेच आहे! कोणाला काही विचारायचं नाही, कोणाचं ऐकायचं नाही; म्हणून असल्या विक्षिप्त माणसांना कोण काही सांगायलाही जात नाही… उगाच तोंडाची वाफ कशाला दवडा, म्हणून. असले लोक ‘हेकेखोर’ या प्रकारचे कदाचित नसतात, मनाला येईल ते करणारे किंवा मनमौजीही कदाचित नसतात; पण एक मात्र खरं की ते एक प्रकारचं विचित्र ‘रसायन’ असतं! विक्षिप्तपणा हा त्यांच्या अंगचाच गुण असतो. असले लोक ज्या कोणाला भेटले नसतील, त्यांच्यासाठी…
एक मनुष्य भयंकर मासेखाऊ होता. त्याला दुपारी व रात्री दोन्ही वेळा जेवणात मासे हवेच! पण ते कसले? दुपारचे वेगळे, रात्रीचे वेगळे. स्वतः बाजारात जाऊन मासे आणायचा. वेळ पडल्यास दिवसाला दोनदा, सकाळ- संध्याकाळ मासळीमार्केटला हजेरी.

बाजारात कमीत कमी दोन चकरा मारून महागातले महाग असेच मासे घेणार, त्यातच मोठेपणा! जे मासे जास्त प्रमाणात बाजारात येतात त्यांच्या वाटेला जायचंच नाही; कारण काय? तर म्हणे असल्या विपुल प्रमाणात आलेल्या माशांना चव नसते! चव असते ते मासे महागच असतात, तेच घ्यायचे. मनुष्य होता पैसेवाला; पैसेवाल्यांनी काहीही केलं तरी पचतं! या माणसाने सण म्हणतात ते पाळलेच नाहीत. कोणी शिवाचा म्हणून सोमवार, दत्ताचा गुरुवार, लक्ष्मीचा शुक्रवार, मारुतीचा शनिवार असे वार पाळतात. यानं सण नाहीत पाळले तर वार कुठले? म्हणायचा- ‘मासे खाऊ नका असं कुठल्या देवानं सांगितलं आहे त्या देवाचं नाव सांगा.’ असल्या प्रश्‍नाला कोण व काय उत्तर देणार? लोक त्याला विक्षिप्त म्हणायचे व सोडून द्यायचे!
हे झालं त्या विक्षिप्ताचं पुराण; पण असे आणखीही महाभाग असतात. गणेशचतुर्थीचा सण म्हणजे ‘मच्छी सर्वत्र वर्ज्ययेत’ असा. पण विसर्जन कधी एकदा होते व माशांवर ताव मारतो असे काही लोकांना होते, जणूकाही मासे कधीच खायला मिळालेले नाहीत! विसर्जनाच्या दिवशी घरात नव्हे, पण परस्पर घराच्या मागच्या बाजूला मासे आणून ठेवल्याच्या गोष्टी ऐकिवात आहेत. एकदा विसर्जन झालं की त्यांचा सण संपतो व ते मोकळे! काहींचं म्हणणं असं की देवाला माशांचं काय वावडं? ‘मत्स्य’ हा तर विष्णूचा चक्क पहिला अवतार! त्यामुळे देवाचं माशांशी वैर असणंच शक्य नाही. त्यामुळे मासे खाण्यात काही गैर नाही. ‘पैसे खातात’ ते लोक उजळ माथ्यानं फिरतात, मासे खाण्यात तसलं तरी पाप नाही. धन्य!!
असाच एक ओळखीचा मनुष्य होता. कधीकधी हॉटेलमध्ये भेटायचा. त्याचं वैशिष्ट्य म्हणजे तो चहा नेहमी डाव्या हातानं प्यायचा. डावखुरा नव्हता; पण त्याचं म्हणणं असं की सगळे लोक उजव्या हातानं कप धरून चहा पितात. त्यांचं तोंड, ओठ कपाच्या ज्या भागाला लागतात त्या भागाला आपलं तोंड लागू नये म्हणून डाव्या हातानं प्यायचा. वर सांगणं असं की हॉटेलमध्ये कप चांगले धुतले जात नाहीत हो; फक्त पाण्यात बुडवून काढतात! इतका सोवळा मनुष्य! घराकडचा कप घेऊन चहा प्यायला हॉटेलमध्ये जायची पद्धत असायला हवी होती!

एक गृहस्थ होते, त्यांचं घड्याळ नेहमी अर्धातास पुढे. मनगटावरचं व भिंतीवरचंही. कारण काय? तर म्हणे सर्व कामे वेळेपूर्वी पूर्ण होतात. एक मनुष्य होता तो कुठल्याही महत्त्वाच्या कामासाठी जाताना ठरावीक रंगाचाच पोषाख करून जायचा, त्यामुळे काम होतं म्हणे! असल्या गोष्टीत हेतूपेक्षा नखरेच जास्त असतात. आपण ‘नखरा’ हा शब्द अगदी सहजपणानं वापरतो. पुरुषाला ‘काय नखरे करतोस’ असं; स्त्रियांच्या बाबतीत ‘किती नखरा करते गं बाई’ असं म्हणतात. पण ‘नखरा’ या शब्दाच्या मुळाशी जाऊन त्या शब्दाची चिरफाड कितीजण करतात? ‘न-खरा’ तो नखरा! खरं असं दाखवून खोट्याचं प्रदर्शन! असले नखरे शोभत नसले तरी पचतात, चालतात. म्हणूनच ते केले जातात ना!

काही लोक उपवास करतात. सकाळपासून ‘माझा उपवास, माझा उपवास’ असा गाजावाजा. घरात ज्यांचा उपवास नसतो, त्यांच्यासाठी केलेल्या सुग्रासांचा वास यांच्या नाकात शिरला की त्यांची जीभ चाळवते. त्या वासापुढे उपवास ‘उप’वास ठरतो. कधी एकदा रात्रीचे बारा वाजतात व ते सुग्रास गिळायला मिळते अशी त्यांची अवस्था होते. खरे म्हणजे शास्त्रानुसार दुसर्‍या दिवशीचा सूर्योदय झाला की आधीचा दिवस संपतो. रात्री बारा वाजता आधीचा दिवस संपतो व दुसरा दिवस सुरू होतो. हे आमच्या शास्त्रात बसत नाही. त्यामुळे रात्री बारानंतर कुठलाही पदार्थ खाल्ल्यास दिवसभर केलेल्या उपवासाचे ‘बारा वाजतात.’ पण असल्या विक्षिप्तांना सांगणार कोण?
विक्षिप्तांवर केलेली ही टीका कोणाला वात्र(ट) टीका, कोणाला वक्र टीका तर कोणाला तर्क(ट) टीका वाटेल. हे टीकास्त्र कदाचित आवडणारही नाही.
चूकभूल द्यावी-घ्यावी!