विकासाद्वारे काश्मीरमधील दहशतवादाचा बिमोड : मोदी

0
120

जम्मू-काश्मीरच्या जनतेचा ३७० कलमामुळे काय ङ्गायदा झाला? याचा कधीच कोणी विचार केला नाही. उलट ३७० कलमामुळे जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद, ङ्गुटीरतावाद, घराणेशाही आणि भ्रष्टाचाराला खतपाणीच घातले गेले. जम्मू-काश्मीरमधील तरुणांची माथी भडकावण्यासाठीच पाकिस्तानने ३७० कलमाचा शस्त्रासारखा वापर केला, असा घणाघाती हल्ला करतानाच विकासाच्या माध्यमातूनच आम्ही जम्मू-काश्मीरमधील दहशतवादाचा नायनाट करू, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल स्पष्ट केले.

३७० कलम हटविल्याने सरदार वल्लभभाई पटेल, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, श्यामाप्रसाद मुखर्जी आणि भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांचे स्वप्न साकार झाल्याचेही मोदी यांनी सांगितले. दहशतवाद, भ्रष्टाचार आणि घराणेशाहीमुळे जम्मू-काश्मीरचा विकास झाला नाही. गेल्या काही दशकांपासून जम्मू-काश्मीरमध्ये असलेल्या घराणेशाहीमुळे काश्मिरी तरुणांना संधीच मिळाली नाही, अशी टीका करतानाच आता व्यवस्थेतील ३७० कलमाचा असलेला हा अडसर दूर झाला आहे. त्यामुळे जम्मू-काश्मीर आणि लडाखमधील वर्तमान तर सुधारेलच पण त्यांचे भविष्यही सुरक्षित होणार आहे, असे मोदी म्हणाले.

संसदेच्या दोन्ही सभागृहात जम्मू-काश्मीरमधून ३७० कलम हटविण्याचा प्रस्ताव आणि जम्मू-काश्मीरच्या विभाजनाचे विधेयक मंजूर करण्यात आले. त्यानंतर काल प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांशी संवाद साधून जम्मू-काश्मीर आणि लडाखबाबतची सरकारची भूमिका स्पष्ट केली. भाषणाच्या सुरुवातीलाच संसदेच्या दोन्ही सभागृहात ३७० कलम हटविण्याचा निर्णय घेण्यात आल्याबद्दल मोदींनी देशवासीयांचे अभिनंदन केले.