विकसित भारताचे स्वप्न गोवा सर्वांत आधी साकारेल

0
8

>> लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडून विश्वास व्यक्त; कायदे निर्मितीवेळी सभागृहात व्यापक, सकारात्मक चर्चा हवी

लोकप्रतिनिधी आणि नागरिकांच्या एकत्रित प्रयत्नांतून आपण 2047 पर्यंत देशाला विकसित राष्ट्र बनवू शकतो. प्रत्येक नागरिकाने पुढील 25 वर्षांत विकसित भारताच्या निर्मितीसाठी योगदान दिले पाहिजे. गोवा हे लहान राज्य असले तरी येथील नागरिकांच्या गरजा व अपेक्षा अधिक असणार आहेत. मूलभूत गरजांना प्राधान्य देऊन नागरिकांच्या मागण्यांची पूर्तता केली, तर विकसित भारताचे स्वप्न सर्वांत आधी गोवा पूर्ण करू शकतो, असा विश्वास लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी काल व्यक्त केला. विधानसभा संकुलात आयोजित ‘विकसित भारत 2047 ः लोकप्रतिनिधींची भूमिका’ या विषयावर आमदारांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

विधानसभा आणि संसदेतील वादविवाद अराजकीय आणि निष्पक्षपाती असले पाहिजेत. विस्तृत आणि योग्य वादविवादानंतर कायदे तयार करणे कधीही चांगले. सहमती आणि मतभेद हे आपल्या लोकशाहीचे वैशिष्ट्य आहे. सरकारच्या प्रत्येक कृतीवर विधानसभेत व्यापक चर्चा झाली पाहिजे. कायदे बनवताना जितकी अधिक चर्चा आणि वादविवाद तितके चांगले कायदे तयार होतील, असेही बिर्ला यांनी सांगितले.

स्वातंत्र्यानंतर भारताने संसदीय लोकशाही स्वीकारली, तेव्हा अनेक देशांना वाटले की एवढी मोठी लोकसंख्या आणि आकारमान असलेला देश कदाचित काही करू शकणार नाही; पण आज भारत जगाला मार्गदर्शन करीत आहे. तरुणांच्या नव्या विचारामुळे आमची ताकद वाढली आहे. तरुण वर्ग प्रत्येक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करत आहे. भारताची बौद्धिक क्षमताही वाढली आहे. येत्या काही वर्षांत भारत देश प्रत्येक क्षेत्रात जगाचे नेतृत्व करेल, असा विश्वासही बिर्ला यांनी व्यक्त केला.

देशभरात सभागृहाचे कामकाज कमी दिवस चालते ही चिंतेची बाब आहे; पण गोव्यासारख्या लहान राज्यात 40 दिवस सभागृहाचे कामकाज चालणे हे चांगले लक्षण आहे, असेही बिर्ला यांनी नमूद केले. लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी तसेच प्रभावी, चांगले कायदे तयार करण्यासाठी विधानसभा आणि संसदेत व्यापक अराजकीय, निष्पक्ष वादविवाद आणि चर्चेची नितांत गरज आहे, असेही बिर्ला म्हणाले.

गोव्याच्या नवीन विधानसभा संकुलाचे उद्घाटन माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते करण्यात आले होते. त्यानंतर, माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी विधानसभा संकुलात लोकप्रतिनिधींना संबोधित केले होते. आता, लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांचे लोकप्रतिनिधींना मार्गदर्शन लाभत आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी याप्रसंगी बोलताना सांगितले. देश आणि राज्याच्या विकासात आमदारांबरोबर स्थानिक लोकप्रतिनिधी, नगरसेवक, सरपंच, पंच सदस्य यांचे योगदान महत्त्वाचे आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. सुरुवातीला ओम बिर्ला यांचे विधानसभा संकुलात शानदार स्वागत करण्यात आले. बिर्ला यांनी पोलिसांकडून मानवंदना स्वीकारली. त्यानंतर, विधानसभा संकुलात वृक्षारोपण केले. यावेळी लोकसभेचे सचिव उत्पलकुमार सिंग व इतर अधिकारी उपस्थित होते. यावेळी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, मंत्री, आमदार आणि माजी आमदारांची तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांची उपस्थिती होती.
दरम्यान, आरोग्यमंत्री विश्वजीत राणे, सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल, समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई या कार्यक्रमाला अनुपस्थित होते.
गोवा विधानसभेचे सभापती रमेश तवडकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. उपसभापती ज्योशुआ डिसोझा यांनी आभार मानले.

अल्प काळात गोव्याची विकासात आघाडी
भारताच्या स्वातंत्र्यानंतर कित्येक वर्षांनी गोवा राज्याला स्वातंत्र्य मिळाले. गोव्याने सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांतून अल्प काळात विकासामध्ये आघाडी घेतली आहे. शिक्षण, आरोग्य, साधनसुविधा व इतर क्षेत्रात गोवा राज्य आघाडीवर आहे. गोवा हे पर्यटन राज्य म्हणून देश-विदेशात प्रसिद्ध आहे. येथील निसर्ग सौंदर्य, संस्कृतीचे संवर्धन करणे गरजेचे आहे, असेही ओम बिर्ला यांनी सांगितले.

काँग्रेस, गोवा फॉरवर्डसह विरोधी पक्षांचा बहिष्कार
ओम बिर्ला यांच्या विधानसभेतील मार्गदर्शनपर कार्यक्रमावर काँग्रेस, गोवा फॉरवर्ड, आप, आरजीपी या विरोधी पक्षांच्या आमदारांनी बहिष्कार घातला. या कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत विरोधी पक्षातील एकाही आमदाराला विश्वासात घेण्यात आले नाही. त्यामुळे विरोधी आमदारांनी कार्यक्रमावर बहिष्कार घालण्याचा सामूहिक निर्णय घेतला. राज्य सरकार विरोधी आमदारांना गृहीत धरू शकत नाही, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी दिली.