विकसित आणि स्वच्छ भारत हे गांधींचे स्वप्न : मोदी

0
101
नवी दिल्लीत झाडू मारून स्वच्छ भारत अभियानाचे उद्घाटन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी.

‘स्वच्छ भारत’ अभियानाचे मोदींकडून उद्घाटन
स्वच्छ आणि विकसित भारत हे महात्मा गांधींचे स्वप्न होते असे सांगून ‘स्वच्छ भारत’ अभियानामागे राजकारण नाही, केवळ देशप्रेम असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. पुढील पाच वर्षे चालणार्‍या मोहिमेचे उद्घाटन काल मोदींच्या हस्ते झाले.
मुख्यमंत्री, लोकप्रतिनिधी, नामवंत व्यक्ती, विविध क्षेत्रातील लाखो देशवासीयांनी भाग घेतलेल्या या मोहिमेवर सुमारे २ लाख कोटी रु. खर्च येणार आहे. राजपथ येथे पंतप्रधान मोदींनी उपस्थितांना ‘स्वच्छ भारत’ची शपथ दिली. त्यानंतर त्यांनी नजीकच्या सफाई कर्मचारी राहतात त्या वाल्मिकी वस्तीत जाऊन स्वत: झाडू मारून मोहिमेचे उद्घाटन केले.
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी पश्‍चिम बंगाल येथे आपल्या शाळेत मोहिमेचा शुभारंभ केला. प्रत्येक भारतीयाने वार्षिक किमान १०० तास स्वच्छतेसाठी द्यावेत असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, पहिल्यांदाच गांधी जयंतीची सार्वजनिक सुटी असतानाही शिपायापासून सचिव स्तरापर्यंतचे अधिकारी कार्यालयात सफाईसाठी उपस्थित होते. देशात सुमारे ३१ लाख सरकारी कर्मचारी उपस्थित होते. देशभरात सर्व राज्यांत मुख्यमंत्र्यांनी, राज्यपालांनी स्वच्छतेची शपथ दिली. सरकारी कर्मचारी, विद्यार्थ्यांनी सार्वजनिक ठिकाणी साफसफाईत भाग घेतला.
दरम्यान, स्वच्छ भारत अभियानांतर्गत प्रत्येक वर्षी प्रत्येक पंचायतीला २० लाख रु.पर्यंत निधी उपलब्ध करून दिला जाणार असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. नगरांच्या सफाईसाठी ६२ हजार कोटी रु.ची तरतूद केल्याचेही ते म्हणाले.