विंबल्डनच्या बक्षीस रकमेत वाढ

0
81

जगातील सर्वांत जुनी ग्रँडस्लॅम स्पर्धा म्हणून ओळखल्या जाणार्‍या ‘विंबल्डन’चे आयोजक असलेल्या ऑल इंग्लंड क्लबने यंदाच्या स्पर्धेसाठी ४६.५६ मिलियन युएस डॉलर्स बक्षीस (३४ मिलियन पाउंड्‌स) ठेवले आहे. मागील वर्षीपेक्षा ही रक्कम ७.६ टक्क्यांनी जास्त आहे.

पुरुष व महिला एकेरीतील विजेत्या खेळाडूंना प्रत्येकी २.२५ मिलियन पाउंड्‌स मिळणार आहेत. मागील वेळच्या विजेत्या रॉजर फेडरर व गार्बिन मुगुरुझा यांना प्रत्येकी २.२ मिलियन पाउंड्‌स मिळाले होते. यंदाची विंबल्डन स्पर्धा २ ते १५ जुलै या कालावधीत होणार आहे. स्पर्धेचे हे १५० वे वर्ष असून टेनिसमधील ओपन इराचे पन्नासावे व महिला एकेरीचे १२५वे वर्ष आहे.

बक्षीस रकमेत भरघोस वाढ करतानाच आयोजकांनी खेळाडूंना इशारादेखील दिला आहे. दुखापतग्रस्त असताना स्पर्धेत उतरून सामना सुरू असताना माघार घेतल्यास सदर खेळाडूला पहिल्या फेरीतील पराभूत खेळाडूला मिळणार्‍या रकमेला मुकावे लागणार आहे. मागील वर्षीची पुनरावृत्ती टाळण्यासाठी याप्रकारचे पाऊल उचलण्यात आल्याचे स्पर्धेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रिचर्ड लुईस यांनी सांगितले.
स्पर्धास्थळी प्लास्टिक स्ट्रॉच्या वापरावरदेखील यंदा बंदी घालण्यात आली आहे. मागील वेळी स्पर्धेदरम्यान ४००,००० स्ट्रॉंचा वापर झाला होता. दोन गुणांमध्ये खेळाडूंना मिळणारी वेळ २० सेकंदावरून २५ सेकंद करण्यात आली आहे. विंबल्डनने यावेळी बक्षीस रकमेच्या बाबतीत ऑस्ट्रेलियन ओपनला मागे टाकले आहे. जानेवारी महिन्यात झालेल्या ऑस्ट्रेलियन ओपनची बक्षीस रक्कम ५५ मिलियन ऑस्ट्रेलियन डॉलर्स (४१.३२ मिलियन युएस डॉलर्स) होती.