वेस्ट इंडीजने पाकिस्तान दौरा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. विंडीजच्या खेळाडूंनी पाकिस्तानमधील सुरक्षेबद्दल काळजी व्यक्त केल्यानंतर मंडळाने पाकविरुद्धची तीन टी-२० सामन्यांची मालिका अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली.
विश्व एकादश व पाकिस्तान यांच्यामध्ये पाकमध्ये टी-२० मालिका खेळवून पीसीबीने पाकमधील वातावरण आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी पोषक असल्याचे भासविले होते. यानंतर श्रीलंकेच्या संघानेदेखील प्रमुख खेळाडूंनी अंग काढून घेतल्यानंतर आपला दुसर्या फळीतील संघ पाकमधील टी-२० सामन्यासाठी पाठवला होता. आता विंडीजच्या खेळाडूंनीदेखील आपली भूमिका स्पष्ट केल्यामुळे पाकमधील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पुढे ढकलण्यास आलेली मालिका पुढील वर्षी होणार असल्याचे पीसीबीने जाहीर केले असले तरी विंडीज मंडळाने याबाबत बोलणे टाळले आहे. विंडीजने दौरा करण्याचे ठरविले तरीसुद्धा आपण अनुुपलब्ध असल्याचे ख्रिस गेल, कायरन पोलार्ड व ड्वेन ब्राव्हो या तीन वरिष्ठ खेळाडूंनी मंडळाला कळविले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने नियुक्त केलेल्या सुरक्षा समितीने सुरक्षिततेबाबत अनुकूल अहवाल दिला तरीसुद्धा वेस्ट इंडीज प्लेयर्स असोसिएशनने (डब्ल्यूआयपीए) चिंता व्यक्त केली आहे.