वाहतूक नियमांचे उल्लंघन; 1524 जणांना नोटीस

0
2

>> 658 विनाहेल्मेट वाहनचालकांना दंड

>> राज्य वाहतूक पोलीस विभागाची विशेष मोहीम

वाहतूक पोलीस विभागाने वाहतूक नियम उल्लंघन प्रकरणी 1524 जणांना नोटीस बजावली असून विनाहेल्मेट कारवाईमध्ये सुमारे 658 जणांना दंड ठोठावण्यात आला आहे.

राज्यात वाहतूक सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने वाहतूक पोलिसांनी विनाहेल्मेट दुचाकी वाहन चालवणाऱ्यांना दंड ठोठावण्याची मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेमध्ये दरदिवशी हेल्मेट परिधान न करणाऱ्या दुचाकी वाहन चालकांना दंड ठोठावला जात आहे. हेल्मेट परिधान न करणाऱ्या दुचाकीस्वारांचा वाहन चालविण्याचा परवाना निलंबित करण्याचा इशारा पोलिसांनी दिलेला आहे.

वाहतूक नियम उल्लंघनप्रकरणी वाहतूक पोलिसांनी भरधाव, बेशिस्त वाहन चालविणे, हेल्मेट परिधान न करणे, अयोग्य वाहन क्रमांक पट्टी, पार्किंग व इतर प्रकारे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांना नोटीस पाठविण्यात आली आहे. काही वाहतूक नियमभंगामध्ये वाहनचालकांचा परवाना आपोआप निलंबित होतो, अशी माहिती वाहतूक पोलीस विभागाचे उपअधीक्षक सिद्धांत शिरोडकर यांनी दिली.

हेल्मेट परिधान न करणाऱ्या दुचाकीचालकांना दंड ठोठावला जात आहे. वाहन अपघातामध्ये दुचाकी चालकांचा समावेश जास्त असतो. हेल्मेट परिधान न केलेल्या अनेक दुचाकीचालकांचा रस्ता अपघातात बळी जात आहे. त्यामुळे वाहतूक खात्याने हेल्मेट सक्तीची कडक अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतल्याचे शिरोडकर म्हणाले.

आतापर्यंत 197 जणांना नोटीस
वाहतूक पोलीस विभागाच्या मडगाव विभागाने वाहतूक नियम उल्लंघन प्रकरणी सर्वाधिक 197 नोटिशी जारी केल्या आहेत. पणजी विभागाने 151, म्हापसा 40, कळंगुट 57, पर्वरी 102, हणजूण 132, पेडणे 100, मोपा 70, डिचोली 132, फोंडा 111, वास्को 160, कुडचडे 60, दाबोळी 4, कोलवा 75, काणकोण 62 आणि केपे विभागाने 71 नोटीस जारी केल्या आहेत. वाहतूक पोलीस विभागाने वाहतुकीत शिस्त आणण्यासाठी वाहतूक नियमांच्या अंमलबजावणीवर भर दिला आहे.