>> पाच जणांना मुख्यालयात सेवा बजावण्याचा आदेश
वाहतूक खात्यातील कामचुकार अधिकार्याची गय केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा वाहतूक, सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर यांनी काल या प्रतिनिधीशी बोलताना दिला. वाहतूक खात्याने निश्चित केलेल्या कामाची वेळेवर पूर्तता न करणार्या पाच साहाय्यक वाहतूक निरीक्षकांना पणजीतील जुन्ता हाऊसमधील वाहतूक खात्याच्या मुख्य कार्यालयात सेवा बजावण्याची सूचना करण्यात आली आहे.
राज्यातील वाहन अपघातात वाढ झाल्याने वाहन अपघातावर नियंत्रण आणण्यासाठी वाहतूक खात्याच्या वाहतूक निरीक्षकांना विविध भागात गस्त घालून निर्धारित वेळेत ठराविक टार्गेटची पूर्तता करण्याची सूचना करण्यात आली होती. त्याचा आढावा घेतला असता काही अधिकार्यांनी कामचुकारपणा केल्याचे आढळून आले. त्यामुळे कामचुकारपणा करणार्या पाच अधिकार्यांना वाहतूक खात्याच्या मुख्य कार्यालयात राहून सेवा बजावण्याचा आदेश देण्यात आला आहे. या अधिकार्यांना मुख्यालयातील काम तसेच बाहेर गस्त घालून टार्गेटची पूर्ती करण्याची सूचना करण्यात आली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
वाहतूक खात्याचा कारभारात पारदर्शकता आणण्यासाठी कॅशलेस पद्धतीचा अवलंब करण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. खात्याच्या कार्यालयात रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही. तसेच ऑन लाईन पध्दतीने सेवा उपलब्ध केली जाणार आहे. वाहतूक खात्याच्या कार्यालयात विविध कामासाठी नागरिकांना हेलपाटे घालावे लागणार नाहीत, असे मंत्री ढवळीकर यांनी सांगितले.
राज्यातील ड्रायव्हिंग स्कूलना नियमांचे पालन करण्याची सक्ती केली जाणार आहे, ड्रायव्हिंग स्कूलचा बेशिस्त कारभार खपवून घेतला जाणार नाही, असेही मंत्री ढवळीकर यांनी सांगितले. तिसवाडी तालुक्यातील ड्रायव्हिंग स्कूलची पाहणी लोकायुक्त कार्यालयाच्या पथकाने केली तेव्हा स्कूलच्या कारभारात तृटी असल्याचे आढळून आले.