वाहतूक कोंडी टाळण्यासाठी विशे विभाग उभारणार

0
122

>> वाहतूकमंत्र्यांची विधानसभेत घोषणा

नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी गोव्यात लवकरच मोठ्या प्रमाणावर पर्यटकांचे लोंढे येणार असल्याने मांडवी व जुवारीवरील नव्या पुलांच्या कामामुळे वाहतुकीला अडथळा होऊन कोंडी होऊ नये यासाठी वाहतूक पोलिसांचा एक विशेष विभाग स्थापन करण्याची घोषणा वाहतूकमंत्री सुदिन ढवळीकर यांनी काल विधानसभेत केली.

मांडवी नदीवरील तिसर्‍या पुलाच्या कामामुळे पर्वरी परिसरात आणि नव्या जुवारी पुलाच्या बांधकामामुळे आगशी – कुठ्ठाळी परिसरात वाहतुकीची कोंडी निर्माण होणार असल्याने वाहतूक पोलिसांची दोन पथके या दोन्ही ठिकाणच्या वाहतुकीवर नियंत्रण ठेवतील अशीही माहिती त्यांनी दिली. राज्यात या महिनाअखेर वाहतुकीच्या महाकोंडीला सामोरे जावे लागणार असल्याकडे सरकारने त्यावर उपाययोजना करण्याकडे नवप्रभेने कालच अग्रलेखाद्वारे लक्ष वेधले होते. विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांनी काल शून्य तासाला वाहतूक कोंडीच्या संभाव्यतेकडे सभागृहाचे लक्ष वेधले. त्यावर ढवळीकर यांनी ही माहिती दिली.

राज्यात वाहतुकीवर नियंत्रणासाठी ४१ नवी वाहने येणार असून ती सरकार स्थापन करणार असलेल्या दोन नव्या पथकांच्या दिमतीस दिली जातील. त्यात व्हॅन, क्रेन आदींचाही समावेश असल्याचे ढवळीकर यांनी सांगितले. वाहतूक कोंडीवर नियंत्रण ठेवण्यासाठी दर वीस ते पंचवीस मीटर अंतरावर वाहतूक पोलीस उभा केला जाईल. पुलाचे काम करणार्‍या कंत्राटदारांशीही सरकारने चर्चा केली असून त्यांच्या कामगारांचीही मदत घेतली जात आहे असे ढवळीकर यांनी सांगितले.