वास्कोत रामनवमीच्या रात्री रमेश बिंगी या युवकास बेदम मारहाण केल्या प्रकरणी मंगळवारी पोलिसांनी १३ जणांना अटक केली. तसेच रामनवमीच्या रथयात्रेवर दगडफेक, मशिदीत घुसून धार्मिक भावना दुखवणे, निर्दोष युवकास मारहाण करणे आणि पोलीस स्थानकाबाहेर रमेश बिंगी नामक युवकास मारहाण केल्याप्रकरणी वास्को पोलिसांनी आतापर्यंत तीन गुन्हे नोंद केले आहेत.
रविवारी रात्री इस्लामपूर मांगोरहील येथे रामनवमीनिमित्त आयोजित रथयात्रेवर अज्ञाताने दगड फेकल्यानंतर तिथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्याचवेळी मिरवणुकीतील काहींनी इस्लामपुर येथील एका युवकास मारहाण करण्याबरोबरच मशिदीत जाऊन घोषणाबाजी करत धार्मिक तेढ निर्माण केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर वास्को पोलीस स्थानक परिसरात आलेल्या जमावापैकी काहींनी तेथे उपस्थित असलेल्या रमेश बिंगी याला मारहाण केली होती. या प्रकरणी पोलिसांनी १३ जणांना अटक केली आहे.
दरम्यान, काल रात्री मुरगावचे पोलीस उपअधीक्षक निलेश राणे व पोलीस निरीक्षक कपिल नायक यांनी मुरगाव तालुक्यातील सर्व देवस्थान, चर्च, मस्जिद समिती अध्यक्षांची बैठक बोलावली. या बैठकीत पोलिसांनी त्यांना यापुढे प्रत्येक धर्माचे सण एकोप्याने साजरे करण्याचा सल्ला दिला. तसेच सण साजरे करताना परवानगी घेणे तितकेच महत्त्वाचे असल्याचे राणे यांनी सांगितले. यावेळी त्यांनी देवस्थान अध्यक्षांचे म्हणणे ऐकले व त्यांच्याकडूनही काही सूचना मागवल्या.