शांतीनगर-वास्को येथे काल दुचाकी आणि बस यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीचालक गंभीररित्या जखमी झाला. रोहन नाईक (22, रा. हेडलँड-सडा) असे या जखमी तरुणाचे नाव आहे. त्याला तातडीने उपचारासाठी गोमेकॉत दाखल करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, सदर अपघात काल संध्याकाळी साडेचारच्या दरम्यान घडला. दाबोळी विमानतळ ते वास्को या महामार्गावरील प्रवासी बस साई श्रृंगार (क्र. जीए-06-टी-1902) ही दाबोळीहून मांगूरहिलच्या दिशेने जाताना ती शांतीनगर येथे पोचली असता अचानक पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीने बसच्या पाठीमागून जोरदार धडक दिली व दुचाकी बसच्या खाली गेली. त्यात दुचाकीचालक रोहन नाईक गंभीररित्या जखमी झाला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याला तातडीने बांबोळी येथे गोमेकॉत पाठविण्यात आले. रोहन याच्या दुचाकीला नंबरप्लेट नव्हती, तसेच त्याने हेल्मेट देखील परिधान केले नव्हते. वास्को पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला.