वाळपईत घरफोडी केलेला चोरटा कर्नाटकात जेरबंद

0
97
वाळपईत झालेल्या घरफोडीतील चोरास मुद्देमालासह अटक केली. त्यावेळी वाळपई पोलीस निरीक्षक संजय दळवी व इतर पोलीस पथक.

वाळपई पोलिसांना यश : ऐवजही ताब्यात
वाळपई येथील शामसुंदर शिरोडकर यांचे घर फोडून सुमारे तीन लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास करणार्‍या महमद इमामसाब मुमाजी (वय १९, गदग कर्नाटक) याला वाळपई पोलिसांनी मुद्देमालासह गदग येथे जेरबंद केले. त्यांनी चोरलेले दागिने विकत घेणार्‍या प्रकाश सघप्पा पालाड (वय २३, गदग कर्नाटक) यालाही पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून मंगळसूत्र व दोन जोडी कानातील रिंगे हस्तगत केली आहेत. तसेच शिरोडकर यांच्या घरातील मोबाईल जप्त केला आहे. वाळपई पोलीस निरीक्षक संजय दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक उपनिरीक्षक पाडलोस्कर, सुरज पाटील, समीर गाड, अमित गावस, प्रकाश गावकर व गुरुदास मांद्रेकर यांचे पथक तीन वेळा गदग येथे जाऊन आले. त्यानंतरच सापळा रचून चोरास जेरबंद करण्यास यश आले. घरफोडी करणारा वाळपई वेळूस येथे राहत होता. तो काही दिवस शामसुंदर शिरोडकर यांच्या घराकडे काम करत होता. मोबाईल वरून सुगावा
महमद याने शिरोडकर यांच्या घरातील मोबाईल सुद्धा चोरला होता. तो मोबाईल त्याने गदग येथील कांबळी नामक एका व्यक्तीस दोनशे रुपयांना विकला. विकत घेणार्‍याने त्या मोबाईलमध्ये आपले सीमकार्ड घातले व वापर करू लागला. त्यावरून वाळपई पोलिसांनी तपास केला असता मोबाईल वापरणारा सापडला होता. त्यानंतर सात दिवसांनी महमद सापडला. तो ओल्ड गोवा पोलिसांनाही चोरी प्रकरणी हवा आहे.