वारसा स्थळांबाबत चोडणकरांच्या पुराव्यांची वाट पहातोय ः तेंडुलकर

0
45

भारतीय जनता पक्ष राज्यातील सहा वारसा स्थळे खासगी संस्थांना देखभालीसाठी दत्तक देण्याबाबत अनभिज्ञ आहे. गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीचे नवनियुक्त अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी वारसा स्थळांबाबतच्या सत्ताधारी पक्षांवर केलेला आरोप दिशाभूल करणारा आहे. आम्ही चोडणकर यांच्याकडील पुराव्याची वाट पाहत आहोत. चोडणकर यांनी अवश्य पुरावे जाहीर करावेत, असे आव्हान भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिले.

स्थानिकांना विश्‍वासात न घेता वारसा स्थळे देखभालीसाठी खासगी संस्थांना देणे अयोग्य आहे, असा दावा खासदार तेंडुलकर यांनी केला. वारसा स्थळे दत्तक देण्याबाबतची सविस्तर माहिती देण्याची विनंती केंद्र सरकारच्या संबंधित खात्याला करण्यात आली आहे. संसदेच्या पर्यटन आणि संस्कृती समितीचा आपण सदस्य आहे. या समितीसमोर वारसा स्थळे दत्तक देण्याचा प्रश्‍न कधीच चर्चेला आला नाही. या समितीसमोर वारसा स्थळांच्या ठिकाणी पर्यटकांच्या सोयीसाठी साधनसुविधा तयार करण्याचे प्रश्‍न चर्चेला येतात, असेही तेंडुलकर यांनी सांगितले.
कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी भाजपच्या नेतृत्वाखाली आघाडी सरकार कुठल्या कलमाखाली बरखास्त करण्याची मागणी राज्यपालांकडे करीत आहे, याचा प्रथम खुलासा करावा, अशी मागणी तेंडुलकर यांनी केली.
अलीकडच्या काळात कॉंग्रेसचे तीन प्रदेशाध्यक्ष झाले आहेत. आगामी तीन महिन्यात चौथाही प्रदेशाध्यक्ष नियुक्त होऊ शकतो, असा टोला तेंडुलकर यांनी हाणला.