वाया (न)गेलेले एक वर्ष

0
146
  • डॉ. मधू स. गा. घोडकीरेकर

नाव ‘कोविड-१९’ असले तरी या विषाणूने सन २०२० वर एकतर्फी राज्य केले. हे वर्षच असे होते की संपून संपेना. एरव्ही जानेवारीत नववर्ष साजरे कधी करतो अन् त्याच वर्षाचा डिसेंबर कधी येतो हे कळतच नाही. पण हे वर्ष वेगळ्याच गतीने व दिशेने गेले. पण गेलेले वर्ष खरोखरच वाया गेले का?

नाव ‘कोविड-१९’ असले तरी या विषाणूने सन २०२० वर एकतर्फी राज्य केले. हे वर्षच असे होते की संपून संपेना. एरव्ही जानेवारीत नववर्ष साजरे कधी करतो अन् त्याच वर्षाचा डिसेंबर कधी येतो हे कळतच नाही. पण हे वर्ष वेगळ्याच गतीने व दिशेने गेले. पण गेलेले वर्ष खरोखरच वाया गेले का?
डिसेंबर २०१९ मध्ये चीनच्या वुहान प्रदेशात एका अनोळखी श्‍वसनरोगाने धुमाकूळ घातला व त्याचेच ‘कोविड-१९’ असे नामकरण झाले. माजी राष्ट्रपती स्वर्गीय अब्दुल कलाम यांचे ‘व्हिजन २०२०’ हे पुस्तक गाजले होते. पण प्रत्यक्षात सन २०२० असे जगभर धुमाकूळ घालेल असे त्यांना वाटले नसेल. या द्रष्ट्या वैज्ञानिकाला ‘भारताने सन २०२० पर्यंत कोणत्याही परिस्थितीचा सामना करायला सशक्त बनले पाहिजे’ असे जवळ-जवळ बावीस वर्षांआधी म्हणजे १९९८ साली का वाटले असावे? स्वर्गीय अब्दुल कलाम आपल्या ‘अग्निपंख’ पुस्तकात आपण कुठेतरी वाचलेल्या एका इंग्रजीत भाषांतरित केलेल्या संस्कृत सुभाषिताचा उल्लेख करतात. ते म्हणतात की, ‘देव सर्वत्र असतो, पण आपल्याला दिसत नाही की तो बोलत नाही. पण तो आपल्याशी एखाद्या वस्तूतून व व्यक्तीद्वारे काहीतरी सांगत असतो, मार्गदर्शन करत असतो. त्याचे योग्य संदेश आपल्याला ओळखता आले पाहिजेत.’ आज मागे वळून पाहिल्यास स्वर्गीय अब्दुल कलामांच्या तोंडून देवानेच भारतीयांना सन २०२० साली येऊ घातलेल्या अवर्षणाचा इशारा दिला नसेल कशावरून? भारतीय वैज्ञानिकांचा ‘देव’ असणार्‍या अब्दुल कलामांचा देव या संकल्पनेवर का विश्‍वास होता, या प्रश्‍नाचे उत्तर देणारे वर्ष म्हणजे गत २०२० साल.

शालेय वर्ष
गेल्या फेब्रुवारीतील गोष्ट. शेवटच्या सत्रातील परीक्षा सुरू होण्याआधी पालक-शिक्षक संघाची त्या शैक्षणिक वर्षातली शेवटची बैठक होती. मी माध्यमिक व प्राथमिक अशा दोन्ही पालक-शिक्षक संघांवर असल्याने एकाच हॉलमध्ये आधी माध्यमिक व नंतर प्राथमिक अशा दोन्ही बैठकांना हजेरी लावली. बैठकीच्या आदल्या रात्री शाळा-कॉलेजीस तात्काळ बंद ठेवाव्यात असे परिपत्रक निघाले होते. ही बैठक शनिवारी होती अन् त्या परिपत्रकाची अंमलबजावणी सोमवारपासून कशी करावी, हा दोन्ही बैठकांतील कळीचा मुद्दा होता. डॉक्टर म्हणून माझ्याकडून मुख्याध्यापिकेला व इतर सदस्यांना जाणून घ्यायचे होते की, शाळा नेमक्या किती दिवस बंद राहतील? त्यानुसार त्यांना बाकी राहिलेला सिलॅबस परीक्षेपूर्वी कसा पूर्ण करायचा हे ठरवायचे होते. खरे तर त्यावेळी आम्हीसुद्धा इतर सामान्यांसारखेच अंधारात होतो. एक माहीत होते की, जेणेकरून प्रगत देशांच्या या विषाणूला आवर घालण्यात नाकी नऊ येत आहेत तेव्हा येथे प्रसार झाल्यास आम्हालाही जड होणार आहे. मी त्यांना तशी कल्पना देण्याचा प्रयत्न केला पण ते त्यांच्या डोक्यावरून जात आहे हे मला कळले. मग थोडे विषाणूपासून विषयांतर करून एकूण आमच्या परीक्षाप्रणालीवरच त्यांच्याशी चर्चा करायला सुरुवात केली. मी त्यावेळी सहज बोलून गेलो की तथाकथित अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी जो बाऊ केला जातोय किंवा धडपड केली जातेय, पण खरे तर पुढच्या काळात या अभ्यासक्रमातील कित्येक भाग गरज नसलेला म्हणून गाळलाही जाऊ शकतो. विद्यार्थ्यांची बौद्धिक पातळी ठरविण्यासाठी सगळ्याच अभ्यासक्रमाची गरज असते असे नाही, तेव्हा जास्तीत जास्त काय होईल तर पूर्ण झालेल्या अभ्यासक्रमावरच परीक्षा होऊ शकते, असे काहीतरी मी सांगण्याचा प्रयत्न करत होतो. उपस्थित शिक्षकांची व पालकांची चिंता मात्र मुलांचा महत्त्वाचा शेवटचा महिना वाया जातोय हीच होती. पुढे लॉकडाऊन आलं. पुढे नववीच्या आधीच्या वर्गाच्या शाळेत मुले गेलीच नाहीत. बघता बघता शाळेत पाऊल न ठेवलेले शालेय वर्ष संपत आले. पण वर्ष वाया कुठे गेले? वाहत्या पाण्याला अडविण्यासाठी मध्ये मोठा दगड उभा करावा तसे थोड्या वेळापुरते पाणी थांबले. या थांबलेल्या पाण्यानेही वाटा शोधल्या व परत वाहू लागले. मान्य आहे की प्रवाहाचा जोम व वेग पूर्वीएवढा नाही. काही म्हणतील की गुणवत्ता हवी तितकी नसेल, पण हा प्रवाह थांबला नाही हे काही थोडे नाही.

१४ मार्चला मडगावच्या रवींद्रभवनमध्ये विद्याभुवन कोकणी शाळा व रवींद्र केळेकर ज्ञानमंदिराचे वार्षिक स्नेहसंमेलन होते. गोव्यातील एक-दोन शाळांनीच स्नेहसंमेलन मोठ्या प्रमाणात साजरे केले, त्यांतील हे एक. हे संपूर्ण स्नेहसंमेलन ‘कोविड साथ’ ही मध्यवर्ती कल्पना ठेवून, कोविडयोध्यांचे योगदान अधोरेखित करणारे होते. याचमुळे मला तेथे मुख्य अतिथी म्हणून बोलावले होते. तसे पाहिल्यास वैद्यकीय शिक्षणाशी मी निगडीत असल्यामुळे वर्षभरात चार-पाचकडे अशी आमंत्रणे असतात. पण लग्नसमारंभास जातात तसे सहकुटुंब कधी दुसर्‍या शाळेच्या किंवा कॉलेजच्या स्नेहसंमेलनात गेल्याचे आठवत नाही. कारण तसे कुणी हल्ली जातच नाहीत. वीस-पंचवीस वर्षांपूर्वी मुख्य अतिथी आपल्यासोबत एखाद-दुसर्‍या कुटुंबसदस्याला घेऊन यायचे. आधी टीव्ही घरात शिरल्यापासून व आता मोबाईल हाताला चिकटल्यापासून आपल्या मुलांचा सहभाग नसेल तर दुसर्‍या शाळेच्या सोडून द्या, स्वतःच्या मुलांच्या शाळेच्या स्नेहसंमेलनालाही कुणी जात नाही. मात्र या स्नेहसंमेलनाला मी सहकुटुंब गेलो. घरची मंडळीही यायला पटकन तयार झाली. कारण गेले वर्षभर असल्या एकाही कार्यक्रमास बाहेर जाता आले नव्हते. जेव्हा मूबलक मिळते तेव्हा त्याची किंमत कळत नाही. पण जेव्हा त्या गोष्टीचा दुष्काळ पडतो तेव्हा त्याची खरी किंमत कळते अशातला हा भाग होता. कार्यक्रमाआधी मुख्याध्यापक व पालक-शिक्षक संघाचे सदस्य असे आम्ही एकत्र बसलो तेव्हा मुलांना टीव्ही जास्त पाहू नका, मोबाईलपासून दूर रहा असे मुलांना सांगा, तुम्ही डॉक्टर असल्यामुळे मुले तुमचे थोडेतरी ऐकतील असे सांगण्यात येते. मी मात्र भाषणात ‘प्रत्येक पिढीसाठी नवीन नवीन साधने उपलब्ध होतात व त्यापासून मुलांना दूर ठेवणे शक्यच नाही; उलट या साधनांचा शिक्षणासाठी कसा उपयोग करता येईल यासाठी सर्वांनीच विचार करायला हवा’ असे म्हणालो. कित्येक जणांनी हे भाषणापुरते ठीक आहे, पण प्रत्यक्षात कठीण आहे असे बक्षीसवितरणानंतर होणार्‍या चहापानाच्या वेळी सांगितले होते. या स्नेहसंमेलनात गोष्ट वेगळी होती. मी संपूर्ण भाषणात ‘ज्या साधनांपासून आम्ही मुलांना दूर ठेवण्याच्या गोष्टी करत होतो, नेमकी तीच साधने कठीण समयी मदतीला पावली’ यावर बोललो. एकूणच या वर्षात आमच्या शिक्षण वितरणप्रणालीकडे केवळ नव्या दृष्टिकोनातून नव्हे तर येणार्‍या भविष्यातील गरजा व जाणिवा यांबाबत व्यापक दृष्टिकोनातून बघितले गेले पाहिजे.

काही कारणास्तव मुलांना शाळेत जाता आले नाही तर मुलांचे वर्ष वाया जाणार म्हणून काळजी करणारे आम्ही पालक. या वर्षी एक नाही तर सगळीच मुले शाळेत जाऊ शकली नाहीत, तरीही कुणाचे वर्ष वाया गेले नाही. मुले पुढच्या वर्गात गेली, कॉलेजमध्येही गेली, मेडिकल-इंजिनिअरिंगचेही प्रवेश झाले. जून म्हणजे शाळा सुरू, ऑगस्ट म्हणजे कॉलेज सुरू असे संदर्भ बदलले, पण मुलांचे वर्ष वाया गेले नाही. नियतीचा व कालचक्राचा हा महिमा. सगळं थांबणं अशक्य.

उच्च ज्ञान
वर्गज्ञानार्जन संपल्यानंतर ज्ञान मिळविण्याचे मार्ग म्हणजे बैठका, परिषदा, चर्चासत्रे वगैरे वगैरे. गेल्या वर्षी अशा प्रकारचे आयोजन कसे करावे हा मोठा प्रश्‍न. तंत्रज्ञानाने हा प्रश्‍न सोडविला. परिषदेला परगावी जाण्यापेक्षा परिषदच घरात आली. आमच्या फॉरेन्सिक ऍकॅडमीची परिषद कटक-ओरिसामध्ये होती. प्रत्यक्षात तेथे आम्ही पन्नास-साठच लोक उपस्थित होतो. पण आमच्या वर्च्युअल प्लॅटफॉर्मवर हजाराहून अधिक डॉक्टर उपस्थित राहिले. प्रबंध, व्याख्याने देणारे सगळेच आपापल्या घरी, तसे ऐकणारेही आपापल्या देश-विदेशातील घरी. मोबाईलवर पाहताना वा लॅपटॉपवर पाहताना ही परिषद एखाद्या सप्ततारांकित हॉटेलात होत असल्याचा आभास होत होता. कारण या परिषदेचे प्रक्षेपण हायब्रीड पद्धतीने केले जात होते. यात आमच्या विद्यार्थ्याने सादर केलेल्या ‘दगडी हृदय’ या प्रबंधाला सर्वोत्कृष्ट बक्षीस मिळाले. एक मात्र खरे की प्रत्यक्ष दूरदुरून आलेल्यांना परिषदेच्या निमित्ताने भेटण्यात जो आनंद असतो तो या आभासी परिषदेत नसतो.

आर्थिक वर्ष
कॅलेण्डर वर्ष जानेवारीपासून सुरू होते व डिसेंबरमध्ये संपते, तर भारतीय आर्थिक वर्ष एप्रिलपासून सुरू होते व पुढच्या मार्चमध्ये संपते. याशिवाय आयकर तपासणी वर्ष थोडे वेगळे. या विषाणू-वर्षाने सगळ्याच हिशेबवहींचा ताळेबंद हलवून ठेवला. मागच्या वर्षाचा ताळेबंद तर चार-पाच महिन्यांनी पुढे ढकलला. वाहतूक खात्याची वाहन वैधता कागदपत्रे तर पुढील जूनपर्यंत नूतनीकरण न करताही वैध ठरविण्यात आली. आर्थिक व्यवस्थाच हादरली. हे खरे असले तरी आवश्यक गरजा व ऐषआरामी गरजा यातील फरक गरिबांपासून करोडपतीपर्यंत सर्वांनाच कळला. करोडपतींनाही काही काळाकरिता कोविड उपचारांसाठी सरकारी दवाखान्यातच जावे लागले तेव्हा गरिबी-श्रीमंतीचे संदर्भच बदलले. पुढे खाजगी क्षेत्राला उपचार करण्याची परवानगी मिळाली आणि मोठ्या-मोठ्या कॉर्पोरेट हॉस्पिटलांतही दखल घेऊनसुद्धा श्रीमंत लोक दगावू लागले तेव्हा निसर्ग सर्वांनाच एका मापाने मोजतोय हे अधोरेखित झाले.

नोटबंदी आली तेव्हा भारतीय जनता व व्यवस्था पूर्णपणे हलली. नोटबंदी केली तेव्हा सरकारकडून जे ध्येयाच्या निश्‍चितीबाबत सांगितले जायचे ते ध्येय खरोखरच सरकार साध्य करू शकले काय याचे उत्तर माझ्याकडे नाही. नोटबंदी होती तेव्हा भारतीयांकडे प्रत्यक्ष चलन हातात नव्हते. त्यामुळे बाजारात वस्तू उपलब्ध असूनही विकत घेता येत नव्हत्या. कोविड लॉकडाऊन काळात हातात चलन होते पण बाजारात वस्तू उपलब्ध नव्हत्या. तेव्हा पैसे हातात नव्हते, पण गरजू वस्तू बाजारात होत्या. यावेळी उलटे झाले, हातात पैसे होते पण गरजू वस्तू बाजारात उपलब्ध होत नव्हत्या. दोन्ही वेळी एका गोष्टीचा सर्वांनाच साक्षात्कार झाला. ही गोष्ट म्हणजे, आम्हा सर्वांना आमच्या अत्यावश्यक गरजा किती कमी आहेत याची जाणीव झाली. अन्यथा आमच्याकडे किती आहे याच्यापेक्षा किती नाही याची काळजी जास्त! आरामी गरजा याच अत्यावश्यक गरजा असा भ्रमच आमच्या डोक्यात खोलवर रूजला होता. यातच प्रत्यक्षात नसलेल्या असुरक्षिततेचे भय, वर शेजार्‍यापाजार्‍यांशी तुलनात्मक स्पर्धेची लागण. कोविड लॉकडाऊन काळात सर्वांना तीस-चाळीस वर्षांपूर्वीचे दिवस आठवले. सर्वांकडे जेमतेम असायचे. जे असायचे ते एकमेकांना सांभाळून घेऊन वापरायचे. सर्वांना आहे त्यात समाधानही असायचे आणि आनंदही. भले कोविडमुळे आर्थिक व्यवस्था हादरली, अंदाजपत्रके बिघडली, पण या कोविडने मानवाला पैसा म्हणजे सर्वकाही नाही याची परत एकदा आठवण करून दिली.

भीतीचे एक वर्ष
‘भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे’ हे वाक्य गोव्यात व महाराष्ट्रात अनेक ठिकाणी लिहिलेले आढळते. तो भक्तीचा व श्रद्धेचा भाग आहे. डॉक्टरने रुग्णांना व नातेवाईकांना ‘जास्त भिऊ नकोस’ असे सांगणे हे डॉक्टरी पेशाचा एक भाग असतो. गेल्या मे महिन्यानंतर गोवा ग्रीन झोनमधून रेड झोनमध्ये आले तेव्हा सरकारतर्फे ‘घाबरण्याची गरज नाही’ असे वारंवार सांगण्यात येऊ लागले व याच वाक्यावर साधक-बाधक चर्चा होऊ लागली. गर्भीत संदेश समजण्यापेक्षा यावर टीका व विनोदच जास्त होऊ लागले.

वर्षभर कोविडची भीती आहे. ती वर्षभर एकाच तर्‍हेची भीती नाही. या भीतीचे स्वरूप दर तीन महिन्यांनी बदलत असते. पहिल्या तीन महिन्यांत पूर्णतः काल्पनिक भीती होती. दूर देशातून वा दूर प्रदेशातून येणारी माहिती सर्वांनाच बुचकळ्यात टाकत होती अन् त्यातून भीतीत भर घातली जात होती. आमच्या प्रसार व समाजमाध्यमांनी जगभराची माहिती आमच्यावर ट्रकांच्या हिशेबाने ओतली अन् आमचे डोके गरगरू लागले. लॉकडाऊनने तयार झाली ती भीती वेगळ्या प्रकारची होती. हे असेच चालू राहिले तर दिवस कसे काढायचे अशी भीती होती. पुढे रुग्ण दिसू लागले व ते बरे होतानाही दिसू लागले. तशातच रुग्णमृत्यूना सुरुवात झाली. सुरुवातीच्या काळात सरकारी यंत्रणेकडून ज्या पद्धतीने शवाची विल्हेवाट केली जायची ते पाहता लोकांना कोविड परवडला पण कोविडग्रस्त मृतदेह नको अशी परिस्थिती निर्माण झाली. कोविड शवाची भीती आता कमी झालीय, पण पूर्णपणे गेली आहे असे म्हणता येणार नाही.

पुढील दोन-तीन महिन्यांत रुग्णसंख्या कमी झाली. शून्यावर आली नाही तरी लोकांमधील भीती कमी व्हायला सुरुवात झाली. तशातच लसीकरण उपलब्ध होणार याची चर्चा सुरू झाली. लस आली की सगळी भीती संपली असे सर्वांना वाटू लागले. प्रत्यक्षात लस दारात येऊन बसली तशी या लसीबद्दलही काही लोकांना भीती वाटू लागली. पुढे पुढे ही भीतीही कमी होईल हे खरे असले तरी कोविड तेवढा वेळ आम्हाला द्यायला तयार नाही. आज वाढत असलेली रुग्णसंख्या ही या महामारीची दुसरी लाट नाही ना, अशी नवीन भीती आता सुरू झाली आहे.

वाया न जाणार्‍या गोष्टी
गेलेले वर्ष खरोखरच वाया गेलेले वर्ष होते की काय याचे उत्तर प्रत्येकजण आपापल्या अनुभूतीवरून ठरवेल. वैद्यकीय दृष्टिकोनातून पाहिल्यास भविष्यासाठी सकारात्मक अशा कित्येक गोष्टी पुढे आल्या आहेत. भारताचेच सांगायचे झाल्यास भारत वैद्यकीय परिस्थिती सांभाळण्यास इंग्लंड-अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्रांच्या तोडीचा आहे हे सिद्ध झाले आहे. येथील वैज्ञानिक क्षमताही किती सुसज्ज आहे याची प्रचिती आली. आपल्या मानव संसाधनांचा उपयोग करून चीन कित्येक अशक्य वाटणार्‍या गोष्टी जगाला शक्य करून दाखवत होता. भारताने कोविडच्या निमित्ताने चीनने करून दाखविले त्यापेक्षाही मोठ्या गोष्टी करून दाखविल्या. हे असेच नाही झाले. सरकारी यंत्रणा वेगळ्या पद्धतीने कामाला लागली. येथे कंत्राट, कमिशने यांचे प्लॅनिंग करायला कोविड त्यांना वेळ देत नव्हता. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्राला हव्या असलेल्या सगळ्या गरजा पुरविल्या गेल्या. लालफितीत त्या जास्त करून अडकल्या नाहीत. महत्त्वाचे म्हणजे या सगळ्या गरजा तळागाळापर्यंत जाऊन शोधल्या गेल्या अन् त्यांना दूरवर असलेल्या गावाच्या कोपर्‍यापर्यंत पाठविल्या गेल्या. पुढे कधीतरी या कोविडला बॅकफुटावर यावंच लागणार, पण जी आरोग्यविषयक आधुनिक सुविधा तालुकापातळीवर पोहोचली आहे त्याचा खरा फायदा लोकांना कोविडची महामारी संपल्यावर होईल.

आज कोविडच्या दुसर्‍या लाटेची चर्चा आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये नवीन रुग्णसंख्या दर दिवशी असायची ती या वर्षी एप्रिलमध्ये सुरू झाली आहे. हीच गती राहिली तर पुढील काळात त्रास वाढण्याची शक्यता आहे. असे असले तरी गेल्या वर्षीच्या अनुभवावरून व उपलब्ध झालेल्या सुविधांमुळे वैद्यकीय क्षेत्र येणारे आव्हान पेलण्यासाठी मागील वर्षापेक्षा जास्त सज्ज आहे.
मागील वर्षातला एप्रिल व या वर्षातील एप्रिल यांतील परिस्थितीत फरक काय आहे असे मला कुणी विचारले तर मी सांगेन की, मागच्या वर्षी या काळात रुग्णसंख्या चिमुटभर होती तरी मनात कोविडविषयी भीती डोंगराएवढी होती. खरे तर वर्षभरात जे पाहिले व आज वाढणारी रुग्णसंख्या पाहिली तर लोकांच्या मनात कोविडविषयी काळजीवजा भीतीचा डोंगर असायला हवा होता. पण प्रत्यक्षात लोकांच्या मनात चिमुटभर तरी भीती आहे का, असा प्रश्‍न आजच्या घडीला पडतो आहे. असं नसतं तर कोविडच्या लसीकरणासाठी मोठमोठ्या रांगा लागल्या असत्या. कलम १४४ असो वा नसो, लोक सभा-सोहळ्यांना गेलेच नसते. खरे सांगू, आम्ही हयात आहोत त्यांच्यासाठी काहीही वाया गेलेले नाही; पण या कोविडमुळे जे लोक जग सोडून गेले त्यांची भूतलावर बाकी राहिलेली आयुष्याची वर्षे मात्र वाया गेली. मला वाईट वाटते, काळजी वाटते ती याच गोष्टीची, भीती वाटायला हवी ती याच गोष्टीची हे आपल्याला वेगळे सांगण्याची गरज नाही!