वादग्रस्त ऑडिआमुळे मंत्री गोविंद गावडे पुन्हा अडचणीत

0
12

कला व संस्कृती खात्यातील कार्यक्रम निधी प्रकरणाचा वाद शमतो न शमतो तोच कला व संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे यांचा एक वादग्रस्त ऑडिओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे.

प्रियोळ मतदारसंघात आयोजित एका कार्यक्रमावरून आदिवासी कल्याण खात्याचे संचालक दशरथ रेडकर यांना धमकी दिल्याचा मंत्री गावडे यांचा कथित ऑडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या ऑडिओमुळे मंत्री गावडे पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत.
गोवा अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती आयोगाने फोंडा येथील एका स्वयंसेवी संस्थेच्या सहकार्याने प्रियोळ मतदारसंघातील जागृती कार्यक्रमाचे आयोजन केले होते. आदिवासी कल्याण खात्याच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तथापि, या कार्यक्रमात स्थानिक आमदार, मंत्री गोविंद गावडे, सरपंच किंवा प्रियोळचे आमदार तथा मंत्री गोविंद गावडे यांना निमंत्रित करण्यात आले नव्हते. याच मुद्द्यावरून मंत्री गावडे यांनी खात्याचे संचालक दशरथ रेडकर यांना दूरध्वनीवरून कार्यक्रमाबाबत नापसंती व्यक्त करताना मुख्यमंत्री, सभापती यांच्याबाबत वादग्रस्त विधाने केली आहेत. या ऑडिओमध्ये संचालक रेडकर यांना दमदाटी केली जात असल्याचे दिसून येत आहे. कला व संस्कृती खात्याच्या निधी वितरण प्रकरणात विरोधकांनी मंत्री गावडे यांना घेरण्याचा डाव सभापती तवडकर यांनी सोमवारी यांनी हाणून पाडला. तथापि, आता वादग्रस्त ऑडिओमुळे विरोधकांना पुन्हा एकदा गावडे यांना घेरण्याची संधी मिळाली आहे.

पोलिसांत तक्रार दाखल
कॉँग्रेसच्या आदिवासी विभागाचे संयोजक रामकृष्ण जल्मी यांनी गोवा एसटी आणि एससी आयोगाच्या अध्यक्षांना धमकी दिल्याप्रकरणी कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांच्याविरोधात पणजी पोलीस स्थानकावर काल तक्रार दाखल केली आहे. मंत्री गावडे आणि संचालक दशरथ रेडकर यांच्यातील वादग्रस्त ऑडिओ संभाषणामुळे ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.