सर्दी, तापासारखा क्षुल्लक ठरवून राज्य सरकार ज्या कोरोनाला निकालात काढायला निघाले होते, त्या कोरोनाने आता आपले खरे रूप दाखवायला सुरूवात केली आहे. गेल्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये झालेले पाच मृत्यू राज्याच्या जनतेला हादरवून टाकण्यास पुरेसे आहेत. आतापर्यंत जेव्हा जेव्हा कोरोनाने एखाद्याचा बळी गेला, तेव्हा ती ‘को-मॉर्बिड’ म्हणजे इतर आजारयुक्त व्यक्ती असल्यानेच मृत्युमुखी पडल्याचे सांगून त्यावर पांघरूण टाकले जात होते. वयोवृद्धता हेही एक कारण दाखवले जायचे. परंतु गेल्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये कोरोनाने घेतलेले बळी पाहिले तर त्यामध्ये तरुणांपासून वयोवृद्धांपर्यंतच्या नागरिकांचा समावेश असल्याचे दिसते. उगाच पुन्हा लपवाछपवीच्या मागे न लागता एकाएकी अशी बळींची संख्या का वाढू लागली आहे, उपचारांमध्ये काही त्रुटी राहिली आहे का, याचा वास्तववादी अभ्यास सरकारने आता करावाच लागेल.
आजवर कोरोनाने बळी गेलेल्यांमध्ये मुरगाव तालुक्यातील व्यक्तींची संख्या सर्वाधिक आहे. मुरगाव तालुका हे गेले दोन तीन महिने राज्यातील कोरोनाचे केंद्र बनून राहिले आहेच, परंतु तेथून हा वणवा राज्याच्या सर्व तालुक्यांमध्ये खेड्यापाड्यांमध्ये घुसला आहे. शासकीय कर्मचार्यांद्वारे तो अधिक फैलावल्याचेही दिसते आहे. हा वाढता प्रसार रोखण्यासाठी अजूनही काही खास प्रयत्न होत आहेत असे दिसत नाही, उलट पर्यटनक्षेत्र खुले करून सरकारने गोमंतकीय जनतेसमोरील संसर्गाचा धोका अधिक गडद केलेला आहे. नुकताच एक पर्यटकही पॉझिटिव्ह निघाला आहे. हे पॉझिटिव्ह पर्यटन गोव्याला अधिक संकटात टाकण्याची चिन्हे आहेत.
कोरोना जेव्हा फैलावतो तेव्हा समोरची व्यक्ती कोण आहे हे पाहात नाही. जगातील अनेक राष्ट्रप्रमुखांच्या कडेकोट सुरक्षा भेदून देखील तो त्यांच्यापर्यंत पोहोचला. भारतामध्ये महानायक अमिताभ बच्चन आणि कुटुंबियांपर्यंत त्याने आपले पाश आवळले आहेत. आज भारत जगातील आघाडीचा कोरोनाग्रस्त देश बनण्याच्या दिशेने वाटचाल करतो आहे. या पार्श्वभूमीवर गोवा कोरोनामुक्त असू शकत नाही हे जरी खरे असले, तरी देखील राज्य सरकार जर अधिक सतर्क असते, प्रशासन अधिक कार्यक्षम असते, तर आजच्यासारखा गावोगावी झालेला फैलाव ते नक्कीच रोखू शकले असते हेही तितकेच खरे आहे. राज्य सरकारने किमान आपल्या कर्मचार्यांना कोरोनाचे गांभीर्य समजावून दिले असते, तर आरोग्य खात्यापासून पोलिसांपर्यंत जी बेफिकिरी दिसून आली ती दिसली नसती. मुळात खुद्द राजकारण्यांनाच ह्याचे गांभीर्य उमगलेले नव्हते. किंवा उमगूनही आपले अपयश झाकण्यासाठी त्याला किरकोळ ठरवण्याचे हास्यास्पद प्रयत्न सातत्याने चालले होते. या पोरखेळाने गोमंतकीय जनतेला आज कोरोनाच्या ज्वालामुखीच्या तोंडावर आणून सोडले आहे.
राज्यातील आरोग्य यंत्रणा कार्यक्षम असल्याने कोरोना रुग्णांवर चांगल्या प्रकारे उपचार आजवर होऊ शकले आहेत हा विश्वास आजवर जनतेच्या मनामध्ये होता. मात्र, आता लागोपाठ होत असलेल्या मृत्यूंमुळे हा विश्वासही डळमळू लागला आहे. हे असे होऊन चालणार नाही. आरोग्ययंत्रणेवरील विश्वास टिकला पाहिजे. बदलत्या परिस्थितीची जाणीव झाल्याने सरकारने आता प्लाझ्मा थेरपीचा पर्याय चाचपण्याची हालचाल सुरू केली आहे. तिचे यशापयश इतरत्र अजून तरी खात्रीलायक ठरलेले नाही. त्यामुळे गोव्यासाठी देखील प्लाझ्मा थेरपी हा एक प्रयोग आहे. परंतु तो यशस्वी ठरायचा असेल तर त्यासाठी कोरोनातून मुक्त झालेल्यांनी आपले रक्तद्रव्य देऊन इतरांचे प्राण वाचवण्यासाठी पुढे येणे गरजेचे आहे. त्यासाठी कोरोनातून मुक्त झालेल्यांशी संपर्क साधून त्यांच्या मनामध्ये प्लाझ्मा दानाची स्वयंप्रेरणा निर्माण करण्याचे व्यापक प्रयत्न व्हायला हवेत.
जिद्दीने आणि निर्भयपणे हे कोरोना योद्धे गेले तीन महिने आघाडीवर लढत आहेत, परंतु राज्यातील एकमेव कोविड इस्पितळातील सद्यस्थितीची जी काही छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, तशी खरोखरच विदारक स्थिती असेल तर सरकारने तातडीने त्यात लक्ष घालणे गरजेचे आहे. कोविड केअर सेंटर्स आणि कोविड इस्पितळाच्या व्यवस्थापनाच्या खासगीकरणाचा घाट काहींनी या निमित्ताने घातलेला दिसतो, त्यामागे रुग्णांची चिंता आहे की काही हितसंबंध आहेत हे पाहावे लागेल. कोरोनाशी आघाडीवरून लढणार्या योद्ध्यांच्या पाठीशी सर्वशक्तीनिशी सरकारने उभे राहणे आज खरे तर आवश्यक आहे. त्यांची आबाळ होता कामा नये.
राज्यात नवनव्या गावांमध्ये कोरोना जाऊन पोहोचताना दिसतो आहे. बघता बघता नवनवे हॉटस्पॉटस् तयार होत आहेत. यामागची कारणे सरकारने शोधावीत. केवळ नवे रुग्ण सापडले की त्यांना कोविड केअर सेंटर्समध्ये पाठवणे वा कोविड इस्पितळात हलवणे वा त्यांच्या संपर्कातील व्यक्तींच्या कोविड चाचण्या करणे हे केल्यानेच सरकारची जबाबदारी संपत नाही. मुळात या फैलावाची कारणे कसोशीने शोधली जाणे आज गरजेचे आहे. शासकीय कर्मचार्यांच्या सार्वजनिक वावरामध्ये काही त्रुटी आहेत का, कदंबमधून एकत्र प्रवास केल्याने हा फैलाव होत आहे का, मास्कस् – सॅनिटायझर्स – सामाजिक दूरी याच्या पालनात बेफिकिरी होते आहे का या सर्व गोष्टींची तपासणी गांभीर्याने झाली पाहिेजे. राज्यातील उद्योगक्षेत्रामध्येही कोरोनाने शिरकाव केल्याचे दिसते आहे. कारखाने असोत वा कार्यालये, तेथे कोरोनाचा फैलाव कसा झाला याचा तपास झाला पाहिजे. त्यात आढळणार्या त्रुटी लक्षात घेऊन त्यानुसार सर्वत्र नवे दंडक घातले गेले पाहिजेत. सार्वजनिक जीवनामध्ये मास्कस्, सॅनिटायझर्स, सामाजिक दूरी या मूलभूत त्रिसूत्रीचे पालन अजूनही गांभीर्याने होताना दिसत नाही. तेथे कडक दंडात्मक कारवाईचा मार्ग अवलंबावाच लागेल. त्यामध्येही प्रशासन सक्षम आहे असे दिसत नाही. राजकीय कारणांखातर मेळावलीतील पत्रकार परिषद उधळणारी पोलीस यंत्रणा राज्यभरामध्ये कोरोनासंदर्भात तेवढीच सक्रिय असती, तर आजची ही वेळ निश्चितच ओढवली नसती. डझनावारी पोलिसांनाच कोरोना होणे ही बाब गौरवास्पद नाही. या सार्या त्रुटी शोधून त्या दूर करण्याचे प्रयत्न झाले नाहीत तर कोरोनाचा फैलाव कधीच रोखता येणार नाही. रुग्णांवर योग्य उपचार करण्याइतकेच त्याचा फैलाव रोखणे हे देखील आज तितकेच गरजेचे आहे. गावांमागून गाव बाधित होत चालले आहेत, ते थांबवण्यासाठी प्रशासनाने आतापर्यंत काय केले आहे?